सुनील आज काही करून नैनाशी बोलून घ्या, किती दिवस आपण इतर मुला मुलींची लग्न पहायची. आपली एकुलती एक मुलगी वयात आली आहे. आता जास्त वेळ थांबता येणार नाहीये आपल्याला. अग हो सुखदा बोलायचे तर मलाही आहे पण भीती ह्या गोष्टीची वाटत आहे की तिला असे नको वाटायला की आपण तिच्यावर लग्नासाठी जबरदस्ती करतोय.
काही वाटणार नाही असे तिला, आधी आपण तिला शिक्षण आणि आता जॉब करूच दिलं ना? मग आता ऐकेल ती आपले, ते काही नाही माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे. चांगला डॉक्टर आहे. मी त्या दोघांची उद्या भेटण्याची वेळ ठरवते. तुम्ही आज बोलून घ्या.
सुखदाने असे सांगून खरतर सुनीलला कोड्यात टाकलं होतं. त्यांची मुलगी परी आता २८ वर्षाची होती. तिच्या लग्नाची बोलणी तर करावीच लागणार होती पण नेहमीच घरात लग्नाचा विषय काढला की ती चिडचिड करायची. ह्याचे कारण म्हणजे तिचे एका मुलावर मनापासून प्रेम होतं. तीन वर्ष ते सोबत होते. पण काही कारणास्तव तो परीला सोडून निघून गेला. तो परत येईल ह्या आशेने परी आजही त्याची वाट पाहतेय.
बाळा बस जरा मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. वडिलांनी अतिशय प्रेमाने परीला म्हटलं. बाबा परत लग्नाचा विषय काढणार असाल तर मी अजिबात थांबणार नाही. पण आज मात्र सुनील ह्यांचा पारा चढला.
काय ग नक्की काय झालंय तुला, येणारे जाणारे, सगे सोयरे, नातेवाईक सर्वच टोमणे देत विचारात असतात. २८ वर्षाची झाली मुलगी लग्न करायचं आहे का नाही? एवढे वर्ष आम्हीही तुला काय बोललो नाही, तुझा वेळ तुला दिला पण तरीही तुला आमच्या मनात काय चाललं आहे कळत सुद्धा नाही. फक्त स्वतःचा विचार करत आहेस तू. ते काही नाही, उद्या आईने तिच्या मैत्रिणीच्या मुलाशी तुझी भेट ठरवली आहे. जाऊन त्याला भेट मुलगा कसा वाटतो बघ मग बाकीचे पुढे बघू कसे करायचे.
बाबांचा हा राग परीसाठी खरंच खूप नवीन होता. कारण एवढ्या वर्षात बाबा तिच्यावर एवढे कधी चिडलेच नव्हते. तिनेही भेटायला होकार दिला. खरतर तिच्या मनात इतर कुणाशी लग्न करावे हे विचार सुद्धा येत नव्हते पण आई बाबांसाठी तिने ह्या मुलाला एकदा भेटायचं ठरवलं.
एका कॅफेमध्ये भेटायचं ठरलं होतं. परी त्या कॅफेमध्ये पोहोचली. आईने आधीच मुलाचा फोटो दाखवला होता म्हणून लांबूनच तिने त्याला ओळखले. सुयश नाव होतं त्याचं. परीला समोर पाहताच त्याने चेहऱ्यावर गोड स्माईल करत खुर्ची पुढे सरकावत तिला बसू दिलं. त्याच हे वागणे कुणालाही खूप प्रेमळ वाटलं असत पण परी ठाम निर्धार करून आली होती की काही झालं तरी नाहीच म्हणणार आहे.
त्याने तिला न विचारताच एक मसाल्याचा चहा आणि कॉफी ऑर्डर केली. मसाल्याच्या चहाचा नाव ऐकताच परीची नजर त्याच्याकडे वळली. ह्याला कसं माहित मला मसाल्याचा चहा आवडतो म्हणून? मी हा प्रश्न विचारणार तोच त्यानेच बोलायला सुरुवात केली. तुमच्या आईने सांगितले तुम्हाला मसाल्याचा चहा आवडतो. म्हणून लक्षात ठेऊन मागवला आहे. पुढील वीस मिनिटे इकडे तिकडे पाहण्यातच गेली. सुयश मध्येच बोलण्याचा प्रयत्न करत तर होता पण परी मात्र अजिबात त्यात इंटरेस्ट दाखवत नव्हती.

सुयशने स्वतः बद्दल खूप काही तिला सांगितले पण परी मात्र हा, ह्म्म, ओके, असेच रिप्लाय करत होती. तेव्हा सुयश म्हणाला माफ करा मला खरतर मी तुमचा खूप वेळ घेतला. मला इथे तुम्हाला भेटायला यायचेही नव्हते पण घरच्यांनी पाठवले म्हणून आलो. माझे एका मुलीवर प्रेम आहे. पण हे घरच्यांना कोण सांगणार? म्हणून जास्त वाद न घालता इथे आलो. चला निघतो.
ज्या गोष्टी खरतर परीला त्याला सांगायच्या होत्या अगदी त्याच गोष्टी सुयश सांगून तिथून निघून गेला होता. आता मात्र तिने सुटकेचा निःश्वास टाकला. काहीच वेळात पाहिले तर मोबाइलवर एक अनोळखी नंबर वरून मेसेज आला होता. त्यात असे लिहिलं होतं.
मी आता जे काही बोलून तिथून निघून आलो आहे खरतर ह्या तुमच्या भावना आहेत, ज्या मला सांगायच्या आहेत पण तुम्हाला सांगता येत नाही. आयुष्यात प्रेम करणं ही खूप नाजूक गोष्ट आहे. पण काही कारणास्तव ते प्रेम यशस्वी नाही झालं तर जग तिथंच तर संपत नाही ना? तुमचा भूतकाळ मला माहित आहे. त्या मुलाची वाट तुम्ही खूप पाहिली, जर त्याला यायचं असतं तर कधीच आला असता. उगाच त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचे आयुष्य खराब करत आहात.
मला हे सर्व माहित असून सुद्धा मी लग्नाला होकार देतोय, कारण माहित आहे का तर तुमचा हा नाकावर येणारा राग खूपच जास्त भावलाय मला. मी सारखं बोलतोय आणि तुम्ही फक्त ऐकुन घेता, अशीच तर बायको हवी मला जी नेहमी माझे ऐकेल. माहीत आहे हा थोडा विचित्र जोक होता. पण खरंच तुम्ही खूप छान आहात. खरंच मनापासून माझ्याशी बोलावेसे वाटले तर मेसेज करा.
परी त्या मेसेज कडे फक्त पाहताच राहिली कारण आज बऱ्याच वर्षांनी कुणीतरी तिच्याबद्दल विचार केला होता.
समाप्त
ह्या पण कथा वाचा
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)