आजच्या सुद्धा स्थळांने नकार दिला. हे सातवे सुद्धा चांगले स्थळ हातातून निघून गेले. माझ्या मुलीत काहीच दोष नसताना नकार का देतात हेच कळतं नाहीये, चांगली शिकली आहे, जॉब करतेय, आपले घरदार चांगलं आहे मग हा नकार येतो तरी का? घरात आल्यानंतर सर्व हसमुख असणारे बघणाऱ्या मंडळींचे घरी गेल्यावर विचार बदलतात तरी कसे? (किचन मधून राधा ताईंचे रागाचे आणि चिंतेचे हे शब्द कानी पडत होते)
त्यांना सुद्धा आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता लागलीच होती. गेली दोन वर्ष त्यासाठी घरातले सर्व प्रयत्न करत होते. जुळलेले लग्न चित्र विचित्र कारणे देऊन समोरची मंडळी मोडत असतं. म्हणूनच राधा ताईंना खूप जास्त काळजी वाटतं होती. त्यांचे मिस्टर सुधाकर राव बाहेरगावी व्यवसायासाठी असतात. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी राधा ताईंवर असते.
अग काकू होईल आपल्या रसिकाचे लग्न, तुम्ही कशाला काळजी करताय? तिला तिच्या आवडीचेच कुणी मिळेल, तिला समजून घेईल, नका तुम्ही काळजी करू असे वैद्याने म्हटले. वेद्या रसिकाची लहानपणी पासूनची मैत्रीण, त्यामुळे राधा ताईंच्या मनातले ती चांगलेच जाणून होती. काकू रसिका कुठे आहे? ती काय आतमध्ये रुसून बसलीय ,आजसुद्धा त्या म्हात्रे परिवाराकडून नकार आला. मी बोलते काकू तिच्याशी तुम्ही शांत रहा. असे म्हणत वैद्या रसिकाच्या रूम मध्ये शिरली.
वैद्याला पाहून रसिका खूप जास्त आनंदित झाली. तिला पाहताच तिच्या बाहुपाशात शिरली. काय ग किती वेळ? कधीपासून वाट पाहत होते मी, हो मेरी जान माहीत आहे तू माझी वाट पाहत होतीस पण तो रवी म्हात्रे आला होता ना पहायला तुला त्यालाच भेटायला गेली होती, कसे बसे त्याला नकार द्यायला सांगितला. तेव्हा कुठे सुटकेचा निःश्वास टाकला. पण हा रवी तर खूप जास्त फिदा होता हो तुझ्यावर, एका पायावरच लग्नासाठी तयार झाला होता. वैद्यांने हसतच रसिकाला म्हटले.
कुणीही आणि कितीही येऊदे, ही रसिका तर ह्या वैद्याचीच होणार. पण वैद्या किती दिवस चालणार ग आपले हे लपून छपून प्रेम? कंटाळा आला आहे आता मला, एकदा सांगून टाकुया ना ह्या जगाला, आपण दोघींनी एकमेकिवर मनापासून प्रेम केलं आहे मग का लोकांचा विचार करतोय? बाहेरच्या देशात तर समलिंगी प्रेम आणि लग्न ह्यासाठी कुणीच विरोध करत नाही मग आपणच का झुरत आयुष्य व्यतीत करतोय?
कसे आहे ना रसिका मॅडम जगाचा विचार तर आम्हीसुद्धा नाही केला पण तुझ्या आई बाबांना माझ्या घरातल्यांना विश्वासात घेऊन आपण ही गोष्ट सांगितली पाहिजे. आपल्याला वाटते तेवढी साधी सोपी गोष्ट नाहीये ही, त्यामुळे धीर धर आणि काही वेळ गप्प रहा, तुझ्या मिठीतले सुख अनुभवू दे मला.
वैद्या… चालती हो माझ्या घरातून, हेच धंदे चालू होते तुमचे म्हणून माझ्या मुलीचे लग्न ठरत नव्हते. मी काही बरं वाईट करण्याअगोदर इथून निघून जा.. राधा ताईंनी ह्या दोघींचे बोलणे ऐकले होते, ऐकताच त्यांचा पारा खूप जास्त चढला. अग आई ऐकुन तर घे आम्ही काय बोलतोय, प्लीज ना ग आई, आमचं एकमेकिवर खूप मनापासून प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचे आहे.
लग्न करायचं आहे म्हणजे, तुला कळतेय तू काय म्हणत आहेस, अक्कल का शेण खायला गेली का तुझी? आमचीच चुकी झाली की तुला एवढे स्वातंत्र्य दिलं, आणि तू ग सटवे, माझ्या मुलीला नादाला लावशील असा विचार सुद्धा मी केला नव्हता. अहो काकू आमचं ऐकुन तर घ्या, काही ऐकायचं नाहीये मला एवढे म्हणत राधा ताईंनी वैद्याला धक्के मारत घराबाहेर काढले.
आईचं हे वागणे रसिकाला अजिबात आवडले नव्हते. तिने आपल्या खोली त जाऊन रागाच्या भरात हातावर धारधार ब्लेडने दोन वार केले आणि ती जागीच पडली. राधा ताईंना काय करावं सुचत नव्हते, त्यांनी कडबस तिला रुग्णालयात दाखल केलं. ह्यात त्यांना वैद्या ने सुद्धा मदत केली होती.
दोन दिवसांनी जेव्हा रसिका शुद्धीवर आली तेव्हा समोरचे चित्र पाहून तिला धक्काच बसला. कारण आई आणि वैद्या तिच्या बाजूला बसल्या होत्या. मुलगी शुद्धीवर येताच राधा ताईंनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या मुली माफ कर मला पण हे असे काही पुढे करणार नाही ह्याचे वचन दे, एकुलती एक मुलगी ग तू आमची, तुला काय झालं असतं तर काय तोंड दाखवलं असतं मी तुझ्या बाबांना?
पण खरंच ह्या दोन दिवसात वैद्याने खूप साथ दिली, तू बेशुद्ध असल्यापासून अन्नाचा एक कण सुद्धा तिने पोटात टाकला नाही. ICU बाहेर राहून तिने डोळ्याला डोळा लागून दिला नाही. खरंच तिचे प्रेम मला उमगले आहे ग, मी बोळेल तुझ्या बाबांसोबत पण तुम्हाला नक्कीच जवळ आणेल. आईचं हे बोलणे वैद्या आणि रसिका एकमेकींकडे पाहून ऐकत होत्या. आता कुठे त्या दोघींना आपल्या प्रेमाला एक हक्काची जागा मिळाली म्हणून खुश होत्या.
मी लिहिलेल्या ह्या काही निवडक कथा पण वाचा
ह्या कथेबाबत अनेक लोक म्हणतील की तुम्ही समाजाला चुकीचे मार्गदर्शन करत आहात अशाने समलिंगी प्रेमाला चालना मिळेल. पण त्या सर्वांना मी हे सांगू शकतो की प्रेम ही एक निस्वार्थ भावना आहे. आपण ज्याच्या सानिध्यात राहून सेफ आणि आनंदी राहू शकतो तर अजून काय हवं? जर तुम्हाला एखाद्या बद्दल विशिष्ट भावना वाटतात तर ह्यात काहीच गैर नाही मग तो मुलगा असो किंवा मुलगी? समाज काय म्हणेल ह्याच गोष्टीने तर बरीच लोकं आपले जीवन आयुष्यभर दुःखात व्यतीत करतात.
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)