मम्मी आज अजय घरी येतोय अभ्यासाला, त्यासाठी काही चांगले खायला बनव, मागच्या वेळी मोमोज केले होतेस ना ते त्याला खूप आवडले होते, संपूर्ण कॉलेज मध्ये त्याने ही गोष्ट पसरवली होती, किती बरं वाटतं होत ग मम्मा. अग हो हो सारा किती स्तुती करशील. मी आज त्याच्यासाठी बिर्याणी करते. पण सांगू नको हे आधीच त्याला.
सारा आणि मी मायलेकी नाही तर मैत्रिणी होतो. बऱ्याचदा आम्ही शॉपिंगला गेल्यावर माझे कपडे तिच पसंत करायची. तुम्हाला असेही वाटेल साडी वैगेरे तर असे नाही. मला आधीपासून जीन्स टॉप किंवा पंजाबी ड्रेस आवडत आला आहे. लास्ट टाइम साडी कधी परिधान केली होती आठवत सुद्धा नाही. मम्मी तुझ्यावर हा टॉप किती छान दिसेल ना, मम्मी तुला ही जीन्स किती सुंदर दिसेन ना? अशी माझी सारा नेहमीच काही ना काही सुचवत असे.
सारा दीड वर्षाची असतानाच नवऱ्याने मला घटस्फोट दिला. तेव्हापासून मी आणि सारा हेच माझे जग. आजही आठवतोय मला तो दिवस जेव्हा माझ्या ऑफिसचा पहिला दिवस होता आणि मी त्या दोन वर्षाच्या चिमुरडीला घेऊन ऑफिस मध्ये गेले होते. कधी बाजूच्या काकी कडे तर कधी ऑफिसच्या कलीग कडे तिला ठेऊन आज इथवर मजल मारली होती. स्वतः खंबीर राहून हे सर्व कमावले होते. अनेकांनी सल्ला दिला, दुसरे लग्न कर, छान दिसतेस, कुणीतरी नक्की मिळेल पण मला काळजी होती माझ्या मुलीची. ज्याप्रमाणे मला तो व्यक्ती स्वीकारेल त्या प्रमाणे तो माझ्या साराला स्वीकारेल का? की पडून राहील ती घरात कुठे आणि तिच्याकडे कुणी पाहणार सुद्धा नाही. म्हणून नकोच, नकोच ते दुसरे लग्न. म्हणून मी वेळोवेळी लग्नाला नकार दिला होता.
सारा आता बालिक झाली होती. तिच्या चेहऱ्यात आणि शरीरात सुद्धा बदल घडला होता. पण एक बदल तिच्यात प्रामुख्याने मी अनुभवला होता. तो म्हणजे शाळेत किंवा आता कॉलेज मध्ये जाताना कधीही ती आरशात सुद्धा पाहत नव्हती. पण काही महिने झाले मी पाहतेय तो रोज घरातून निघताना अनेकदा त्या आरशासमोर राहून मी कशी सुंदर दिसेल ह्याकडे लक्ष देते. मला बऱ्याचदा वाटले की विचारावे तिला, कुणी मुलगा आवडू लागला आहे का? कुणासाठी चालू आहे एवढा मेकअप? पण एक मन ह्या गोष्टीची परवानगी देत नव्हतं.
आज बऱ्याच दिवसांनी आम्ही गार्डन मध्ये बसलो होतो. ती आपल्याच विचार दंग होती. मी तिचा हात हातात घेऊन समोरील उडणाऱ्या फुलपाखराकडे पाहत होते. इतक्यात तिने मला विचारले मम्मी अजय कसा वाटतो ग तुला? तिच्या ह्या प्रश्नाचे उत्तर मी काय देऊ आणि कोणत्या अर्थाने देऊ हेच कळले नाही. मग तिनेच विषय पुढे सरसावत म्हणाली, मला अजय खूप आवडतो ग मम्मी. त्याचा सहवास, त्याचे सोबत असणे मनाला एक वेगळं समाधान देत. कदाचित ती सुद्धा अजयला आपला Crush मानत होती.
