आज बऱ्याच वर्षांनी ऑफिसमध्ये माझी सेकंड शिफ्ट लागली होती. माझा मित्र तुषारच्या घरी काही प्रोब्लेम झाला म्हणून त्याने अचानक मला कॉल करून सांगितले आणि मला यावे लागले. माझे नाव सोनू भोईर आणि पनवेल मधील नितलस गावात राहतो. माझ्या घरापासून ऑफिस १८ किमी असेल.
अंतर एवढे नसले तरी मला भीती ह्या गोष्टीची होती की घरी परतत असताना आमच्या रोडला चिटपाखरू सुद्धा नसतं. आणि रात्रीचा प्रवास म्हणजे मनात थोडी भीती होतीच. साडे अकराच्या सुमारास मी ऑफिस मधून निघालो. रस्ता तसा सूनसान होता. पण मी मनात कोणतीच भीती न ठेवता माझा प्रवास सुरू ठेवला.
तेवढ्यात एका युवकाने माझ्या गाडीला ओवर टेक करत गाडी वेगाने पुढे नेली. मला राग तर आला पण जेव्हा मी निरखून पाहिले तर त्याच्या मागे बसलेल्या बायकोची साडी खाली लोंबकळत होती. कधीही ती टायरमध्ये जाऊन त्या दोघांचा अपघात होईल असे चिन्ह समोर मला दिसत होते. त्यांना हे सांगण्यासाठी मी गाडी वेगात त्याच्या मागे पळवली.

पण त्याला कितीतरी हॉर्न देऊन, आवाज देऊन काहीच फरक नव्हता. कारण तो आपल्याच जोशात गाडी चालवत होता. काहीच वेळात माझ्या नजरेसमोरून तो दिसेनासा झाला. मी सुद्धा गाडीचा स्पीड वाढवला. एका ढाब्याजवळ तो व्यक्ती मला थांबलेला दिसला. तेव्हा मला थोड बरं वाटलं. काहीच वाईट घडलं नव्हते म्हणून मी आतूनच सुखावलो.
गाडी त्याच्या जवळ नेत मी त्याला थोडं रागातच म्हटलं काय वो कधीपासून तुम्हाला हॉर्न देतोय, आवाज देतोय लक्ष कुठे आहे नक्की? त्याने म्हटले का? तुम्ही मला का आवाज देत होता? आणि मला वाईट सवय आहे गाडी चालवताना हेडफोन्स लावण्याची, म्हणून आवाज नसेल आला. अहो मागे बसलेल्या तुमच्या बायकोची साडी टायर जवळ लोंबकत होती. कधीही वाईट प्रसंग आला असता तुमच्यावर. पण तुम्हाला सुखरूप पाहून छान वाटलं.
अहो मिस्टर तुम्ही दुसरं कुणाला पाहिले असेल कारण मी तर एकटाच ड्राईव्ह करत आलोय. आता मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. कारण ८०९० हाच नंबर मी पाहिला होता आणि तीच ही गाडी होती. मग ती मागे बसलेली बाई नक्की होती तरी कोण? भूत प्रेत की फक्त माझ्या मनाची समज? घरी येता येता असंख्य प्रश्न माझ्या डोक्यात घर करत होते.
ह्याच मुळे त्या रात्री मला झोप सुद्धा लागली नाही. दुसऱ्या दिवशी सुद्धा मला सेकण्ड शिफ्टला जायचं होतं. आता मात्र मला खूप जास्त भीती वाटतं होती. ती बाई परत दिसली तर? खरंच काय होईल माझं ह्या भावनेनेच मला घाम फुटला होता. ऑफिसला जायची इच्छा तर नव्हती पण तूषारच्या घरी मोठा प्रॉब्लेम सुरू असल्याने मला जावं लागलं.
ऑफिस मधील ही सेकण्ड शिफ्ट कधी संपूच नये असे मला वाटतं होतं. पण वेळ कधी कुणासाठी थांबली आहे का? बघता बघता कधी वेळ निघून गेली कळलं सुद्धा नाही. ऑफिस मधून बाहेर येताच मी आधी कानात हेडफोन्स टाकले. आज जे होईल ते होईल असे म्हणत स्वामींचे नाव घेत गाडीला किक देऊन घरी जाण्याचा रस्ता धरला.
रस्त्याला भयाण शांतता पसरली होती. आजूबाजूचे वातावरण थंड झालं होतं. एवढ्या गर्मीच्या दिवसात सुद्धा एवढे थंड वातावरण म्हणजे थोडं नवल होतं. आज रस्त्याला एक सुद्धा गाडी दिसत नव्हती. आतून खूप घाबरलो तर होतो पण भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे स्वामी माझ्या पाठीशी आहेत असे समजून मी रस्ता हळूहळू सोडत होतो. अखेर तो नेहमीचा ढाबा लागला आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला.
गाडी थांबवून फ्रेश वाटण्यासाठी एक चहा सांगितला. एवढ्यात एक बाईक वाला माझ्या जवळ येऊन थांबला आणि म्हणाला काय रे भाऊ कधीपासून हॉर्न देतोय तुला, तुझ्या मागे डबल सीट बसलेल्या बाईचा पदर खाली लोंबकळत होता. कधीही चाकात जाऊन अपघात होईल असे वाटत होते.
भयाण शांतता…
ह्या कथा पण वाचा
समाप्त
लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)