Home कथा शंभराची नोट

शंभराची नोट

by Patiljee
13475 views
शंभराची नोट

वो साहेब दुसरी नोट द्या, ही नाय चालणार तुमची शंभराची नोट.. अहो चालेल की काका काय झालं आहे तिला, चांगली तर आहे.. कुठे फाटली सुद्धा नाही. अहो फाटली नाही पण ह्या नोटेवर पेनाने नंबर लिहिला आहे. त्यामुळे आमच्याकडुन घेणारा ग्राहक अशा नोटा स्वीकारत नाहीत.

होका काका, सॉरी सॉरी.. आणा ती नोट इकडे तुम्हाला दुसरी देतो. मी नोट घेऊन पॉकेट मध्ये टाकली आणि काकांना दुसरी नोट दिली. घरी येत असताना ती नोट मी पुन्हा पॉकेट मधून काढून पाहिली तर त्या नोटेवर एक मोबाईल नंबर लिहिला होता आणि खाली अलोन अस लिहिले होते. अलोन म्हणजे एकटं. कोण असेल एकटं असा विचार करत मी घरपर्यत पोहोचलो.

फ्रेश होऊन टीव्ही समोर बसलो. पुन्हा एकदा त्याच नोटेवरचे ते अलोन शब्द आठवले. पुन्हा नोट पॉकेट मधून काढून हातात घेतली. कुणाचा नंबर असेल हा? करू का कॉल? कोण असेल समोर? बोलेल का आपल्याशी? का एकटं असेल? असे असंख्य प्रश्न माझ्या डोक्यात घर करत होते.

हिम्मत करून मी अखेर त्या नंबरवर कॉल केलाच, समोर एका मुलीचा आवाज कानी आला आणि मी लगेच फोन कट करून दिला. समोर मुलगी आहे हे मला अपेक्षित नव्हते. आणि अशी कोणती मुलगी आहे जी आपला नंबर असे नोटेवर लिहून जगजाहीर करेल. काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे.

मी ह्या गोष्टीचा खूप विचार केला पण अनेक प्रश्न समोर येत होते. आणि काही करून मला त्या प्रश्नांची उत्तरे हवी होती. मी न राहून पुन्हा एकदा त्या नंबरवर फोन केला.

हॅलो कोण?

आपण कोण?

मी ऋषिकेश आणि तुम्ही?

माझे नाव सांगते मी पण तुम्ही कोण? मला ओळखता का?

तसे पाहायला गेलात तर मी तुम्हाला नाही ओळखत पण काही दिवसांपासून मी फक्त तुमचाच विचार करतोय.. हे मात्र खरं.

का असे का?

तुमचा नंबर मी शंभराच्या नोटेवर पाहिला, ती नोट माझ्याकडे आली आहे आणि त्याखाली अलोन असे लिहिले होते. नक्की काय अर्थ आहे ह्याचा हा प्रश्न मला सतावत आहे.

किंचित हसून, अच्छा ते होय, ते पाहून तुम्ही कॉल केलात हे ऐकून खरंच छान वाटले. म्हणजे ह्या जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे म्हणायची.

हो, पण असा नंबर जगजाहीर करण्या मागचे नक्की कारण काय आहे? ते मला कळालं नाही .

खरतर मला समजत नाहीये की आपल्या पहिल्या कॉलवर वरील बोलण्यात हे सांगणे कितपत योग्य आहे पण तुम्ही फक्त अलोन हा एक शब्द पाहून कॉल केलात म्हणजे चांगले माणूस वाटता. माझे नाव उर्वशी आहे. मी पुण्यात एका अनाथ आश्रमात राहते. माझे आई बाबा कोण माहीत नाही, लहान असतानाच ते मला ह्या आश्रमात सोडून गेले.

आता तुम्हाला वाटेल की मला का सोडून गेले असतील तर मी मुलगी त्यांच्या घरी जन्माला आले असेल हे एक कारण असू शकेल पण दुसरं महत्त्वाचे कारण हे असेल की मी अपंग आहे, मी व्हील चेअर वरून उभिही राहू शकत नाही. माझ्या ह्या अपंगत्वामुळे माझ्याशी फारसे कुणी बोलत नाही.

दिवस कधी उजाडतो, कधी मावळतो हे कधी कधी कळत सुद्धा नाही. एकाच रूम मध्ये बसून सारखा हाच विचार करते की मलाही बाहेर जग पाहायचे आहे, गाड्यांची वर्दळ, ते ट्रॅफिक, ती गर्दी हे सर्व उघड्या डोळ्यांनी पहायचं आहे. पण बाहेर नेणार कोण? म्हणून गेली अनेक वर्ष फक्त वाट आणि वाटच पाहतेय. तुम्हाला हे सर्व सांगतेय पण तुम्ही जास्त मनावर घेऊ नका हा, बरीच वर्ष मनात खूप काही साठले ना सो आज अचानक बाहेर आलं.

मी फक्त तिचे बोलणे ऐकत होतो आणि नकळत माझ्या डोळ्यातून कधी अश्रू बाहेर आले हे मला सुद्धा कळले नाही. आपले आयुष्य किती छान आहे ना? आपण हवे तिथे जाऊ शकतो, काहीही पाहू शकतो, खाऊ शकतो, शॉपिंग करू शकतो, पण काहींच्या आयुष्यात एवढी काही दुःख आहेत की आपली दुःख त्यांच्यासमोर शून्य आहेत. मी स्वतःला सावरले त्यांना म्हटले सॉरी पण तुमच्या परवानगीशिवाय एक काम मी आज करतोय.

मला तुमच्या अनाथ आश्रमातला पत्ता द्या. ऊद्या आणि परवा हे दोन दिवस मी तुम्हाला बाहेरचे जग दाखवतो. ते जग पाहताना मला तुमच्या डोळ्यातील आनंद माझ्या डोळ्यांनी पहायचं आहे. माझ्या आयुष्याचं सार्थक झालं असेच मी समजेल. प्लीज नाही म्हणू नका.

समाप्त

मित्रानो कथा तुम्हाला आवडेल की नाही माहीत नाही? पण एक मात्र सांगू शकतो की तुमच्या आयुष्यात कितीही टेंशन असूद्या ते इतरांपेक्षा कमीच आहे. कारण ह्या जगात समोर हसत दिसणारी माणसं आतून खूप खचलेली असतात. म्हणून तुम्ही देवाचे आभार माना की रब ने आपको देने वालो में रखा है, मांगने वालो में नहीं.

आमच्या ह्या काही निवडक कथा सुद्धा वाचा.

कथेचे अधिकार लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करू शकता.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल