काय साहेब लग्न झालेय ना आताच तुमचं तरीसुद्धा माझी गरज भासली तुम्हाला? मला वाटलं लवकर नाही येत तुम्ही आता? सीमाने हसून गौतमला विचारले. अग तुझी नशाच काही वेगळी आहे की मला वारंवार खेचून घेऊन येते. आणि माझ्या बायकोला काही कळत नाही, घरीच तर असते. एकदा का मी ऑफिस साठी निघालो की ती मला कॉल करत नाही. आमचे सर्व बोलणे व्हॉटसअप वर होते. तिचा तिच्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. अरे हो पण आपण हे असे लॉज वर येणे बरं दिसत नाही ना, तुझे लग्न झालेय आता, कुणी पाहिलं तर तुलाच त्रास होईल. अग कशाला घाबरते, काही होत नाही, आपली काय पहिलीच वेळ आहे का इथे यायची.

मी सीमाला गाडीतून स्टेशनवर सोडली आणि घरची वाट धरली. आज घरी जाण्यासाठी अपेक्षेपेक्षा दोन तास उशीरच झाला होता. मोबाईल चेक केला तर बायकोचे चार मिस कॉल होते. पण आता झालाच आहे उशीर तर फोन वर बोलण्यापेक्षा समोर जाऊन काहीतरी कारण देईन आणि विषय टाळून नेईल. असा विचार मी केला होता. घरी पोहोचताच बेल वाजवली पण आतून कुणी दरवाजा उघडला नाही.
Extra Marriage Affairs
दुसऱ्या चावीने मी दरवाजा उघडून आत गेलो. बायको मार्केटला गेली असेल असा अंदाज बांधला आणि घरात जाऊन फ्रेश झालो. एक तास होऊन गेला तरी बायकोचा पत्ता नव्हता. फोन करतोय तर लागत नव्हता. आता मात्र मला भीती वाटायला लागली होती. कारण आठ वाजले तरी ती घरात पोहोचली नव्हती. मन अस्वस्थ झालं होतं. बेडरूम मध्ये शिरताच बेडवर एक चिठ्ठी सापडली. त्यात असे लिहिले होते.
आजवर मी समजत होते की ह्या जगातील सर्वात भाग्यवान स्त्री मी आहे. माझ्या नवऱ्याला ना दारू, ना सिगारेट, ना जुगार, ना भांडण, ना कुठलेच वाद, अतिशय शांत आहे माझा नवरा. माझ्या माहेरी सर्व म्हणायचे पोरीने नशीब काढले, किती छान नवरा आणि सासर मिळालं आहे. हे सर्व ऐकुन मला सुद्धा गर्व वाटायचा. तुमच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला मी कारण मला माहित होत माझ्या नवऱ्याला कुठलेच व्यसन नाहीये. अभिमान होता मला ह्या गोष्टीचा पण आज कळलं की हे व्यसन असते तर एकवेळ बरं झालं असतं पण हे बाहेरच्या बाईंचं नाद तुम्हाला आहे. हे कळल्यावर तळपायातील आग मस्तकात गेलीय.
क्षणिक सुख
आपल्या लग्नाला फक्त सहा महिने झालेत आणि तरीसुद्धा तुम्हाला बाहेर जाण्याची गरज भासली ह्यावरून समजते की तुम्ही कोणत्या विचारांचे आहात. आजवर माझे जे काही होत ते मी तुम्हाला अर्पण केलं. संसाराप्रमाणे बेडमध्ये सुद्धा तुम्हाला चांगला प्रतिसाद दिला. पण तरीसुद्धा तुम्ही बाहेर शेण खाता म्हणजे नक्कीच तुम्हाला हा नाद आधीपासून आहे. आणि हा अशा नादाचा नवरा मला नको आहे. मला कुणी सांगितले? कुठून कळलं? ह्यापेक्षा आता मी तुमच्या आयुष्यात नसणार आहे त्यामुळे तुम्हाला हवं ते करा.
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)