“ताई इथे जवळपास बँक कुठं आहे?”
“का रे काय झालं? आताच आला आहेस ना थोड बस, मग जा बाहेर. एकतर बहिणीकडे यायला तुला वेळ नसतो आणि आज भाऊबीजेला आलाच आहेस तर लगेच कुठे निघालास? गप्प बस इथे शांत. तुला तुझ्या आवडीचा असा स्पेशल चहा देते बनवून आणि हो बाहेर जर त्या कावेरीला बघायला जात असशील तर आताच सांगतोय तिचं लग्न होऊन आठ महिने झाले.” असे म्हणत ताई हसतच किचनमध्ये निघून गेली.
“अग ताई, माझ्या पॉकेट मध्ये काहीच पैसे नाहीयेत सध्या जरा ATM मधून पैसे काढून येतो. त्यात माझी भाची उठली तर तीलापण खाऊ द्यावे लागेल. म्हणून जातोय. जिजूच्या बाईकची चावी दे जरा.”
“तिथे समोर टीव्ही जवळ आहे बघ आणि सावकाश जा.” ताई म्हणाली.
मी गाडीला किक देत नाक्यावर पोहोचलो. आज भाऊबीज असल्याने खूप वर्दळ होती. पार्किंगला जागा शोधून मी ATM गाठलं. इथे सुद्धा गर्दी असल्याने लाईनमध्ये थांबून पैसे काढून परत गाडीजवळ आलो. पण आज मात्र सर्व मनासारखं होत नव्हतं. बराच प्रयत्न केला तर जिजूची गाडी काही स्टार्ट होत नव्हती. पाच पंधरा आणि मग अर्धा तास झाला तरी गाडी काही स्टार्ट होईना. या कडक उन्हाने अंगाची पूर्ण लाहीलाही झाली होती.
आजूबाजूचे लोक पाहून हसत होते. थोडं विचित्र तर वाटले पण काही पर्याय नव्हता. एक कपल बाजूच्या गाडीवर बसून माझं परिश्रम उघड्या डोळ्याने पाहत होते. अखेर त्याने न राहून विचारले “मी काही मदत करू का?” मी आशेने त्याच्याकडे पाहिले तर माझीच मला लाज वाटली.
कारण ते कपल मी आणलेल्या जिजूच्या गाडीवर बसले होते आणि मी इथे अर्ध्या तासापासून दुसऱ्याच कुणाचं सेम दिसणारी गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत होतो. मी गप्प जाऊन त्याला म्हणालो तुम्ही ज्या गाडीवर बसला आहात तीच माझी गाडी आहे. मी गाडीला किक मारत तिथून लगेच पळ काढला. मागे वळून सुद्धा पाहिले नाही. 🤪
तुमच्या सोबत घडलं आहे का कधी असं? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.
लेखक : महेंद्र पाटील (पाटीलजी)
आवरे, उरण रायगड.