खरतर ह्या आयुष्या च्या वळणावर कुणाबद्दल काही वाटणं स्वाभाविक होतं. म्हणून मी हसून तिला काहीच म्हटलं नाही पण ती मात्र तिच्याच प्रेम दुनियेत हरवली होती. आज अजय घरी आला होता. दोघेही त्यांच्या रूम मध्ये बसून अभ्यास करत होते. मी जाऊन दोघांना चहा दिला. खरंच किती छान आहे हा चहा, अगदी तुमच्या सारखा असे त्यांनी मला Compliment दिली. सारा ने सुद्धा मोठ्या तोरात तेव्हा म्हटलं होतं, मम्मी कुणाची आहे. दोघे सोबत खरंच खूप छान वाटत होते.
काही दिवस झाले साराच्या चेहऱ्यावरील हसू गायब झालं होतं. तासनतास आरशासमोर उभी राहणारी सारा एकदाही आरशा कडे फिरकत नव्हती. ते विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावरील हरवलेलं तेज पाहून मला खूप वाईट वाटले. मी अनेकदा त्या मागचे कारण विचारण्याचा प्रयत्न केला पण सर्व निष्फळ ठरला. दोन आठवडे निघून गेले होते. आता सारा कॉलेज, घर आणि तिची रूम बस एवढेच करत होती. दिवसभर कॉलेज मध्ये काय काय घडले हे सांगणारी सारा आता एक शब्दही माझ्याशी बोलायला तयार नव्हती.
मीच विषय काढला आणि म्हटलं बाळा उद्या रविवार आहे तर अजयला घरी बोलावं आपण मस्त बिर्याणीचा बेत करूया. पण ती चिडली म्हणाली काही अजय वैगेरे येणार नाही आणि पार्टी होणार नाही. समजले मम्मा. आज पहिल्यांदा ती माझ्यावर एवढी आवाज चढवून बोलली होती. मी तिला विचारले की नक्की झालेय काय? अजय काही बोलला का? ठीक आहेस ना बाळा तू? मम्मी तू हे असे कपडे का घालते? इतर लोकांच्या आई प्रमाणे साडी का घालत नाहीस? खरतर तिच्या ह्या असंख्य प्रश्नांमुळे मी स्तब्ध झाले होते.
नेहमी मम्मी हे घाल, मम्मी हे तुला छान दिसेल, ब्लू जीन्स वर रेड टॉप तुला किती छान वाटेल ना मम्मा म्हणणारी माझी मुलगी आज अचानक अशी का बोलत आहे. मी तिला ह्या गोष्टीचे कारण विचारले तर ती अजून जास्त चिडली. मम्मी तुला माहीत आहे अजय आपल्या घरी का येत होता? त्याला मी आवडत आहे म्हणून नाही तर त्याला तू आवडतेस म्हणून, बस.. तिच्या हा शब्दांनी बंदुकीच्या वेगाने येणारी गोळी काळजातून आर पार जावी असा काही भास मला झाला.
खरतर मला माझे टीनेजर आयुष्य आठवले. मी सुद्धा अशीच होती. मलाही माझे इंग्रजी विषयाचे शिक्षक आवडू लागले होते. मी सुद्धा त्यांना माझे Crush मानत होते. हे वयच असे असते की डोळ्या समोर सतत असणारी व्यक्ती आपला क्रश कधी होते हे आपल्याला सुद्धा कळत नाही. पण जसजसा वेळ पुढे सरकत जातो आपल्या आवडी निवडी बदलू लागतात. मी साराला सुद्धा ह्या गोष्टीचा जाणीव करून दिली. तिला वेळ गेला ह्या गोष्टी समजून घ्यायला पण तिने सर्व हळूहळू समजून घेतलं.

अजय आता पुन्हा घरी येऊ लागला होता. माझ्यापेक्षा जास्त तो साराला वेळ देत होता. पाहून खूप छान वाटत होत पण मनात अजूनही भीती कायम होती. पुन्हा एकदा मनात विचार येत होते की अशी वेळ आयुष्यात पुन्हा येऊ नये. ही कथा सुद्धा वाचा वीस वर्षांनी गावी गेले आणि पुन्हा एकदा त्याच जुन्या आठवणी डोक्यात घर करू लागल्या.
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)