Home कथा रक्षाबंधन

रक्षाबंधन

by Patiljee
1333 views
रक्षाबंधन

समीर तुला किती वेळा सांगितले आहे बाबांसोबत असे बोलत जाऊ नकोस. तू जरी पुण्यात शिकत असलास तरी तुझे शब्द त्यांच्या मनावर घाव करतात आणि मग त्यांचा बिपी वाढतो. माहित आहे ना ते कसे अस्वस्थ होतात? (स्मिता थोडे रागात पण समजूतदार पणाने म्हणाली) अग ताई हो माहित आहे मला, मी नेहमीच त्यांचे ऐकतो पण तरी सुद्धा त्यांचे सारखे तेच तेच चालू असते.

समीर अभ्यास कर, समीर झाला का अभ्यास, किती अभ्यास झाला किती बाकी आहे? नुसता अभ्यास आणि अभ्यास बस. कधी मायेने विचारणार सुद्धा नाहीस की बाळा कसा आहेस? जेवलास का? सर्व ठीक आहे ना? वसतिगृहात राहतो आहेस पण कशाची गरज तर नाही ना तुला? अग तायडे प्रत्येक वेळी वर्गात पहिला येतो. मलाही माहित आहे माझा फोकस काय आहे. तरीसुद्धा त्यांचे सारखे तेच तेच बोलणे असते.

अरे बाळा, बाबा आहेत ते आपले त्यांना आपली काळजी आहेच, फरक एवढाच आहे की ते कधी दाखवून देत नाहीत. आता हेच बघ ना तुला मागच्या वर्षी त्यांनी एक प्रॉमिस केलं होतं की पुढच्या वर्षी ते तुला नवीन बाईक घेऊन देणार आहेत पण खूप मेहनत करून, दिवसरात्र काम करून अखेर त्यांनी पैसे जमवले. रक्षाबंधन दिवशी तुला तुझी नवीन गाडी मिळणार.

तायडे गप्प हा गप्प मला माहित आहे सर्व, बाबांना पैसे कमी पडत होते म्हणून तूच पैसे भरलेस आणि गाडी बुक केलीस. आई कडून मलाही बातम्या येतात. (दोघेही हसू लागले)

आज रक्षाबंधन म्हणून समीर पुण्यावर सकाळच्या बसने निघाला. खरतर तर ही बस अपेक्षेपेक्षा जास्तच गर्दीने भरली होती. पण लवकरात लवकर घरी जायचं आहे ह्या भावनेने तो वर चढला. कितीतरी महिन्यांनी आज ताईला पाहणार म्हणून तो खूप जास्त खुश होता. आई बाबा पेक्षा सुद्धा ताईने त्याला जास्त जीव लावला होता. म्हणून नेहमीच तो आया ताईंच्या जवळ जास्त असायचा.

आज रक्षाबंधन आहे आणि ताई मला ओवाळणार मग मी तिला पॉकेट मनी मधून साठवलेल्या पैशातून आणलेला छानसा पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस देणार. पण हे फक्त ह्या वर्षी, पुढच्या वर्षी जेव्हा जॉबला लागेल तेव्हा पहिल्या पगारातून सर्वात सुंदर वस्तू मी माझ्या तायडी साठी घेणार असे त्याच्या मनात चालूच होते.

तो घरी पोहोचला तर घरात खूप गर्दी जमा झाली. काय झालं नक्की? एवढे लोक का आलेत? माझ्या ताईला तर काही झाले नाही ना? की बाबांना हृदयविकाराचा झटका तर आला नाही की आईला काय झालं? अशा असंख्य प्रश्नांनी त्याचे डोकं भंडावून सोडले. समोर पाहिले तर एक मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळला होता. आता मात्र तो खूप घाबरुन गेला.

पण जवळ जाऊन पाहिलं तर तो मृतदेह त्याचाच होता. बाजूला ताई मोठ्या आकांताने रडत होती, बाबा तर फक्त गप्प राहून डोळ्यांनी न अनुभवणार क्षण सुद्धा पाहत होते.

रक्षाबंधन

समीर ज्या गाडीतून घरी येत होता त्या गाडीचा मोठा अपघात झाला होता. ह्या अपघातात ६ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यात समीर सुद्धा होता. त्याचे ते मेलेले शरीर, ताईचे रडणे आणि आई बाबांचे आश्रु तो पाहत तर होता, मोठ्या आकांताने ओरडत सुद्धा होता पण त्याचा आवाज मात्र कुणाला ऐकूच येत नव्हता. फक्त ताईचे वाक्य कानावर पडत होते बाळा असा कसा रे गेलास, आता ही राखी मी कुणाला बांधणार? दरवर्षी येणाऱ्या रक्षाबंधनाला मी कुणाला ओवळणार?

समाप्त

मराठी कथा वाचायची आवड असेल तर पाटीलजी लिखित ह्या कथा सुद्धा वाचा.

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल