हॅलो कसा आहेस? कोण बोलतेय? ह्म्म.. माहीत आहे नाही ओळखणार किंवा ओळखून सुद्धा न ओळखण्या सारखे करणार तू! आरती बोलतेय. हे ऐकताच माझा फोन माझ्या हातून खाली पडला. आरती..माझी आरती. बऱ्याच वर्षांनी तिचा आवाज ऐकला मी आज. त्या आवाजाने मला भूतकाळात कधी खेचून नेलं हे माझे मलाच कळलं नाही.
आरती आणि मी एकाच गावातले पण तरीही एकाच गावातले नसलेले. आमचे गाव हे कुटुंब प्रधान गाव म्हणून पंचक्रोशीत नावाजलेले होते. एक गाव असून दोन विभाग गावात पडलेले होते. ह्या भागातला माणूस त्या भागात जात नसे आणि त्या भागातला माणूस कधी इकडे फिरकत सुद्धा नसे. पण तरीही तालुक्याच्या कॉलेजमध्ये आमची गाठ भेट व्हायची पण तिथेही एकमेकात कुणाचे बोलणे होत नसे. हा आमच्याच गावातला मुलगा किंवा मुलगी आहे हेच मुळात आम्हाला माहीत नसायचे. जरी माहीत असले प्रत्येकाला बोलायची इच्छा तर असली तरी घरातल्या मोठ्या माणसांच्या दबावाखाली असलेली मुले बोलणे टाळत असतं.
आरती त्या भागातली होती पण ती तालुक्याच्या शाळेत माझ्याच वर्गात होती. जेव्हा तिला पहिल्यांदा मी पाहिले तेव्हाच तिला हे छोटेसे हृदय देऊन बसलो होतो. जेव्हा तिला पाहिले होते तेव्हा मला अजिबात हे माहीत नव्हते की ती माझ्याच गावची आहे. कारण गावाच्या त्या बाजूला आमचे कधी येणे जाणे होतच नसे. तिलाही मी माहीत नव्हतो की तिच्याच गावचा आहे. म्हणता म्हणता आमच्यात आधी मैत्री आणि मग प्रेम कधी झाले हे आमचे आम्हाला सुद्धा कळलं नाही.
कॉलेज बंक करून एक दिवस आम्ही सिनेमा पाहायला गेलो होतो. दोघांचा राजा राणीचे प्रेम आम्ही अनुभवत होतो. पण सिनेमागृहाच्या बाहेरच तिच्या मामाच्या मुलांनी आम्हाला पाहिले. अचानक येऊन त्यांनी मला खूप मारलं आणि तिला ओढत घरी घेऊन गेले. मी बेशुद्ध पडलो होतो. जेव्हा जाग आली तेव्हा आई डोक्याजवल बसली होती. डोळे उघडताच बाबा रागात जवळ आले आणि माझ्या दोन सणसणीत कानाखाली देऊन मोकळे झाले.
आधी हे मला काहीच कळत नव्हते काय झाले आहे पण मग मात्र कळलं की मी आरती त्या बाजूची मुलगी आहे. म्हणून तिच्या घरच्यांनी मला मारले आणि त्याच कारणाने वडिलांनी सुद्धा मला मारले. त्या दिवसापासून दहा दिवस तरी माझा आरती सोबत कॉन्टॅक्ट झालाच नाही. ना ती कॉलेजमध्ये येत होती ना तिचा फोन चालू होता. अखेर मित्राने बातमी दिली की घरच्यांनी तिलाही खूप मारले आणि शहरातील मुला सोबत तिचे लग्न जमवलं आहे. तिचा आज हळदी समारंभ आहे.
मी क्षणाचाही विलंब न लावता रात्री त्या भागात शिरलो. तिच्या लग्नासाठी भलामोठा मंडप तयार केला होता. मी सर्वांची नजर चुकवत तिच्या रूममध्ये शिरलो. ती शांत आरशासमोर बसली होती. मी हळूच जाऊन तिचा हाथ हातात घेतला. मला तिथे पाहून तिचा आश्रुंचा बांध फुटला आणि ती मला मिठी मारून रडू लागली. मी तिला शांत केले. हे बघ आरतू हीच वेळ चल आपण पळून जाऊन लग्न करू. दोघेही कुठे लांब जाऊन आपल्या संसाराला सुरुवात करू.
आरती मात्र स्तब्ध उभी होती. नाही महेंद्र आपण आज पळून जाऊन लग्न करून पण ही नालायक माणसे आपला शोध घेऊन परत आपल्याला वेगळे करतील. वेळ प्रसंगी आपल्याला मारूनही टाकतील आणि मला माझ्या जीवाची पर्वा नाहीये रे पण तुला काही झाले तर ते दुःख मी नाही पचवू शकणार.
मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने माझे ऐकलेच नाही. तिचेही म्हणणे बरोबर होते हे मला पटत होते पण तीच्यावाचून राहणार कसा मी? हा प्रश्न माझ्या मनाला त्रास देत होते. अखेर मी तिथून जायला निघालो माझ्या पाठमोऱ्या शरीराकडे ती बघत होती. मी मागे वळून पाहिले, माझ्या डोळ्यातले अश्रू तिला दिसत होते. तिने धावत येऊन मला घट्ट मिठी मारली. माझ्या ओठांना कडकडून चुंबन घेतलं. बस तीच आमची शेवटची भेट त्यानंतर ती मला कधीच दिसली नाही.
महेंद्र आहेस ना लाईनवर, हॅलो हॅलो असे आरती समोरून फोनवर बोलत होती. मी भूतकाळात एवढा हरवून गेलो की समोर ती फोनवर आहे हे विसरूनच गेलो.
कशी आहेस आरती? आज एवढ्या वर्षांनी आठवण आली का ग तुला माझी?
नाही रे महेंद्र तुला विसरेन तरी कशी रे, आपण दोघांनी खूप स्वप्न पाहिली होती सोबत, माहीत आहे ना?
हो ग पण त्या स्वप्नाचा चुराडा होताना सुद्धा आपणच पाहिले आहे की. असो आज कशी माझी आठवण झाली.
आठवण तर रोज येते पण स्वतःला बांधून ठेवले होते मी, मुद्दाम तुला कॉल करत नव्हते पण आज स्वतःवरचा ताबा सुटला. तुला खूप मिस करत होते. काय चालू आहे तुझ्या आयुष्यात हे जाणून घ्यायचे होते. कसा आहेस तू? सुखी आहेस ना?
तू गेल्यानंतर दोन वर्ष गेली मला ह्यातून बाहेर यायला पण नंतर स्वतःला सावरले. आता डॉक्टर झालो आहे. गावातच क्लिनिक टाकले आहे. घरचे म्हणत आहेत ह्या वर्षी लग्न कर म्हणून बघुया आम्हाला आमची आरती कुणी मिळतेय का?
मिळेल रे नक्की मिळेल बघ. माझ्याहून चांगली मिळेल. आणि तुझ्या आयुष्यात तू खुश आहेस हे ऐकुन खरंच खूप छान वाटले. आज एवढ्या नऊ वर्षांनंतर तुझा आवाज कानी पडला मन प्रफुल्लित झाले. पण आपली भेट होईल का रे ह्या पुढे?
ह्या प्रश्नांचे उत्तर मला तुम्हा सर्च वाचकांकडून हवं आहे. काय उत्तर असेल महेंद्रचे? सांगा तुम्हीच.
लेखक: पाटीलजी