तुम्ही या परिस्थितीमध्ये असता तर काय केलं असतं. एखादी व्यक्ती आपल्याला स्वीकारतही नाही, आणि आयुष्यात पुढेही जाऊ देत नाही. कदाचित माझ्यासारखं खूप लोकांसोबत होत असेल, अशा परिस्थितीत तुम्ही काय केलं असतं आयुष्यात पुढे गेला असतात की वाट बघितली असती.
संकेतची आणि माझी ऑफिसमध्ये भेट झाली, त्यामुळे कामाच्या निमित्ताने नेहमी बोलणं व्हायचं, पण असं एकमेकांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल बोलू असं कधीच वाटलं नव्हतं. आम्ही जास्त चॅटवरच बोलायचो आणि बाहेर भेटणं अगदी क्वचितच व्हायचं. पण मी खूप जास्त मोकळेपणाने बोलू शकायची. तो सोबत असताना, अगदी कोणत्याही गोष्टीबद्दल मला बोलता यायचं त्याच्याशी. असं कधीच वाटलं नाही की बोलण्याअगोदर विचार करायला हवा.
या अगोदर कोणाबद्दल मला अस कधी वाटलं नव्हतं, खूप छान वाटायचं त्याला भेटणं, त्याच्याशी बोलणं. प्रेम होतं की आणखी काही माहीत नाही, पण तो आवडू लागला होता मला. म्हणून एकदा हिम्मत करून त्याला सांगायचं ठरवलं.
खूप गोंधळ उडाला होता मनात, मी जसा त्याच्याबद्दल विचार करतेय तसाच तोही करत असेल का? त्याच्या मनात दुसरं काही असेल तर? त्याला मी आवडत असेन की नाही? असे खूप सारे प्रश्न होते.
पण म्हटलं एकदाच काय ते बोलून मोकळं व्हावं मग पुढचं पुढे. म्हणून मग आम्ही एका बागेमध्ये भेटलो. मला नव्हतं माहिती असं समोरा समोर भेटून एखाद्याला स्वतःच्या मनातली गोष्ट सांगणं एवढं अवघड असेल, असं वाटत होतं सगळे शब्द कुठेतरी अडकून राहिले आहेत.
संकेतलाही जाणवलं की मी पहिल्यांदा बोलण्याअगोदर एवढा विचार करतेय. मग म्हटलं बस झालं जेवढा विचार करायचा होता तेवढा करून झाला आता बोलायलाच हवं, आणि मी त्याला सांगितलं की ‘ तू आवडतोस मला ‘.
असं नाहीए की त्याला या गोष्टीची अगदीच कल्पना नव्हती. त्यालाही माझ्या मनातल्या भावना थोड्याफार कळत होत्याच पण त्याबद्दल तो काहीच करू शकत नव्हता. संकेतला एखादी परिस्थिती कशी सांभाळायची हे चांगलच ठाऊक होतं.
माझं सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर त्याने एका मोठा श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. त्याने खूप साऱ्या गोष्टी मला समजावल्या आणि थोडक्यात त्यालाही मी आवडते पण त्याला कोणत्याही नात्यामध्ये नव्हतं राहायचं. कारण त्याचा या सगळ्या गोष्टींवरचा विश्वास उडाला होता.
मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की, सगळ्या व्यक्ती सारख्या नसतात, एकदा आलेला अनुभव दरवेळी तर नाही येणार ना, पण कदाचित त्याचं मत खूपच ठाम होतं.
त्या दिवशीनंतर देखिल खूप वेळा आम्ही या विषयावर बोललो, मला त्याच्याबद्दल काय वाटतं हे खूप वेळा त्याला समजावून देखिल सांगितलं. त्यानंतर मला असं वाटलं की या एका गोष्टीबद्दल आमचं एकमत होणं अशक्य आहे. तो त्याच्या मतांवर ठाम होता आणि मी माझ्या.
मग शेवटी मीच ठरवलं की बस झालं आता, एखाद्याला आपल्यामध्ये गुंतवून ठेवणं किंवा एखाद्यामध्ये गुंतून राहणं आपल्यासाठीच वेदनादायक ठरेल त्यापेक्षा आपण आपल्या आयुष्यात पुढे जाणच योग्य आहे.
माहीत नाही का पण जे आपल्याला मिळत नाही तेच का हवं असतं. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असलीच पाहिजे अशी जबरदस्ती आपण नाही करू शकत.
संकेतला मी सांगितलं की माझ्यासाठी हे सगळं सोप्प नाहीए. त्यामुळे आपण यापुढे फक्त कामानिमित्तच बोलूया, आणि ही गोष्ट त्यानेही मान्य केली. पण खरंतर मला असं वाटत होतं की हे ऐकल्यावर त्याने त्याचा निर्णय बदलावा पण तसं झालं नाही, मग मीही त्याच्या निर्णयाचा आदर केला.
मी प्रयत्न करत होती सगळं विसरण्याचा, स्वतःला कामामध्ये गुंतवून घेत होती. पण या सगळ्यामधे एक विचित्र गोष्ट घडत होती, संकेत थोडा वेगळाच वागत होता, त्याचं वागणं विचित्र होतं की माझ्या समजण्यामध्ये चूक होत होती. माहीत नाही पण कळत नकळत तो मला आशेवर ठेवत होता, त्याच्या वागण्या बोलण्यातून तो मला काहीतरी इशारे देत होता की तस काहीच नव्हतं. मला काहीच कळत नव्हतं.
एके दिवशी मला ऑफिसवरून घरी जायला उशीर झाला होता १०.३० वाजले होते आणि जवळ जवळ सगळेच निघून गेले होते, मी ऑफिसच्या गेटजवळ पोहोचली तर तिथे संकेत उभा होता. त्यालाही कदाचित निघायला उशीर झाला असेल? मी कामामध्ये एवढी गुंतली होती की मला कळालच नाही तो कधी ऑफिसमधून बाहेर पडला.
तो तिथे माझी वाट बघत उभा होता, माझी काळजी वाटली म्हणून तो थांबला होता.
मला हे माहीत होतं की त्याने त्याचा निर्णय सांगितला आहे, त्यामुळे तिथे गुंतून राहण्यात काहीच अर्थ नव्हता आणि त्याउलट त्याचं वागणं होतं जे मला पुन्हा मागे खेचत होतं. माझा तर गोंधळ उडाला होता.
माझ्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं?
लेखिका सायली संकपाल
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा लिंक शेअर करायला हरकत नाही.
ह्या कथा पण वाचा