आज माझं लक्ष कामात कमी आणि घड्याळाकडे जास्त होते. दोन वर्षानंतर पहिल्यांदा सेकंड शिफ्ट लागली होती. सेकंड शिफ्ट करण्याचा मुळात काही प्रोब्लेम नव्हता, प्रॉब्लेम होता घरी जाण्याच्या मार्गाचा. एक छोटीशी खिंड माझ्या गावात प्रवेश करण्या अगोदर लागायची. तिथे असणारी भयाण शांतता डोळ्यासमोर दिसत होती.
गावात खूप गोष्टी ऐकल्या होत्या की तिथे एक आत्मा भटकत असते. मनाने तर मी खूप धीट होतो पण तरीसुद्धा थोडीफार भीती होतीच मनात. एक मन करत होते की गावाकडे लोक आपल्या परीने गोष्टी रचवून सांगत असतात. त्यातलाच हा सुद्धा प्रकार असेल म्हणून थोडा पॉझिटिव विचार करत होतो.
अखेर सेकंड शिफ्ट सुटल्यानंतर आमची बस आम्हाला घेऊन गेली. माझ्या गावाच्या अलीकडे मी बस मधून उतरलो. पुढचा प्रवास मला पायपीट करून जावा लागणार होता. पावसाळा आताच सुरू झाला होता त्यामुळे वातावरणात गारवा होता. हळुवार येणारा बेडकांचा आणि अलगद अंगाला बिलगणारा ओलसर वारा वातावरणात अजून रंगत आणत होता. कावल्यांचा कर्कश आवाज सुद्धा कानी पडत होता.

थोडे पुढे गेल्यावर एका पडीक घराच्या बाजूला एक मुलगी बसलेली दिसली. त्याच मुली कडे बघत एक मुलगा थोडा पुढे बसलेला दिसला. पाहताना दोघेही चांगल्या घरचे वाटत होते. कदाचित भांडणे झाली असावी आणि इकडे येऊन बसले असावे असा अंदाज मी बांधला.
मनात थोडी भीती होतीच पण घड्याळात पहिले तर रात्रीचे नऊ वाजले होते. मी रस्त्याने जाताना त्या मुलाने मला आवाज दिला. घरी चाललास का? तेव्हा त्याच्या बोलण्याकडे मी खेचला गेलो आणि त्यासमोर जाऊन उभा राहिलो. हो आताच कामावरून आलो बस आतमध्ये सोडत नाही ना म्हणून एवढी पायपीट करावीच लागेल आता.
तो गालातल्या गालात हसला आणि त्या मुलीकडे पुन्हा पाहू लागला. मी त्याला म्हटलं कोण आहे ती मुलगी? तो पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला बाजूचे हे आपले आवरे गाव हे ना तेथील गुरुनाथ रावांची सून आहे. नेहमी तिच्या नवऱ्याच्या आठवणीत येऊन इथे बसते.
एक वर्ष झाले तिच्या नवऱ्याला जाऊन. समोर रस्ता दिसतोय ना तिथेच पावसाळ्यात घरी कामावरून परतत असताना गाडी स्लिप येऊन तो जाऊन दगडाला आदळला. तेव्हापासून प्रत्येक दिवशी ही रात्री अशी येऊन तिची वाट पाहत असते.
मी त्या मुलीकडे पाहिले तिच्या डोळ्यात अलगद येणारे अश्रू एवढ्या रात्री सुद्धा मला जाणवत होते. आपल्या जोडीदाराचे आयुष्यातून असे अचानक निघून जाणे खूप त्रासदायक असते. मला खूप वाईट होतं एव्हाना सर्व भीती मनातून निघून गेली होती. आता फक्त मी त्या मुलीचाच विचार करत होतो.
पुन्हा एकदा भानावर आलो तेव्हा त्या मुलाला विचारले की मग तुम्ही कोण आहात? तिच्यासोबत रोज येऊन तिला एकांतात तिला पाहत बसता का? नाही वो असे काही नाही. मी तिला आणत नाही ती एकटीच येते. मीच तिचा नवरा आहे ज्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता फक्त तिला पाहत बसतो. त्यापुढे काहीही करू शकत नाही.
भयाण शांतता….
ही पण होरर कथा वाचा माझा भूत प्रेम ह्या गोष्टीवर विश्वास नाही पण हा असा प्रकार घडला आणि
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)