आज खूप जास्त बोर वाटतं होतं. का कुणास ठाऊक पण कशातच मन रमत नव्हते. सिनेमाला जाऊया का? हा विचार मनात आला आणि मित्रांच्या ग्रुपमध्ये मेसेज केला. कुणी ऑफिसमधे होते तर कुणी शहराच्या बाहेर. मग विचार केला चला आज आपण एकटेच सिनेमाला जाऊया. तसेही कॉलेजमध्ये असताना अनेक सिनेमे एकट्याने पाहिलेच आहेत की, मग तीच पुनरावृत्ती आज करूया म्हणून मोबाईल हातात घेतला.
ओरियन मॉल पनवेलमध्ये सिनेमा पाहण्याचा आमचा नेहमीचा अड्डा पण आज एकटा चाललो आहे म्हणून थोडं वेगळं वाटतं होतं. हल्ली एकटं कोण मूवी पाहतं? त्यात रात्रीचा ११ चा शो म्हटल्यावर एवढी गर्दी नसणार आणि आरामात सिनेमा पाहणार म्हणून मी पार्किंग मधून कार बाहेर काढली. ऑनलाईन पाहिले तर रात्री अकरा वाजता थोर लव अँड थंडर सिनेमा लागला होता.
मार्वेल सिनेमांचा चाहता मी खूप आधी पासून आहे त्यामुळे प्रत्येक मार्वेलचा येणारा सिनेमा मी आवडीने पाहतो. मॉलच्या पार्किंगमध्ये गाडी लावण्यासाठी कुठे जागाच मिळतं नव्हती. एवढ्या रात्री सुद्धा सिनेमा पाहायला एवढी लोकं आलीत हे पाहून हैराण होतो. नशिबाने समोर एक जागा दिसली, गाडी तिकडे पार्क करणार तोपर्यंत एका मुलीने स्कूटी येऊन तिथेच पार्क केली. मी काच खाली करत त्यांना आवाज दिला, “वो हॅलो.. मॅडम.. इथे फौर व्हीलर पार्किंग आहे. टू व्हीलर तिथे मागे आहे.”
तिने आपल्या डोक्यावरून हेल्मेट बाजूला करत बांधलेली ओढणी सोडत म्हणाली, “मी सर्व कडे पाहिले कुठेच जागा नाहीये, मला इथे जागा मिळाली, मी गाडी पार्क केली. आता तुम्ही दुसरी जागा शोधा.” असे म्हणत माझ्या उत्तराची वाट न पाहता ती सरळ तिथून निघून गेली. काय ह्या आजकालच्या मुली म्हणत मी दुसरीकडे जागा शोधायला सुरुवात केली. काही वेळाने जागा मिळाली आणि मी हुश्श म्हणत थेटर गाठले.
रात्री अकराचा शो असल्याने गर्दी कमी असेल असे वाटत होतं पण इथे तर जनसागर उसळला होता. “एवढी गर्दी तर दिवसा नसते” असे म्हणत मी आतमध्ये शिरलो. एका हातात पाण्याची बॉटल आणि दुसऱ्या हातात मोबाईल घेऊन मी माझी सीट शोधून काढली. सिनेमा सुरू व्हायला अवकाश होता. मी आजूबाजूला पाहिले तर कुणी आपल्या कुटुंबासोबत आलं होतं तर कुणी आपल्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड सोबत. लहान मुलांची किलबिल चालूच होती.
माझ्या उजव्या बाजूला एक वयोवृद्ध जोडपं बसलं होतं. या वयात त्यांचे प्रेम पाहून मनातून खूप छान वाटतं होतं. माझ्या डाव्या बाजूची एक सीट अजून खाली होती. मला कळून चुकलं होतं की इथे येणारा माणूस तो ही एकटाच सिनेमा पाहायला येणार कारण ती एकच सीट आमच्या रो मध्ये बाकी होती.
सिनेमा सुरू झाला, पण अजून त्या सीटवर कुणी आलं नव्हतं. इथे कुणी येणार नाही म्हणून मी आणलेली बिसलेरी बॉटल त्या सीटवर ठेवून आरामात सिनेमा पाहू लागलो. एवढ्या मागून आवाज आला. Excuse me तुमची बॉटल उचलता का जरा ही माझी सीट आहे. मी वर पाहिले तर डोळ्यावर विश्वास नाही बसला. ही तर पार्किंग वाली मुलगी असे म्हणत मी बाटली बाजूला करत तिला बसण्यासाठी जागा दिली.
तिने मला ओळखले आणि नाक मुरडलं. “मुलींचा स्वभावच असा असतो” असे मी स्वतः सोबत पुटपुटलो. पण तिने ते ऐकलं. “काही म्हणालात का?” “नाही मी काहीच म्हटलं नाही” असे म्हणत सिनेमा पाहू लागलो. पण माझे लक्ष सिनेमाकडे कमी आणि त्या मुलीकडे जास्त होते. कारण तिची होणारी चलबिचल मला दिसत होती. ती ज्या सीटवर बसली होती, तिच्या समोर बसलेला मुलगा उंच होता त्यामुळे तिला सिनेमाची स्क्रीन दिसत नव्हती.
“या तुम्ही माझ्या सीटवर बसा मी तिथे बसतो” असे म्हणत मी पुढाकार घेतला. कारण माझीही उंची असल्याने मला तिथे बसून सुद्धा स्क्रीन चांगली दिसणार होती. तिने मला स्माईल देत माझ्या सीटचा कब्जा मिळवला. आता ती रिलॅक्स वाटतं होती. मी निरखून तिच्याकडे पाहिले तर तिचा चेहरा अंधारात नीटसा दिसत नव्हता पण तिच्या ओठांवर असलेला तीळ तिच्या सौंदर्यात भर टाकत होता.
पार्किंगमध्ये मला तिचा राग आला होता पण आता मात्र एक लहान मुलगी वाटतं होती. इच्छा तर होती बोलावं तिच्याशी पण सुरुवात कशी करणार या विचाराने मी गप्पच बसलो. पण मी काहीच बोलत नाही बहुदा हे तिने ओळखले असावे म्हणून तिनेच विषय काढला?
“तुम्हालाही एकटे मूवी पाहायला आवडतं का?”
“तुम्हाला म्हणजे तुम्हालाही असेच आवडते का?”
“हो.. मला मूवी पाहायला खूप आवडतं. पण दिवसा ऑफिसच्या कामामुळे वेळ नाही मिळत मग असे रात्री यावं लागते. त्यात माझी रूम मेट नाईट शिफ्टला गेली आणि मला फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा होता. मग एकटीच आले.”
“माझेही काहीसे असेच आहे. एकटे मूवी पाहण्यात सुद्धा एक वेगळीच मज्जा असते.”
“हो ना.. आणि पैसेही वाचतात.”
असे म्हणत ती हसू लागली आणि मलाही हसू आलं.
तिच्याशी बोलणं मला आवडू लागलं होतं. आता माझे संपूर्ण लक्ष तिच्याकडे होतं. सिनेमा फक्त मागे सुरू आहे आणि आम्ही बोलतोय असे वाटतं होतं. मला तिला पूर्णपणे पहायचं होतं पण अंधारामुळे ती पूर्णपणे दिसत नव्हती. एवढ्यात सिनेमाचा मध्यांतर झाला. मी तिला विचारलं तुम्हाला काही आणू का? तेव्हा ती नो thanks म्हणत उठून बाहेर पडली. तिच्यामागे मी सुद्धा उठलो पण त्या गर्दीत ती पुन्हा हरवली.
मी फ्रेश होऊन पॉपकॉर्नच्या लाईनमध्ये उभा राहिलो. तर या मॅडम सुद्धा पुढे उभ्या होत्या. मी विचार केला हाक मारू का? पण मला अजून तिचं नावही माहीत नव्हतं. म्हणून गप्प बसलो. बराच वेळ झाला तरी ती काउंटर समोर उभी होती, काहीतरी झालंय म्हणून मी पुढे सरसावलो. मी विचारलं, “काय झालं?”
“अरे माझी पर्स गाडीच्या डिकीत राहिली आणि इथे माझा गुगल पे पण चालत नाहीये.”
एवढेच ना, थांब मी देतो पैसे.”
“अहो नको, राहुद्या मी नाही घेत काही”
“अहो असूद्या काही होत नाही.” असे म्हणत मी माझा कार्ड पुढे सरसावला.
हातात पॉपकॉर्न, कोक, आणि एक सँडविच घेऊन ती बाहेर पडली. मी फक्त पॉपकॉर्न घेतले आणि तिच्याच सोबत बाहेर आलो.
“ऐका ना.. बाहेर पडलो की मी तुम्हाला पैसे परत देईल हा, प्लीज जाऊ नका. मला नाही बर वाटलं तुम्ही माझी पैसे भरलेत ते.”
“हो चालेल की मी घेईन पैसे पण एका अटीवर.”
“कोणत्या?”
“तुम्ही मला अहो जावो नका ना करू? आपण सेम वयाचे आहोत. अरे तुरे केलं तरी चालेल मला.”
ती हसली आणि म्हणाली, “तू सुद्धा मला अहो जावो नाही केलेस तरी चालेल.”
आम्ही सोबत आतमध्ये जाण्यासाठी पुढे सरकावलो. मी तिच्याकडे या गडबडीत पाहण्याचे विसरूनच गेलो होतो. मी एक नजर तिच्याकडे टाकली. तर मिकी माऊसची टी शर्ट आणि जीन्स तिने घातली होती. त्यात डोक्याला बांधलेला तो हेअर बँड तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत होता. मी विचार करत होतो की आज कुणीच सोबत नव्हते सिनेमाला आणि ही अनोळखी मुलगी येऊन आजचा दिवस एवढा सुंदर करेल असे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं.
सिनेमा सुरू झाल्यावर तो फक्त मागे बॅकग्राऊंडला चालू होता. आमच्याच गप्पा संपतच नव्हत्या. या मध्ये मला कळलं की ती अकरा महिण्यापासून पनवेल मध्ये राहतेय. तिचे मूळ गाव कोल्हापूर आहे. घरात ती एक मुलगी आणि एक लहान भाऊ आहे. पप्पा शिक्षकी पेशात आहे तर आई गृहिणी आहे. इथेच एका ऑफिसमध्ये चांगल्या हुद्द्याची नोकरी मिळाली म्हणून तिने कोल्हापूर सोडून पनवेल गाठलं. आता त्या दोन मुली एकत्र राहतात. MBA फायनान्स करून पुढे अजून तिला शिकायची इच्छा आहे.
“किती बडबड करते ही” पण ही बडबड ऐकाविशी वाटतंय म्हणून मी फक्त तिचे बोलणे ऐकत होतो. पहिल्यांदा कुणा मुलीसोबत सिनेमा पाहायला आलोय असा फिल घेत होतो. एव्हाना सिनेमा कधी संपला कळलं सुद्धा नाही. तिने सांगितल्या प्रमाणे मी पार्किंगमध्ये तिच्या सोबत जाऊन पैसे घ्यायचे होते. एवढ्यात बाजूच्या वयोवृध्द आजोबांनी मला पकडून म्हटलं, बाळा जोडी छान आहे तुमची, पण खूप बोलते ती, अगदी माझ्या सरिता सारखी, आणि बायकोकडे पाहत खीदी खीदि हसू लागले.
तिने हे ऐकलं की नाही माहीत नाही पण मला असे वाटलं तिने हे ऐकलं आणि ती गालातच हसली. पार्किंगमध्ये गेल्यावर तिने तिच्या पर्समधून काही पैसे बाहेर काढून मला दिले. माझी अजिबात इच्छा नव्हती तिच्याकडून पैसे घेण्याची पण तिला वचन दिलं होतं म्हणून मी पैसे घेतले. पण या सर्व गप्पात मी एक गोष्ट विसरूनच गेलो होतो की तिची संपूर्ण बायो ग्राफी जाणून घेतली पण तिचं नाव विचारलेच नाही.
तिच्या नावा सोबत मला तिचा मोबाईल नंबर देखील हवा होता पण या दोन गोष्टी मी तिच्याकडून मागू शकत नव्हतो. मी तिचे नाव विचारणार एवढ्यात तिने गाडी स्टार्ट केली आणि निघून गेली. मी फक्त तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो. एवढा कसा मी बावळट? आता माझी परत भेट कशी होणार? यार असा कसा मी म्हणून स्वतः ला दोष देत राहिलो.
रात्री घरी येताना अडीच वाजले होते. पण मी तिला साधे नाव सुद्धा विचारले नाही याची खंत होती. तिने दिलेले पैसे खिशातून पॉकेट मध्ये ठेवण्यासाठी बाहेर काढले. तर पाहतोय काय एका पन्नासच्या नोटेवर काही लिहिले होते. Aali mothi shahani. आधी मला याचा अर्थ कळला नाही पण नंतर विचार केला तेव्हा थोडा डोक्यात प्रकाश पडला. हा हीचा सोशल मीडिया आयडी तर नसेल? म्हणून मी इंस्टाग्राम वर ते नाव सर्च केलं आणि पाहतो तर काय त्याच मॅडमचा हा आयडी. आणि मी फक्त तिच्या प्रोफाइल फोटो कढे पाहत राहिलो.
क्रमशः
कथेचा पुढचा भाग वाचायला आवडेल का? नक्की कळवा. १०० कमेंट जरी आल्या तरी या कथेचा पुढचा भाग लिहून काढेन.
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)