यशस्वी पैलवान, अभिनेता, दिग्दर्शक,निर्माता, लेखक, राजकारणी अशा अनेक क्षेत्रात आपला ठसा उत्कृष्टरित्या उमटवणारे मोजकेच कलाकार आपल्याला माहीत असतील. त्यापैकी एक म्हणजे आपले सर्वांचे लाडके दारा सिंग. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी यशाची खूप सारी शिखरे गाठली. म्हणूनच भारतात त्यांना आयरनमैन ऑफ इंडिया ह्या नावाने ओळखले जाते. बॉलीवुड मध्ये अँक्शन किंग म्हणून ओळख असणाऱ्या दारा सिंग ह्यांचं आयुष्य कसे होते आज आपण पाहूया.
पंजाब मधील रतनगड गावात त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२८ मध्ये झाला. पहिल्यापासून त्यांना मैदानी खेळात जास्त रस होता. ड्रम तयार करणाऱ्या कंपनीत जेव्हा ते सिंगापोर मध्ये आले. तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचे गुरू हर्मम सिंघ ह्यांच्याकडून कुस्तीची तालीम मिळाली. ६.२ अशी उंची असलेले आणि मजबूत शरीरयष्टी असलेले दारा सिंग कुस्तीत करियर करायचे स्वप्न पाहू लागले होते.
१९५४ मध्ये रुस्तम ए हिंद म्हणजेच चॅम्पियन ऑफ इंडिया ही स्पर्धा त्यांनी आपल्या नावावर केली. त्याखाली विख्यात अशा टायगर जोगिंदर सिंघचा त्यांनी पराभव केला होता. त्याचबरोबर १९५९ मध्ये सिल्व्हर कप महाराजा हरी सिंग जिंकला. कोलकत्यात झालेल्या कॉमन वेल्थ गेम्स मध्ये त्यांनी जॉर्ज गोर्डीएन्को ह्याला पराभूत करून मेडल जिंकले. २९ मे १९६८ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन शिप मध्ये त्यांनी लॉ थेज ह्याला पराभूत केले होते. जून १९८३ मध्ये त्यांनी शेवटचा सामना खेळून निवृत्ती घेतली.
ह्या काळात त्यांनी अनेक चित्रपटात कामे सुध्दा केली होती. त्याकाळी सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते म्हणून त्यांची नोंद आहे. ते एका सिनेमासाठी चार लाख रुपये घेत असत. ते प्रत्येकाच्या घराघरात तेव्हा प्रसिद्ध झाले जेव्हा त्यांनी १९८० मध्ये रामायण ह्या मालिकेत हनुमानाची भूमिका केली. त्यांनी आपल्या कारकीर्दीत ७ पंजाबी सिनेमे सुद्धा दिग्दर्शित केले. बॉलीवुड मध्ये जव वी मेट तर पंजाबी मध्ये दिल अपना पंजाबी हे त्यांचे शेवटचे सिनेमे.
१९९८ मध्ये ते भारतीय जनता पक्षात सामील झाले. राज्यसभेत निवडून येणारे ते भारतातील पहिले खेळाडू होते. त्यांनी आपल्या आयुष्यात दोन लग्न केली आणि त्यांना सहा मुलं सुद्धा आहेत. ह्यात तीन मुलं आणि तीन मुलींचा समावेश आहे. ७ जुलै २०१२ मध्ये त्यांना मुंबई मधील कोकिळा बैन रुग्णालयात हृदयविकाराचा आला म्हणून भरती करण्यात आलं होतं. पण १२ जुलै २०१२ मध्ये त्यांचा मृत्य झाला.
त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात काम केलं त्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाने एक वेगळी ओळख निर्माण केली. अशा दिग्गज कलाकाराला आपले त्रिवार अभिवादन.