काय ग सूनबाई आज ऑफिसला नाही जायचं का? नाही ओ आई आज तब्बेत जरा ठीक नाहिये म्हणून सुट्टी घेतली आहे मी. ठीक आहे थांब मी तुझ्यासाठी आल्याचा चहा घेऊन आले तू आराम कर. वाणी आणि प्रणवच्या लग्नाला आज दीड महिना झाला होता. तसे त्यांचे अरेंज मॅरेज होत. पण त्यांच्याकडे बघून मुळात असे वाटतच नव्हते की त्यांचे अरेंज मॅरेज आहे. दोघेही आयटी कंपनीत कामाला होते. घरी फक्त आई. बाबा प्रणवच्या लहानपणी गेले. कमी वयातच प्रणव ने आपल्या घराची जबाबदारी खांद्यावर घेतली होती.
दोघांचाही राजा राणीचा संसार अतिशय सुखात चालला होता. पण मागील तीन चार दिवसापासून वाणीची तब्बेत बिघडत चालली होती. प्रणवच्या आईला कळून चुकलं होतं की वाणीला दिवस गेलेत पण त्या काहीच समोरून बोलल्या नाहीत. वाणीला पण शंका होतीच म्हणून तिनेही चेक केले. तिलाही आता कळून चुकल होतं की ती आई होणार आहे. पण तिच्या चेहऱ्यावर मात्र हा आनंद दिसत नव्हता.
तिला स्वतःचे करीयर करायचे होते, स्वतःच्या पायावर उभे राहून प्रणवला मदत करायची होती. तसे त्या दोघांनीही प्लॅन करून ठेवलेही होते. पण म्हणतात अशा गोष्टी कितीही प्लॅन केल्या तरी व्हायचे ते होऊन जातं. प्रणव घरी आला तेव्हा तिने त्याला ही बातमी त्याला सांगितली पण तिला असे वाटले हा ही माझ्या प्रमाणे अस्वस्थ होईल. पण त्याच्या विरूद्ध झाले. त्याच्या आनंदाचा पारा खूप जास्त चढला. फक्त हत्तीवर बसून गावात आजूबाजूला पेढे वाटायचे बाकी होते.
प्रणव काय येड्या सारखा करतोय तू? तुला सांगितले होते ना मी आपल्याला एवढ्यात बाळ नकोय. मला स्वतःचे करीयर करायचे आहे. एवढ्या लवकर मला आई नाही बनायचे. अग वाणी मला माहित आहे असे ठरलं होतं. पण देवाच्या मनात काही वेगळे असेल म्हणून हा दिवस आपल्या आयुष्यात आला आहे. आपणही तो स्वीकारला पाहिजे. पण वाणी अजिबात ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. अनेक तास दोघात वाद झाले पण वाणी आपल्या निर्णयावर ठाम होती.
अखेर वाणी समोर प्रणवचे काहीही चालले नाही आणि प्रणवच्या मनात नसतानाही त्याने जड अंतकरणाने बाळ नको म्हणून निर्णय घेतला. बाळ कमी महिन्याचे असल्याने मेडीसिन घेऊन गोष्टी हाताळण्यात आल्या. वाणी खूप खुश होती पण आई आणि प्रणव नाराज होते. पण जसजसे काही महिने, मग वर्ष पालटत गेले. सर्व मागील भूतकाळ ते विसरून गेले.
आज बऱ्याच वर्षांनी प्रणव वाणी चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत. आपल्या आयुष्यात त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. पण आता त्यांना त्यांच्या आयुष्यात बाळ हवं आहे पण होत नाहिये. मागील तीन वर्षांपासून ते बाळासाठी प्रयत्न करत आहेत पण हाती निराशाच येत आहे. अनेक डॉक्टर झाले, संत, बाबा फकीर सर्वांना दाखवून झाले पण हाती फक्त शून्य.
दोघेही आपल्या नशिबाला दोष देत बसले आहेत. देवाने आमच्या आयुष्यात हे सुख न मागता दिले होते तेव्हा आम्ही ते स्वीकारू शकलो नाही पण आता आम्हाला ते सुख हवं आहे पण मिळत नाहिये. ह्यापेक्षा मोठे दुःख काय असावे. आज अनेक वर्ष उलटत आहेत. पण अजूनही त्यांना हवे असलेले सुख मिळत नाहीये.
लेखक : पाटीलजी (महेंद्र पाटील)