अहो फोन वाजतोय तुमचा.. कितीवेळ त्या बाथरूम मध्ये वेळ घालवणार देव जाणे, नेहमीचे आहे. हॅलो कोण? विश्रांतीने फोन उचलून कानाला लावला, समोरून अस्पष्ट असा बाईचा आवाज आला आणि फोन कट झाला. संशयाची कीड विश्रांतीच्या मनात निर्माण झाली म्हणून तिने अवी म्हणजेच तिच्या नवऱ्याला विचारले?
हा कुणाचा नंबर आहे? समोरून कुणी बाईचा आवाज आला. अंग पुसत अवि बाहेर आला पण त्याच्या मनात सुद्धा भीती निर्माण झाली होती. अंघोळ करून येऊन देखील त्याला घाम फुटला होता आणि ते त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. अग नाही नाही असेल कुणाचा अनोळखी नंबर असे म्हणताना त्याचे हावभाव विश्रांतीला वेगळे वाटले? म्हणून तिने त्याच नंबरवर फक्त हॅलो असा मेसेज केला?
एका क्षणार्धात समोरून रिप्लाय आला. ” हाय बच्चा, सॉरी अरे तुला एवढ्या सकाळी फोन केला पण काम तसे होते तर विश्रांती फोन उचलला. खूप घाबरले आणि मग फोन कट केला. बाय द वे तू आज मला भेटतो आहेस ओके?
एवढा मोठा समोरून रिप्लाय येताच विश्रांतीचा पारा खूप जास्त चढला. मला वाटले नव्हते तुम्ही असे बाहेर शेण खाल? एवढी वर्ष तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं, प्रत्येक सुख दुःखात तुम्हाला साथ दिली त्याची अशी परतफेड केलीत, खूपच छान एवढे म्हणत अवीचा मोबाईल घेऊन ती बेडरूम मध्ये शिरली. अविला मात्र मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. त्याची चोरी पकडली गेली होती.
असं पण नव्हते की तो वर्षांनवर्ष तिला फसवत आला आहे. ह्या मुली सोबत आताच त्याच प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ म्हणतात ना तसेच काही होऊन बायकोला ही गोष्ट कळली. आपण बायकोसोबत एवढी वर्ष एकनिष्ठ होतो तेच योग्य होते. उगाच माती खायला गेलो आणि पायावर धोंडा मारून घेतला म्हणत अवि स्वतःला दोष देत होता.
इकडे विश्रांती आपली कपड्यांची बॅग भरत होती. तेवढ्यात अवीच्या मोबाईलवर अजून एक मेसेज येऊन झळकला. बच्चा ऐक, ऑफिसच्या आधी ९.३० ला पाटीलजी कॅफे मध्ये ये, मला वेळ आहे आज थोडा त्यामुळे गप्पा मारू. हा मेसेज वाचताच विश्रांती ने पुढचा मागचा विचार न करता बॅग उचलली आणि घरातून निघाली. अविने थांबण्यासाठी खूप प्रयत्न केले पण सर्व निष्फळ होते.
घरातल्यांना आणि शेजाऱ्यांना कळायला नको म्हणून अवि ने जास्त फोर्स न करता विश्रांतीला जाऊ दिलं. पण विश्रांती घरी न जाता ठरलेल्या वेळेत कॅफे मध्ये येऊन एका कोपऱ्यात बसली. ह्या कॅफेमध्ये मुली तर खूप होत्या पण ह्यातली नक्की मुलगी कोण हे ओळखणे खूप अवघड होते. म्हणून तिने शक्कल लावत त्या नंबवर कॉल केला. रिंग तर ऐकू येत होती पण कुणी दिसत नव्हते. एका कोपऱ्यात पाहिले तर आवाज तिथून येत होता. एक मुलगी पाठमोरी बसली होती.
विश्रांती ने आज ठरवले होते की ह्या मुलीला चांगलाच धडा शिकवायचा. तिने जाऊन तिचे केस पकडले आणि कानाखाली वाजवायला हात पुढे केला तर तिचा चेहरा पाहून सुन्न झाली. ही मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून तिची जिवलग मैत्रीण अर्पिता होती. आता मात्र विश्रांती फार खचली. सर्वात जवळच्या दोन व्यक्तींनी आज तिचा विश्वासघात केला होता. अर्पिता हात पसरून तिच्याकडून माफी मागत होती पण आता खरंच वेळ निघून गेली होती.
ज्या व्यक्तीला आपण खूप जास्त जीव लावतो आणि त्याच व्यक्तीने विश्वासघात केला तर माणूस खचून जातो. हेच विश्रांतीच्या बाबतीत झाले. एक भावनेने मिळेल तो रस्ता पकडत चालू लागली. मोबाईल रिंग करत होता. अर्पिता आणि अविचे खूप सारे कॉल येत होते पण विश्रांती कुणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ह्या कथेत चूक कुणाची आहे? विश्रांती ने आता पुढे काय करायला हवे? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा.
ह्या काही निवडक कथा सुद्धा वाचा
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)