सारखं मोबाईलकडे लक्ष जात होतं. न बघताच माहीत होतं की आई फोन करत असेल. पुन्हा तीच तेच लग्न पुराण चालू होणार म्हणून मी लक्ष दिलं नाही. पण तिने नऊ वेळा फोन केल्यानंतर अखेर मी फोन उचलला. ना हॅलो ना काही तिने सरळ मुद्द्याला हात घातला. “ऐक तुझ्या व्हॉट्सॲपवर एका मुलीचे फोटो पाठवले आहेत एकदा चेक कर, आपल्याला उद्या तिला पाहायला जायचं आहे. ऑफिस मधून सुट्टी घे आणि मला काहीच दुसरं कारण नकोय. उद्या आपण जातोय माझं फायनल आहे.” असे बोलून माझे उत्तर न ऐकताच फोन ठेऊन दिला.
आपल्या सर्वांच्या मातोश्री पण अशा असतात ना की एखादी गोष्ट ठरवली की ठरवली मग मागे नाही फिरत. मागील सात महिन्यांपासून आई माझ्या लग्नासाठी मागे मागे करत होती. बाबा मला जास्त काही बोलत नाही म्हणून आई आणि बाबा दोघांचे मिळून तीच मला थाऱ्यावर घ्यायची. पण आता तिला कोण सांगणार तिच्या या मुलाला आधीच कुणी आवडत होती आणि ती मला सोडून कुणा दुसऱ्याची झाली.
आईने पाठवलेले फोटो न पाहताच मी फोन बाजूला करत ठेऊन दिला. बऱ्याच दिवस नाही, नको, नंतर जाऊ, आता वेळ नाही अशी उत्तरे मी आईला देत होतो पण आता ती माझे काहीएक ऐकणार नव्हती हे मला माहीत होतं.
दुसरा दिवस उजाडला. ठरल्या प्रमाणे मी आई बाबा आणि माझ्या मावशीची मुलगी संगीता मुलगी पाहायला निघालो. मला हा कॉन्सेप्ट कधी कळलाच नाही की मुलगी का पाहिली जाते, ती काही शो ची वस्तू आहे का की येऊन प्रत्येकजण पाहणार आणि मग ठरवणार पसंद आहे का नाही? म्हणजे तिला तिचं मत नाहीये का? अशाच विचारात असताना आम्ही कधी त्यांच्या घरी पोहोचलो कळलंच नाही.
अरे हा तुम्हाला तिच्याबद्दल सांगायचं तर राहूनच गेलं. तीच नाव कुंजिका. एअरटेलमध्ये चांगल्या हुद्द्यावर काम करते. घरात एकुलती एक आहे आणि त्यामुळेच ती माझ्यासाठी योग्य असेल असे आईबाबांना वाटतं होतं कारण त्यांचं सुद्धा मी एकच दांपत्य आहे.
संगीता मला इशाऱ्याने सतावत होती पण मी मात्र मान खाली घालून बसलो होतो. माझ्या मनात ठाम होतं की कितीही चांगली मुलगी असेल तरी मी नकार देणार आहे. कारण आयुष्यात एकदा विरह मिळाल्यावर पुन्हा एकदा नवीन नात्यात अडकणे मला नको आहे. तेवढ्यात संगीताने मला जोरदार चिमटा काढला तर मी तिच्यावर ओरडायला मान वर काढली आणि समोरून कुंजिका हातात चहाचा ट्रे घेऊन येताना दिसली.
लाल रंगाची साडी, त्याच रंगाची बिंदी, बांगड्या आणि तिचे हलकेसे कलर केलेलं केस. केसाची एक बट गालावर फिरत होतो पण दोन्ही हातात चहा पकडल्याने तिला ती वर करता येत नव्हती. तिच्या मनाची चलबिचल मी पाहत राहिलो. पहिल्या नजरेत कुणाला आवडेल अशीच ती दिसत होती. पण मी मनावर ताबा मिळवला आणि पुन्हा मान खाली घातली. पण माझ्या आणि तिच्या घरचे असे बोलत होते जसे की आमचं लग्न ठरलं आहे आणि पुढे कार्यक्रम कसे आणि काय करायचे याचे संभाषण सुरू होतं.
एवढ्याच त्यांचे मामा म्हणाले की, “कुंजू जा त्यांना आपल्या टेरेसवरील बाग दाखवून आण.” इथे बाग दाखवणं हे फक्त बोलणं आहे. मुलामुलीला नीट बोलता यावं म्हणून असं करण्यात येतं. नेहमी सिनेमात पाहिले होते आज प्रत्यक्ष अनुभवत होतो.
पुढील काही मिनिटे तरी आम्ही गप्पच बसून टेरेसवरून दिसणारी झाडी पाहत होतो. तिनेच विषय काढला “तुम्हाला ट्रेकिंग कधीपासून आवडायला लागली?” मी थोड संभ्रमात पडलो. हिला कसं माहीत मी ट्रेकिंगवर जातो. ही आईपण ना सर्व सांगून मोकळी होते. “लहानपणी जेव्हा इतिहासाची जाण झाली तेव्हापासून आपोहुन आवड निर्माण झाली.” मी म्हणालो.
तुमचा ऑफिस ग्रुप छान आहे प्रत्येक सण तुम्ही उत्साहात साजरे करता आणि ट्रेकिंग ग्रुप सुद्धा छान आहेत मस्त फोटोज् आहेत तिथले सर्व. ती म्हणाली.
मी थोडा अचंबित झालो हिने फोटो कुठं पाहिले? मी तर घरात देखील कुणाला फोटो दाखवले नाही आजवर आणि की कोणत्याच सोशल मीडियावर फोटो पोस्ट नाही केले मग यांना कसं कळलं ते?” मी अचंबित होऊन तिच्याकडे पाहत राहिलो. ती गालात किंचित हसली आणि म्हणाली “तुम्ही फोटो नाही पोस्ट करत माहीत आहे मला पण तुमचे मित्र तर करतात ना?
आता मला थोडा अजून धक्का बसला. हिच्या काँटॅक्टमध्ये माझा कोण मित्र आहे? तसं तिला मी विचारले सुद्धा पण त्यावर तिचे असे उत्तर होतं “कसे आहे ना सुशांत राव आपण आजकालची नवीन पिढी आहोत त्यामुळे येणारा मुलगा कसा आहे हे आधीच आम्ही सोशल मीडियावर पाहून घेतो. तो कशा पोस्ट करतो? कुणासोबत फिरतो? किती पार्टी करतो? पण तुमच्या बद्दल गोष्ट वेगळी होती तुमचे सोशल मीडिया अकाउंट तर मिळालं पण एकही फोटो पोस्ट नव्हता. मग मी थोडा विचार केला आणि अशा ठिकाणी क्लिक केलं जिथं सहसा कुणी जात नाही. तुम्हाला टॅग केलेलं फोटोज् पाहिले. त्या सर्व मित्रांचे फोटो समोर आले त्यात तुम्ही सुद्धा होतात. मग तुमच्याबद्दल सर्वच कळलं.
तिच्या या उत्तराने माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. एवढं वेळ न आवडणारी मुलगी आता थोडी वेगळी वाटतं होती. तिच्या हुशारीने कौतुक वाटतं होतं. मी तिला विचारलं “जेवण बनवता येतं? इथे दुसरी कुणी मुलगी असती तर मन जपायला हो म्हणून मोकळी झाली असती पण ती म्हणाली, “घरात लाडाची असल्याने आईने कधी किचनमध्ये शिरू दिलं नाही. त्यामुळे एक चहा सोडता मला काहीच येत नाही.”
तिचा हा खरेपणा मला आवडला होता. “काही काळजी करू नका आईला मुलगी हवी होती पण मी झालो मग काय तिने सर्व कामं मला शिकवून दिली आहेत. मी सर्व करू शकतो काही अशी काळजी नाहीये. पण हा चहा माझा विक पॉइंट आहे. मला कधीही चहा लागतो. जर तुम्ही तो देण्याचे प्रॉमिस करत असाल तर जेवण बनवायचे प्रॉमिस मी करूच शकतो.” ती अक्षरशः लाजली. लाजताना ती अधिक सुंदर दिसत होती.
“तुम्हाला माहित आहे मी तुम्हाला चार महिन्या अगोदरच पसंद केलं होतं?” ती म्हणाली. मला थोड आश्चर्य वाटलं तेव्हा ती म्हणाली “आठवतंय तुम्हाला एकदा पनवेल पेण बस कर्नाळा खिंडीत बंद पडली होती. बस मधील सर्व प्रवासी दुसऱ्या गाडीची वाट पाहत होते आणि तेव्हा तुम्ही तुमच्या कारने तिथून जात होता. तुम्ही कार त्या सर्व प्रवासी लोकांसमोर थांबवली आणि फक्त प्रौढ लोकांनी बसा असा फर्मान सोडला. खर सांगू तर त्या क्षणी माझ्या मनात विचार आला होता की मुलगा मिळावा तर असा. सर्वांची काळजी घेणारा. त्या प्रवासी लोकांमधे मी सुद्धा एक होते. तेव्हा तुम्हाला पाहिले आणि तुमचा चेहरा लक्षात राहिला. जेव्हा बाबांनी तुमचं स्थळ सुचवलं तेव्हा तुमचं फोटो पाहिला आणि मनातच स्वतः सोबत पुटपुटले. देवाने माझी इच्छा पूर्ण केली.”
त्यांनतर आम्ही दोघांनीही खूप गप्पा मारल्या अगदी वेगवेगळ्या विषयावर. अखेर संगीता आली आणि खालूनच मोठ्याने ओरडली, “दादा इथेच लग्न करायचा विचार आहे का? या खाली.”
मी कुंजीकाला म्हटलं “जायचं खाली?” तिने डोळ्यांनीच म्हटलं “एवढ्या लवकर नको ना” पण मी हसलो आणि म्हणालो “चल जाऊया खाली. जाऊन होकार सुद्धा द्यायचा आहे. मग संपूर्ण आयुष्य पडलं आहे तुमच्यासोबत बोलायला.”
समाप्त
कथेचा पुढचा भाग वाचायला आवडेल का? मला कमेंट करून नक्की सांगा.
लेखक : महेंद्र पाटील (पाटीलजी)
फीचर्स इमेज क्रेडिट : Sona Dey