Home कथा प्लॅटफॉर्मवर भेटलेला एक्स बॉयफ्रेंड

प्लॅटफॉर्मवर भेटलेला एक्स बॉयफ्रेंड

by Patiljee
30135 views

प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर येणारी रोहा ट्रेन अर्धा तास उशिराने धावणार आहे. अशी Announcement पनवेल स्टेशनवर होताच सीमा जाऊन बाजूच्या बाकावर बसली. कानात हेडफोन्स टाकून आजूबाजूचा परिसर न्याहाळत होती. पनवेलमध्ये कधीतरी कामानिमित्त तिचे येणे जाणे व्हायचं त्यामुळे नेहमीच ट्रेन उशिरा येते तिला माहितीच होतं. अचानक मला भास झाला की माझे नाव घेऊन कुणीतरी आवाज देतोय पण मी फारसा लक्ष दिला नाही कारण मी थोडीच एकटीच सीमा ह्या स्टेशन वर असेल? पण परत एकदा कानी आवाज आला आणि मी मागे वळून पाहिले तर महेंद्र उभा होता. त्या क्षणाला सर्व स्तब्ध झालं. प्लॅटफॉर्म वर असणारी ती रेलचेल अचानक थांबून फक्त जुन्या आठवणी डोळ्यासमोर जाग्या झाल्या. आज दोन वर्षांनी महेंद्रला समोर पाहत होते. काय सीमा मॅडम कशा आहात तुम्ही, किती महिन्यांनी दिसल्यात. त्याने अत्यंत साधेपणाने मनात कसलाही संकोच न ठेवता विचारले. म्हणजे त्याला अजिबातच त्याच्या चुकीची जाणीव नव्हती? एकदाही विचारावं नाही वाटलं की पुढे तू काय केलेस? किती सहज आणि काहीच झाले नाही अशा पद्धतीने तो समोर उभा होता. मी फक्त एवढेच म्हटले. काही महिन्यांनी पनवेलच्या ऑफिसमध्ये काम असते म्हणून येते.

तो अलगद येऊन माझ्या बाजूला बसला. मी जाणीवपूर्वक मोबाईल मध्ये लक्ष घालून बसले. तो पुढे काय बोलणार ह्याची वाट बघत होते पण तो फक्त माझ्या कडे चोरून बघण्यापलीकडे काहीच करत नव्हता. त्याची ही जुनी सवय अजूनही गेली नव्हती. अचानक तो जागेवरून उठला आणि बसलेल्या जागी बॅग ठेऊन गेला. कदाचित ट्रेन कधी येईल ह्याबत विचारपुस करण्यासाठी गेला असेल असा मी अंदाज बांधला.

माझे मन मला भूतकाळात घेऊन गेले. महेंद्र आणि माझे मन आमच्या घरासारखेच जोडले गेले होते. लहानपणापासून आम्ही एकत्र मोठे झालो. त्याची बहीण सुजाता आणि मी एकाच वर्गात शिकत होतो आणि महेंद्र आमच्या पेक्षा तीन वर्षांनी मोठा होता. पण तो नेहमीच असा वागायचा जसे काही तो आमच्या वयापेक्षा खूप जास्त मोठा आहे. आम्ही एकत्र वाढल्यामुळे आमच्यात कधी प्रेम झालं आम्हालाच कळलं नाही. प्रेम व्यक्त न करताच आम्ही एकमेकांना आपले मानले होते.

पण माझी बारावी झाल्यानंतर बाबांनी माझ्यासाठी रोह्यातील प्रतिष्ठित घरातील स्थळ पाहिले. मी खूप रडले, आई बाबांना खूप समजावले पण ते ऐकायला तयार नव्हते. त्यांचे म्हणणे असेच होते की आम्ही तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत त्यामुळे तू काही काळजी करू नकोस आम्ही तुला योग्य जोडीदार पाहू. मी महेंद्र जवळ जाऊन त्याच्या मिठीत खूप रडले त्याने सुद्धा मला आश्वासन दिलं की मी माझ्या बाबांसोबत बोलेल आणि तुला मागणी टाकेल. पण माझ्या लग्नाची तारीख जवळ येऊन सुद्धा त्याने कुणालाच काही सांगितले नाही.

आता मात्र मला असेच वाटतं होते की त्याचे मुळात माझ्यावर प्रेम नव्हतेच म्हणून तो काहीही न बोलता शांत झाला. माझे लग्न होऊन मी सासरी आली तरीसुद्धा त्याने काहीही केलं नाही. तेव्हापासून मी त्याचे तोंड सुद्धा न पाहण्याचा विचार केला. पण पहिलं प्रेम होत ते त्यामुळे विसरणे खूप कठीण जात होतं. कधी कधी आपल्याला वाटतं ना काही लोकांशी सर्व विसरून पुन्हा बोलावे पण त्यांचं वागणं, शेवटचं बोलणं आठवलं की मन नको म्हणतं. अगदी तेच माझ्यासोबत झाले.

असे नव्हते की मला चांगला जोडीदार मिळाला नव्हता. सुभाष माझा नवरा अत्यंत प्रेमळ होता. त्याने माझ्या प्रत्येक निर्णयात मला साठी दिली होती. माझ्या संसारात मी खूप म्हणजे खूप खुश होते. काय सरकार कुठे हरवला कधीपासून आवाज देतोय. महेंद्रच्या आवाजामुळे मी भूतकाळातून बाहेर आले. त्याने माझ्यासाठी कोक आणि केल्याची वेफर्स आणली होती. एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्याला माझी पसंत चांगलीच माहित होती. मोबाईल उघडून तो मेल चेक करत बाजूला बसला.

मी हळूच विचारले कसा चालू आहे संसार? खरतर माझ्या ह्या एका प्रश्नात दोन प्रश्न होते? एकतर त्याने लग्न केलं का? किंवा केलं असेल तर सुखी आहे का माझ्याशिवाय? त्याने अलगद चेहऱ्यावर स्माईल देत म्हटलं. हो खूप आनंदी आहे. सारिका खूप जीव लावते मला. त्याचे ते वाक्य माझ्या काळजाच्या आरपार रुतले. मग मी कधी नाही लावला की जीव असे मी रागात म्हणून, गाल फुगवून बसले.

पण मी असे का करत होते? त्याचा एवढा विचार मला का त्रास देत होता? माझ्या संसारात मी खुश आहे तरीसुद्धा का त्याच्या आयुष्यात मी खोलवर पाहत आहे? असे असंख्य प्रश्न माझ्या डोक्यात फिरत होते. खरतर मला त्याच्याकडून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे हवी होती. पण मी त्याला कोणताच प्रश्न विचारला नाही. त्याने माझा मोबाईल घेऊन स्वतःचा नंबर डायल केला आणि मिस कॉल दिला. तेव्हा अचानक ट्रेन येण्याची घोषणा झाली. मला जायची अजिबात इच्छा नव्हती.

वाटतं होत तो दिवस महेंद्र सोबत काढावा, जुन्या दिवसासारखे पूर्ण पनवेल फिरून काढावे. पण ते फक्त माझ्या मनात होते. त्याने माझ्या ट्रेनच्या डब्ब्यात येऊन मला सोडलं. मी डोळ्याची उघडझाप करताच महेंद्र ट्रेनच्या बाहेर उभा होता आणि माझी ट्रेन सुरू झाली. पुन्हा एकदा अनेक प्रश्नाचा भार घेऊन मी माझ्या प्रवासाला लागले होते. काही दूर गेल्यावर त्याचा मेसेज माझ्या मोबाईल मध्ये डिलीव्हर झाला. त्यात असं लिहिले होते.

सिमू खूप सारा सॉरी तुला, आता तुझ्या नजरेत मी उतरलोच आहे त्यामुळे ह्या सॉरीला काहीच अर्थ लागत नाही. मघाशी होणारी तुझ्या मनाची चलबिचल मी पाहिली. तुला खूप काही विचारायचं होतं पण विचारू शकली नाहीस. पण तुला जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुझ्या बाबांनी मला येऊन अतिशय प्रेमाने समजावले होते, ते म्हणले होते की महेंद्र मी तुला लहानपणापासून ओळखतो खूप चांगला मुलगा आहेस तू, तुझे आणि सिमाचे प्रेम आहे की मैत्री मला माहित नाही पण मला असे वाटत आहे की ते तु थांबवावे. कारण तिला खूप श्रीमंत घरातून वर सांगून आला आहे. माझी मुलगी तिथे खूप सुखात राहील. त्यामुळे मी आजवर तिला जे सुख देऊ शकलो नाही ते सुख तिला तिथे मिळेल. प्लीज तिच्या आयुष्यातून निघून जा तरच ती लग्न करेल. बाबांनी अक्षरशः माझ्यापुढे हात पसरले होते. आणि म्हणून तेव्हा त्यांना मी नाही म्हणू शकलो नाही.

महेंद्रचा हा मेसेज पाहून सीमा खूप जोरात हुंदके देऊन रडू लागली. तिच्या मनात खूप काही निर्माण झालं होतं पण आता ती महेंद्रच्या बाजूने विचार करत होती. एवढी वर्ष मी ज्याला वाईट समजत होते त्याने माझ्या बाबांसाठी माझा त्याग केला. हा विचार करून माझे डोके भांबावून गेले होते. वाटत होते परत उतरून पनवेल गाठून महेंद्रला कडकडून मिठी मारावी. पण आता वेळ निघून गेली होती. परत ती वेळ येईल का नाही ह्याचाही मला अंदाज नव्हता. (ही कथा सुद्धा वाचा कधी कधी नकळत आयुष्यात येणारी माणसे सुद्धा आयुष्याचे सोने करून टाकतात, वाचा पूर्ण कथा तुम्हालाही ह्या गोष्टीचा प्रत्यय येईल )

समाप्त

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल