संजना पहिल्यापासूनच हरहुन्नरी होती, परंतु नव्याने पुन्हा सगळं उभं करण्याचं तिच्यापुढे खूप मोठं आव्हान होतं. नियतीनुसार वाईट दिवस आले, कितीही मोठं संकट आलं, तरी त्यातून मार्ग कसा काढावा हे संजना कडून शिकावे.
संजना एक मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी. दिसायला खूप सुंदर, तेजस्वी आणि सतत हसतमुख चेहरा. घरात मोठी असल्याने जबाबदाऱ्या सुद्धा तश्याच होत्या. आई वडील कामानिमित्त बाहेर पडल्यावर आपल्या लहान बहिणीची आणि भावाची सगळी जबाबदारी ती व्यवस्थित पार पाडत होती. त्यांच्या शाळेची तयारी करणे, शाळेत नेण्यासाठी जेवणाचा डबा बनवणे, संध्याकाळी आल्यावर त्यांचा अभ्यास घेणे हे सगळं तिचं रोजचं ठरलेलं काम होतं. हे सगळं स्वतःच शिक्षण सांभाळून ती करत होती. ग्रॅज्युएट झाल्यावर वयाच्या २२ व्या वयात तिला प्रकाशचं स्थळ सांगून आलं. तो दिसायला छान, वीस पंचवीस हजाराची नोकरी, उच्चशिक्षित आणि निर्व्यसनी होता. मग आईवडिलांनी कसलाही विचार न करता तिचे लग्न प्रकाश सोबत एकदम धुमधडाक्यात लावून दिले.
संजना आपल्या संसारात एकदम रमली होती. सासरी सुद्धा तिने सगळ्यांच्या मनात स्थान निर्माण केले होते. कोणत्याही ठिकाणी गेलो तरी सुगंधित फुले आपला सुगंध पसरवण्याचा गुणधर्म सोडत नाहीत, तसंच काही संजनाच्या बाबतीत होतं. लग्नानंतर नोकरी करून आपल्या संसाराचा गाडा अतिशय उत्तमरीत्या चालवत होती, त्यात ती कुठेही कमी पडत नव्हती. प्रकाशला संजनाचा नेहमीचा हातभार असल्याने, ज्या घरात भाड्याने राहत होते, तेच घर थोडेफार कर्ज काढून विकत घेतले. त्यांचे आता सगळे कर्ज फिटत आले होते, तसेच थोडीफार काटकसर करून पैशांची बचत दोघांनीही केली होती. आपल्या पतीला दुचाकीवरून ऑफिसच्या कामासाठी बाहेर जावे लागत असल्याने, लवकरच चारचाकी घेण्याचा तीचा विचार होता. लग्नानंतर पाच वर्षांमध्ये त्यांच्या संसाराच्या वेलीवर दोन गोंडस फुलेसुद्धा लागली होती. आपल्या दोन्ही मुलींना उत्तम शिक्षण देऊन त्यांना सुसंस्कारी बनवणे हे आता दोघांचे ध्येय होते. संजना आणि प्रकाशने, एकमेकांची साथ असल्याने शून्यातून विश्व निर्माण केले होते. कोणालाही आनंद आणि हेवा वाटेल असे हे कुटुंब होते. मुलींना शाळेत ने आण करणे, तसेच घरच्या कामांमध्ये सासू सासऱ्यांची नेहमीच मदत असायची. खूप छान दिवस चालले होते. जसे प्रत्येक दिवसानंतर रात्र ही ठरलेली असते, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार हे येतंच असतात. असचं काही वादळ संजनाच्या आयुष्यात डोकावत होतं.
रम्य सकाळ, थंडीचे दिवस होते. नेहमीप्रमाणे प्रकाश आपल्या गाडीवरून ऑफिसमध्ये जायला निघाला आणि वाटेतच त्याच्या बाईकला एका कंटेनरची धडक लागली. गाडी जवळ जवळ दहा फूट रोडवर घासत गेली आणि एक लाईटच्या खांबावर आदळली गेली. हेल्मेट डोक्यातून निघून बाजूला गेले आणि प्रकाश रक्ताच्या थारोळ्यात रोडवर पडला होता. बघ्यांची गर्दी झाली आणि लगेच त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डोक्याला जखम खूप मोठी होती, त्यातून होणारा रक्तस्त्राव थांबत नव्हता, कित्येक ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. शेवटी उपचारादरम्यान प्रकाशची प्राणज्योत मालवली. वादळं येतात आणि निघून जातात, परंतु संजनाच्या आयुष्यात आलेल्या ह्या वादळाची तिव्रता भीषण होती.
वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षात, दुर्दैवी वैधव्यत्व, दोन मुली आणि सासू सासरे ह्यांची सगळ्यांची जबाबदारी अचानकपणे संजनावर नियतीने टाकली होती. अवघ्या १३ वर्षांमध्ये उभा केलेला संसार सोडून प्रकाश निघून गेला होता त्यामुळे संसारात आता काळ्याकुट्ट अंधाराशिवाय काहीच उरले नव्हते. परिस्थितीला सामोरे जावे ह्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय संजनापुढे नव्हता. अचानकपणे आलेल्या वादळातुन वाट काढणे हाच एक उपाय संजनापुढे होता.
दोन महिन्यातच संजनाने पुन्हा ऑफिसला जायला सुरुवात केली. ऐन तारुण्यात वैधव्यत्व आलेल्या संजनाला लोकांची ‘ती’ नराधम नजर कळत होती, त्याकडे ती कानाडोळा करून पुढे जात होती. समाजामध्ये अचानकपणे लोकांच्या बघण्याच्या नजरा कश्या बदलतात ह्याचे अनुभव क्षणाक्षणाला संजनाला येत होते. जर आपली प्रगती व्हायची असेल तर, लोकांच्या अवास्तव बोलण्याकडे दूर्लक्ष करणे हाच उपाय असतो. संजनाने परिस्थितिला सामोरे जाण्यासाठी कंबर कसली होती. ऑफिस मध्ये काम करता करता तिने एमबीए साठी ऍडमिशन घेतले होते. रोजची धावपळ, त्यात मुलींचा आणि स्वतःचा अभ्यास, घर, ऑफिस ह्यांचा ताळमेळ बसवताना तिला खूप त्रास होत होता. त्यातच तिचे प्रमोशन होत गेले, दरम्यान एमबीए चे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे तिच्या पगारात सुद्धा घसघशीत वाढ झाली.
संजनाला कसलाही त्रास होऊ नये म्हणून सासू सासरे नेहमी तिला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळत होते. संजनाच्या मुलीसुद्धा आता मोठ्या होत चालल्या होत्या. मोठी मुलगी आता दहावीत गेली होती. प्रकाश जाऊन आता चार वर्षे होऊन गेली होती. सासू सासऱ्यांना संजनाच्या भविष्याची काळजी लागून राहिली होती. मुली लग्न होऊन निघून जातील, आपण किती वर्षे काढू ह्याचा नेम नाही म्हणून आता संजनाने दुसरे लग्न करावे ह्याचा विचार त्यांच्या मनात सारखा येत होता. संजनाला आणि तिच्या माहेरच्या माणसांना विश्वासात घेऊन संजनाला आपली ईच्छा बोलून दाखवली. संजनाचा ह्या सगळ्याला नकार होता. अखेर काही महिन्यांनी खूप विचाराअंती संजनाने लग्नासाठी होकार दिला. संजना आता चाळीशीमध्ये प्रवेश करणार होती, परंतु तिच्या तेजस्वी चेहऱ्यामुळे तिचे वय दिसून येत नव्हते. परंतु तिला दोन्ही मुलींसोबत कोण स्वीकारेल असा मोठा प्रश्न होताच. एका विवाह नोंदणी संस्थेत ऑनलाइन नोंदणी करून ठेवली. काही दिवसातच संजनाला एक उत्कृष्ट स्थळ आले. त्याचे सुद्धा लग्न झाले नव्हते, एकुलता एक, स्वतःचा व्यवसाय, स्वतंत्र घर आणि मुख्य म्हणजे दोन्ही मुलींना वडिलांचे छत्र देण्यासाठी तयारी होती. सगळे जुळून आल्याने संजनाच्या मुलींचा ह्या लग्नाला होकार मिळाला तेव्हा संजना लग्नाला तयार झाली आणि चांगला मुहूर्त बघून संजना पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकली.
प्रसंग वादळापेक्षा मोठा असला तरी प्रत्येक वादळातुन वाट काढणे हे काम आपले असते. देवाला आणि नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा सत्य स्वीकारून परिस्थितीला आपलंस करून घेणं हेच शहाणपण असतं.
श्री. अतिष म्हात्रे
आगरसुरे- अलिबाग
मोबाईल- ९७६९२०९९१९
┈┅━❀꧁ समाप्त ꧂❀━┅┈
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधिन आहेत (Copyright Membership No. SWA – 4948). लेखकाच्या नावासहित ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया द्यायला विसरू नये.