Home कथा एक असही नातं मैत्रीचं

एक असही नातं मैत्रीचं

by Patiljee
11179 views
मैत्री

आज कुठे भेटायचे विशू? नेहमीच्याच ठिकाणी की कुठे बाहेर जायचं? काय मनी तू असा? नेहमी नेहमी असे पैसे उधळत नको जाऊस यार, मला नाही आवडत असे. एकटाच जॉबला आहेस. घरातले पण पाहायला लागते. आणि उगाच आपण भेटल्यावर पण खर्च करतोस. अग विशू मॅडम माझी जिवलग मैत्रीण तर तूच आहेस आणि पैसे काय पाहतेस यार आपण थोडीच रोज रोज भेटतो. कधीतरी मस्त मॅकडी मध्ये बसतो. चल आता भाषण नको देऊस, आपल्या नेहमीच्या ठिकाणावर भेट.

माझी आणि विशूची ऑनलाईन मैत्री झाली होती. आधी नॉर्मल आम्ही कधीतरी बोलायचो पण जेव्हा आम्ही जास्त वेळ गाप्पा मारायला लागलो, तेव्हा मला तिच्याशी बोलणे आवडू लागले होते. माझ्या आयुष्यात मित्र तर खूप होते पण मैत्रिणी फारशा नव्हत्या. ज्या होत्या त्यांच्याशी मी हाय हॅलो एवढंच बोलत असायचो. पण हीची गोष्ट काही वेगळीच होती. दिवसभरात मी कधी मेसेज नाही केला तर ती स्वतः समोरून मेसेज करायची.

खूप छान गट्टी जमली होती तिची आणि माझी. मी कितीही बिझी असलो तरी वेळ काढून तिच्याशी बोलू लागलो होतो. माझे मलाच कळतं नव्हते की आयुष्यात जो नेहमी आपल्या कामात व्यस्त असणारा माणूस एका मुलीला एवढा वेळ देतोय. पण खरंच ह्या मुळीत काही खास तर नक्कीच होतं. किमान एक वर्ष तरी आम्ही फक्त ऑनलाईन बोललो. ना मी तिचा कधी नंबर मागितला ना कधी. तिला ऑनलाईन कॉल केला. एवढी घट्ट मैत्री असताना सुद्धा आम्ही फक्त ऑनलाईन चाटमध्ये बोलायचो. कदाचित हीच माझी गोष्ट तिला जास्त भावली असावी.

काही कामानिमित्त ती एका दिवशी तालुक्याला आली होती. ती येणार हे मला सांगितले नव्हते पण जेव्हा आली आणि तिचे काम झाले तेव्हा तिने मला मेसेज केला. Oye मनी कुठे आहेस? तुझ्या शहरात आलीय. तिचा तो मेसेज बघून मन प्रफुल्लित तर झाले होते पण अस्वस्थ सुद्धा झालं होतं. चाटमध्ये ठीक होतं पण एकदाच असे समोर कसे जाणार? त्यात तिने मला फोटोमध्ये तर पाहिले होते. पण फोटोला फिल्टर लाऊ शकतो पण खऱ्या चेहऱ्याला नाही ना? मी सावला होतो आणि ती छान गोरीपान मुलगी.

पण आज ठरवले होतं काही झालं तरी ही भेटायची संधी मी सोडणार नाही. माझे ऑफिस जवळ असल्याने मी लगेच तिला मेसेज केला. कुठे आहेस तिथे थांब मी आलोच. मॅकडी जवळ ती थांबली होती. मी वीस एक मिनटात तिथे पोहोचलो. लांब राहूनच तिला शोधत होतो. अखेर मी तिला पाहिले. काय रूपवान मुलगी होती यार ती काय सांगू तुम्हाला आता. म्हणजे मी बऱ्याचदा तिचे फोटो पाहिले होते पण फोटो पेक्षा समोर ती काही वेगळीच दिसत होती. तिचे ते सौंदर्य माझ्या काळजात घर करून गेलं.

तिने छान पंजाबी ड्रेस घातला होता. तिचे ते वाऱ्याने उडणारे केस हळूच घेऊन ती कानाच्या वर खोचत होती. पण तरीही तिच्या केसाची एक बट सारखी वाऱ्याने उडत होती. जणू काही माझ्या मागे छान बॅकग्राऊंड संगीत वाजत आहे आणि आजूबाजूला कुणीच नाही ती एकटीच उभी आहे. असाच भास मला होत होता. त्यात तिने चष्मा लावला होता. काय मस्त धापणी दिसत होती विशू. खरंच तिचे ते सौंदर्य एवढं भारी होत की मी आतून खूप घाबरलो होतो. कसा जाणार तिच्यासमोर हाच विचार करत होतो.

तरीही मी मनाची हिम्मत केली, बाईकला किक दिला आणि गाडी सरळ नेऊन तिच्यासमोर थांबवली. काय विशू मॅडम आज कसं काय इकडं रस्ता चुकलात (आतून मी खूप घाबरलो होतो पण तरीही काहीतरी बोलायचे म्हणून बोलून गेलो) अरे मनी मी क्लास लावत आहे इथे म्हणून आले होते. तुला सांगणार होते पण आधीच सांगितले असते तर मग तुझ्या चेहऱ्यावर असे गोड हसू पाहता नसते आले ना? अग आधी सांगितले असते तर मी सुद्धा आलो असतो ना तुझ्यासोबत? बर जाऊदे तुझे काम झालं का मग? हो ग बघ आताच आले सर्व प्रोसेस करून. सोमवार पासून मी रोज येणार.

तिचे ते बोलणे ऐकून मनाला खूप बरं वाटलं होतं.पण मी दाखवून दिले नाही. आमच्या त्या बोलण्यात ती जास्त बोलत होती आणि मी खूप कमी बोलत होतो. काय रे काय मान खाली घालून बोलतोय? चाटमध्ये किती बोलतोय आणि समोर मात्र काहीच नाही. अग विशू असे काही नाही असं थोड पहिलीच भेट आहे ना म्हणून. चल आपण मॅकडी मध्ये बसायचं का? नाही रे आता नको आधीच उशीर झाला आहे. नंतर कधीतरी आता तर रोज येणं जाणं होणारच आहे ना.

हे बोलून ती तिथून निघून गेली. जाताना मला शेक हॅण्ड करून गेली. तिचा तो पहिला स्पर्श माझ्या अंतरमनात खोलवर रुतला होता. ती तिथून निघून गेली आणि पुढील पाच मिनिटे मी तिथेच उभा होतो. तिथून जायची इच्छाच होत नव्हती. डोक्यात सारखी रोमँटिक गाणी भूनभूनत होती. कदाचित मला ती आवडू लागली होती.

आता ती रोज क्लासला येते आणि आम्ही रोज भेटतो. एकदिवस न चुकता आम्ही आमच्या ठरलेल्या वेळेत भेटतो. ती माझ्या सोबत असली की सर्व लोक माझ्याकडे आधी बघतात जसे काय मी वेगळाच दिसत आहे. त्यांना असेच वाटतं असेल की ह्याला एवढी सुंदर मुलगी कशी पटली. पण त्यांना काय माहित आमची घट्ट मैत्री आहे. हा माझे तिच्यावर प्रेम आहे पण एवढ्या दिवसात आम्ही भेटल्यानंतर तिने तिच्या आयुष्यात घडलेल्या भूतकाळ मला सांगितला आहे. प्रेमात तिला खूप मोठा विश्वासघात मिळाला आहे. त्यामुळे तिला आता परत प्रेमात पडायचं नाहीये. एवढेच काय तिचे असेही म्हणणं आहे मी आता मी लग्न ही करणार नाही.

तिच्या सोबत राहून मला एक गोष्ट कळली की मला दिवसभर कितीही थकवा असला, कामाचे टेन्शन असले पण तिचा चेहरा पाहिल्यावर सर्व विसरून जातो. ती मला खूप चांगला मित्र मानते. त्यामुळे मला आता तिला गमवायचं नाहीये. मित्र होऊन का होईना पण मला तिच्या आयुष्यात राहायचं आहे. मला माहित आहे माझा निर्णय चुकीचा आहे. कदाचित मी तिला माझ्या प्रेमाची कबुली दिली तर ती हो सुद्धा म्हणेल.पण जर ती नाही म्हणाली तर मात्र तिला माझ्या आयुष्यातून लांब जाण्याचे दुःख मी कधीच पचवू शकणार नाही.

तिच्या चेहऱ्यावर तिचे हसू टिकवण्यासाठी मी काहीही करेल हे तिला चांगले माहित आहे. कदाचित ती ही कधीतरी म्हणेल माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे? कदाचित म्हणणार सुद्धा नाही. पण मला तिची सोबत हवी आहे. प्रत्येक नातं प्रेमाचे असलेच पाहिजे असं काही नाही. मैत्रीचं नातं प्रेमापेक्षा खूप घट्ट असतं. मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे एक नातं असतं असं म्हणतात आणि माझ्या आयुष्यात त्या नात्याची साक्ष ती आहे.

तुमच्याही प्रत्येकाच्या आयुष्यात कुणी एक अशी खास मित्र मैत्रीण असेल. जिच्यावर तुम्ही खूप मनापासून प्रेम करू शकता पण मनातल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. असे केल्यास तुम्हालाही भीती असेल की मैत्री तुटेल. जगातील अनेक नाती ह्याच भीतीमुळे कधी पुढे जात नाही. हेच सत्य आहे.

प्रेमाच्या ह्या कथा सुद्धा वाचा

  1. प्रेमाचा त्रिकोण
  2. कुंडली दोष
  3. पहिलं प्रेम आणि तिचं लग्न

लेखक : पाटीलजी

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल