Home कथा एक स्त्री दोन नवरे

एक स्त्री दोन नवरे

by Patiljee
5543 views

लग्न होऊन आज चार महिने झाले. इतर मुलीप्रमाणे सुखी संसाराची स्वप्ने रंगवली होती. माहेरची परिस्थिती सुद्धा हवी तशी चांगली नसल्याने माझे लग्न सात वर्ष मोठ्या असलेल्या सुबानरावासोबत करण्यात आले. सुबांनराव व्यावसायिक होते, गडगंज श्रीमंत नाही पण घरात सर्व चांगल आहे आणि मुलगा एकुलता एक आहे असे आम्हाला सांगण्यात आले होते. पण खरी परिस्थिती काय आहे हे लग्नानंतर कळले. सुबांनराव कुठेच जॉब करत नव्हते. वडीलांच्या येणाऱ्या पेन्शन मधून त्यांचे घर चालायचे. राहायला घर चांगलं तर होतं पण घराची परिस्थिती नेहमीच हलाखीची असायची.

हे सर्व जेव्हा मला कळलं तेव्हा माझ्याच आयुष्यात देवाने असे का लिहून ठेवलं आहे म्हणून मी देवाला दोष देत राहिले. माहेरची परिस्थिती हालाखीची तर होतीच आणि आता इथेही काही वेगळसं नव्हतं. तरीसुद्धा जास्त वेळ नशिबाला दोष न देता मी एका कारखान्यात हेल्पर म्हणून काम सुरू केलं. पगार कमी होता पण घर चालेल एवढा नक्कीच होता. सासू सुद्धा नेहमी टोमणे मारत बसायची. तू जर कामावर गेलीस तर घरची कामे कोण करणार अशी नेहमीच तिची किरकिर सुरू असायची. पण मी फक्त माझा आणि माझ्या होणाऱ्या बाळाचा विचार करत होते.

आमच्या घरात बाळाच्या येण्याच्या चाहुलीने आनंदाचे वातावरण निर्माण होईल असे मला वाटतं होते. सासू आनंदित झाली खरी पण नवरा मात्र माझ्या या निर्णयावर खुश नव्हता. त्याला हे बाळ नको होतं. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. कारण पुढे जाऊन मला माझ्या आयुष्यात स्वतःचे हक्काचं कुणी हवं होतं. पण आता नवऱ्याच्या स्वभावात अजून जास्त बदल झालं होता. कामावरून घरी आले की नेहमीच पैश्याची मागणी करायचा. पैसे नाही दिले तर मारझोड करायचा आणि पैसे दिले की दारु पिऊन येऊन पुन्हा मारायचा.

आयुष्य अगदी नरका सारखं झालं होतं. नऊ महिन्यांची गरोदर होते. शेवटच्या महिन्यात गरोदर बाईची जास्त काळजी घ्यावी असे डॉक्टरांनी सांगितले होते. पण या नराधमाला आपल्या हौस मौजेचे पडले होते. या दिवसात पण घरी दारू पिऊन येऊन पिसाटलेल्या कुत्र्यासारखा अंगाचे लचके तोडायचा. कितीही नाही म्हटलं तरी मारझोड करून ती स्वतः ची शरिरभुख भागवायचा. हा समाजमान्य ब*लात्कार गेली अनेक वर्ष मी सोसत होते.

काहीच दिवसांनी मला छान गोंडस बाळ झालं. घरात मुलाच्या येण्याने तरी आनंद होईल असे वाटतं होतं पण असे काही झालं नाही. उलट अजून जास्त त्रास वाढला. घरची कामे, मुलाला पाहणे आणि कामावर जाणे. या सर्वात मी स्वतःकडे पाहणे विसरून गेली होती. चेहरा उतरला होता, वजन काम झालं होतं.  पण याच दरम्यान माझी ओळख सुदेश सोबत झाली. सुदेश आमचा सुपरवायझर होता. नेहमीच हसतमुख असणारा सुदेश काहीसा का होईना मला आनंदी ठेऊ लागला . आमच्यात प्रेम वैगेरे असे काही नव्हते पण तो माझी नेहमी काळजी घ्यायचा. त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरील हसू पुन्हा एकदा उमटले होते.

माझा मुलगा आता चार वर्षाचा होता. घरची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर होती. सासऱ्याचे निधन झाल्याने पेन्शन येणं पण बंद झालं होतं. सुबांनराव दारू पिऊन कुठे ना कुठे गावात पडलेले असायचे. रात्री घरी यायचं माझ्या शरीराचे लचके  तोडायचे हे त्यांचं नेहमीच होतं. या गोष्टी जेव्हा मी सुदेश सोबत शेअर केल्या तेव्हा त्याने मला त्याच्यापासून वेगळं होण्याचा सल्ला दिला. एवढी वर्ष मी ही हा विचार केला होता पण आता मागे सुदेश खंबीरपणे उभा होता म्हणून मी हा निर्णय घेऊ शकले.

अखेर घटस्फोट घेऊन मी माझ्या बाळाला घेऊन वेगळी झाले. आता आयुष्याची नवीन सुरुवात करणार या आनंदात अनेक दिवस खूप छान गेले. सुदेशने त्याच्याच ओळखीत मला एक भाड्याने खोली बघून दिली होती. कधीतरी सुदेश यायचा माझ्या मुलासोबत छान खेळायचा. त्या दोघांचे ते प्रेम पाहून मी खूप जास्त आंनादित असायची. एवढे सर्व होऊन सुद्धा सुदेश आणि मी फक्त छान मित्र होतो. पण आज मुलगा झोपल्यावर अलगद येऊन त्याने मला मिठीत घेतलं. का कुणास ठाऊक पण त्याला नकार नाही देऊ शकले. मी ही त्याच्या प्रेमात वाहत गेले. मग हे नेहमीचे झाले. सुदेश जेव्हाही यायचा तेव्हा आम्ही प्रेमाच्या सागरात बुडून जायचो.

नवऱ्या सोबत कधी असे प्रेम मी अनुभवले सुद्धा नव्हते जे सुदेश कडून मला मिळत होते. एक दिवस मी त्याला म्हटलं की आपण हे किती दिवस असे सोबत राहणार आहोत. मला माहित आहे तू सिंगल आहेस आणि मी लग्न झालेली बाई. त्यामुळे आता तू तुझ्या लग्नाचा विचार कर आणि माझा नाद सोडून दे. माझ्या या वक्तव्यावर तो भडकला. येडी झालीस का तू. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी लग्न सुद्धा तुझ्या सोबतच करेल. ज्या रोषात त्याने माझ्या नजरेला नजर भिडवत हे वाक्य म्हटलं होतं ते पाहून मी नव्याने त्याच्या प्रेमात पडली.

काहीच दिवसात आम्ही देवा ब्राम्हणाच्या साक्षीने लग्न केलं आणि सुदेशच घर गाठलं. त्याच्या आईने मात्र धिंगाणा घातला. एक लग्न झालेली आणि मुलगा असलेली बाई मी सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. सुदेशने त्यांना समजवायचा खूप प्रयत्न केला पण त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. शेवटी सुदेशने आई किंवा बायको मधून बायकोची निवड केली आणि त्याच राहतं घर सोडून माझ्यासोबत आला. असे काहीसे होईल याची कल्पना मला होती पण कधीतरी सर्व सुरळीत होईल, त्याचे आई बाबा मला स्वीकारतील या आशेवर आमच्या संसाराचा गाडा दोन वर्ष सुरळीत चालू झाला.

सुदेशने कधीच माझ्या मुलाला सावत्र म्हणून नाही वागवलं. नेहमी आपल्या मुलासारखे त्याला प्रेम दिलं. आणि मला हेच पुरेसे होते. देव कुठेतरी वाईट करतो तर चांगलं सुद्धा करतोच या गोष्टीवर हळूहळू माझा विश्वास बसत चालला होता. पण हे आयुष्य आहे इथे कधी कलाटणी मिळेल हे सांगू शकत नाही. एक दिवस मार्केटमध्ये फिरत असताना सुदेशच्या बाईकवर एक स्त्री मला दिसली. जास्त काही वावगं वाटलं नसतं पण ती स्त्री त्याला चिपकून बसली होती.

मी थोडी चौकशी केली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सुदेशने दुसरं लग्न केलं होतं. आणि या गोष्टीला दीड वर्ष झालं आणि तरी देखील मला माहीत नाही. असा कसा करू शकतो सुदेश? मी कुठे कमी पडले? अगदी माझं सर्वच तर मी दिलं त्याला? तरीही का वागला तो असा? या सर्व विचारात आणि रागात मी खूप साऱ्या झोपेच्या गोळ्या घेतल्या. सुदैवाने माझा जीव वाचला. पण मला सर्व प्रश्नांची उत्तरे हवी होती.

जेव्हा सुदेशने याबद्दल स्पष्टीकरण दिलं तेव्हा त्याचं असे म्हणणे होते की आईच्या सांगण्यावरून मी हे केलं आहे. मी हे लग्न नसते केलं तर तिने मला संपती मधून बेदखल केलं असतं. नाईलाजाने मला हे करावं लागलं. पण घाबरु नकोस माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. त्याच्या ह्या उत्तराने मी निशब्द झाले. काय बोलू काहीच सुचलं नाही.

पाटीलजी यांना पाहायचे असल्यास इथे क्लिक करा.

आज आमच्या लग्नाला सात वर्ष झाली आहेत. माझा मुलगा देखील मोठा झाला आहे. सुदेश सकाळी माझ्याकडे येऊन जातो आणि रात्री घरी जातो. पण आता मात्र मी काहीच करू शकत नाहीये. पुन्हा घटस्फोट घेऊन पुढे आयुष्य तरी कसे जगू? मुलाचा शिक्षण बाकी आहे त्याला मोठं करायचं आहे म्हणून सुदेश सोबत आता नाईलाजाने संसार करतेय. त्याच्या दुसऱ्या बायकोला सुद्धा मुलबाळ नाहीये. त्यामुळे माझ्याच मुलाला तो खूप जीव लावतोय. त्याच्यावर खूप प्रेम करतोय. पण माझे काय? घरात जे काही लागेल ते थोड थोड आणून देतो? पण माझ्या हातात एक तीळ मात्र पैसा देत नाही. मग माझे असे काही आयुष्य राहिलेच नाहीये का? विचार आला संपवाव स्वतःला पण मग माझ्या मुलाचे कसे होणार? तुम्हाला काय वाटतं आता मी पुढे काय करावं? असेच राहिलेलं आयुष्य व्यतीत करावं की दुसरा काही निर्णय घ्यावा? तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. मला कृपया मार्गदर्शन करा.

लेखक : पाटीलजी आवरे उरण, रायगड

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल