मुंबईतील एका २१ वर्षीय महिलेला लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याबद्दल एका व्यक्तीने चालत्या ट्रेनसमोर ढकलले. शुक्रवारी खार रेल्वे स्थानकात ही घटना घडली आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. खार येथील रहिवासी असलेली महिला वाचली परंतु त्यांच्या डोक्याला दुखापत झाली व १२ टाके देखिल पडले आहेत.
गुन्हा केल्यावर वडाळा येथील रहिवासी सुमेध जाधव हा घटनास्थळावरून पळून गेला. मात्र पोलिसांनी त्याला १२ तासांत पकडले. “त्या महिलेची आणि आरोपीची दोन वर्षांची ओळख होती कारण ते दोघे एकाच कार्यालयात काम करत होते. त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती परंतु अलीकडेच महिलेला समजले की आरोपी मद्यपी असून त्याच्यापासून दूर राहणेच चांगले.
तथापि, तो तिला त्रास देतच राहिला. या महिलेने त्याच्याविरूद्ध तक्रार देखिल केली होती पण तो तिचा पाठलाग करत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय चौगुले यांनी सांगितले.
शुक्रवारी संध्याकाळी अंधेरी स्थानक ते खार या ट्रेनमध्ये जात असताना सुमेधने त्या महिलेचा पाठलाग सुरू केला. जेव्हा ती खार येथे खाली उतरली तेव्हा तिने आपल्या आईला भेटून आरोपी तिच्या मागे लागल्याचे सांगितले.
सुमेध स्टेशनवर त्या दोन्ही महिलांना जाऊन भेटला आणि त्याच्याशी लग्न करावे आणि त्याच्याबरोबर यावे असा आग्रह धरला.
जेव्हा महिलेने नकार दिला तेव्हा सुमेधने आधी स्वत:ला जिवे मारण्याची धमकी दिली परंतु त्यानंतर त्या महिलेस ट्रॅककडे खेचू लागला आणि धावती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील अंतराच्या दिशेने ढकलले. या महिलेला दुखापत झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी घटनास्थळावरून पळून गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली.