अरे कधीपासून तुला कॉल करतेय आहेस कुठं तू? काकांनी लग्न पत्रिका आणल्या आहेत. कधीच तुला व्हॉट्सप केलं आहे पण तू कुठे गायब आहेस दिवसभर. (शमाने दिवसभराचा राग अतुलवर काढला) अग हो हो शमे धीर धर जरा मला बोलू तर दे, अग आज दिवसभर मी सुद्धा लग्नाच्या गडबडीत व्यस्त आहे. तुला तर माहित आहे सर्व मला एकट्यालाच करावे लागत आहे त्यामुळे फोन हातात घ्यायची सुद्धा सवलत नाही.
अतुल आणि शमा ह्यांचे एकमेकावर खूप प्रेम होतं. म्हणूनच तीन वर्षाच्या ओळखी नंतर दोघांनीही लग्न करण्याचा विचार केला होता. अतुल अनाथ होता तर शमाचे आई बाबा सुद्धा लहानपणीच वारले होते. तिच्या काका काकिनी तिला लहानाचं मोठं केलं. पण कधी हवं तसं प्रेम तिच्या वाट्याला आलेच नाही. काका काकीने खूप छळल होत तिला त्यामुळे अगदी कमी वयात ती समजूतदार झाली होती. कसे बसे बारावी शिक्षण घेऊन तिने स्व हिमतीवर जॉब मिळवला होता. तिथेच तिची ओळख अतुल सोबत झाली. अगदी कमी वेळात दोघांमध्ये मैत्री आणि मग त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते.

दोघानाही आई वडिलांचे प्रेम कधी मिळालेच नाही त्यामुळे कमी वेळात ते एकमेकांकडे ओढले गेले. अतुलने जाऊन शमाच्या घरी रीतसर लग्नाची मागणी टाकली. काका काकिना सुद्धा आधीच ती जड झाली होती म्हणून लगेचच लग्नाचा मुहूर्त काढला होता. ५ एप्रिल लग्नाची तारीख ठरली. सर्व काही सुरळीत चालू होते. दोघांनी आपल्या आयुष्यात खूप काही सोसले होते.
म्हणूनच दोघांचे एकत्र येणे जणू त्या दोघांसाठी आनंदाची पर्वणी होती. दोघांनी मिळूनच लग्नाची सर्व तयारी केली होती. पण म्हणतात ना कधी कधी सुख एवढ्या सहजतेने तुमच्या आयुष्यात येतं नाही. भारतात कोरोना सारख्या महामारिने शिरकाव केला होता. म्हणूनच सरकारने जनता कर्फ्यु लाऊन २१ मार्च रोजी लॉक डाऊन घोषित केलं. लग्न अवघ्या १५ दिवसावर येऊन ठेपल होतं. पण होत्याच नव्हतं होऊन बसलं. काही दिवसात हे सर्व वातावरण शांत होईल असे वाटत असताना दिवसेंदिवस ह्या विषाणू ने भारतात मोठ्या प्रमाणात शिरकाव केला होता.
सरकारने ज्या ठिकाणी गर्दी होईल अशा कार्यावर बंदी घातल्याने लग्न पुढे ढकलले गेले. दोघांच्या मनाची काय अवस्था झाली असेल हे त्या दोघांनाच माहित होत. पण चेहऱ्यावर फक्त ते आम्ही सुखी आहोत हे दाखवत होते. पण आतून पार गळून गेले होते. एक मन करत होते की तोडावी ही लॉक डाऊन बंधने आणि जाऊन एकमेकांना घट्ट मिठी मारावी पण काही केल्या तेही शक्य नव्हते.

आधी एप्रिल मग मे आणि आता जून सुद्धा निघून गेला होता पण ह्या रोगाने भारतातून आपले डोके काढले नव्हते शिवाय आणखी खेड्यापाड्यात ही आपली मुळे रुजवायला सुरुवात केली होती. हळू हळू सरकारने कार्यामध्ये काही ठिकाणी शिथिलता घोषित केली होती. लग्न समारंभाना सुद्धा मोजक्या माणसांना घेऊन लग्न लावण्याची परवानगी दिली होती. दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. किती वर्षांनी पाहिलेले स्वप्न अखेर पूर्ण होणार म्हणून दोघेही खूप खुश होते.
अखेर तो दिवस उजाडला. वीस तीस माणसाच्या समोर दोघांनी ही लगीनगाठ बांधली. आजचा दिवस दोघांसाठी खूप खास होता कारण आता फक्त राजा राणी आणि त्यांचा संसार. अनाथ असलेले, प्रेमा वाचून वंचित असलेलं ते दोघे आता एकमेकांच्या प्रेमात तुडुंब बुडून जाणार होते. पण म्हणतात ना काही स्वप्न फक्त स्वप्नच राहतात. लग्नाच्या दोन दिवसानंतर अतुलची प्रकृती अचानक बिघडली. आधी खोकला मग तापाने अंग फण फणू लागले. ही सर्व कोरोनाची लक्षणे होती.
आपल्या नवीन संसाराची स्वप्ने पाहणारी ती दोघे आज कोरोनाची टेस्ट करून घरी आले होते. दोघेही एकमेकांना सांभाळून घेत होते. काही होणार नाही अशी निष्फळ आश्वासने देत होते. त्या रात्री दोघांच्याही डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी रिपोर्ट आले आणि होत्याचे नव्हते झाले होते. अतुलला कोरोनाची लागण झाली होती. खूप रडत होता तो पण शमाला त्याने जवळ येऊन दिलं नाही. कारण हा आजार कधी एका मुळे दुसऱ्याला होते कळत सुद्धा नाही.
शमा आतल्या रूममध्ये खूप रडत होती. वाटत होत जाऊन घट्ट मिठी मारावी अतुलला आणि म्हणावे होऊदे मला काहीही, कारण हा रोग मला झाला तर मी तुझ्या सोबत येईल. पण त्याने शमाला हे करूच दिले नाही. महानगरपालिकेची रुग्णवाहिका आली आणि अतुलला घेऊन निघून गेली. आता मात्र ते घर शमासाठी भकास वाटत होतं. आजूबाजूचे लोक विचित्र नजरेने लांबूनच तिच्याकडे पाहत होते.
एव्हाना ही बातमी सर्व मित्र मैत्रीणीना कळली होती. कुणी कॉल करून तर कुणी मेसेज करून सांत्वन करत होते. अग काही नाही होईल अतुल बरा हा आजार खूप वाईट असला तरी मृत्युदर खूप कमी आहे. खूप लोक बरी होतात बघ एक दोन दिवसात अतुल घरी पण येईल. असा आलेला मैत्रिणीचा एक मेसेज शमाला सुखावून गेला होता. चिंतेत होती पण त्या मेसेज मुळे रात्री झोप थोडी का होईना झोप लागली.
दुसऱ्या दिवशी तिने अतुलला कॉल केला. पण समोरून त्याने उचलला नाही. मेसेज केला पण एकही मेसेजचा रिप्लाय आला नाही. आता मात्र शमाच्या मनात शंकेने काहूर माजवले होते. अचानक फोनची रिंग वाजली. फोन हॉस्पिटल मधून होता. फोन उचलताच समोरील व्यक्तीच संभाषण ऐकुन ती जागीच बेशुद्ध झाली. मध्यरात्री अतुलचा ह्या गंभीर आजाराने बळी घेतला होता सगळं काही संपल होत.
संसारात अशाही गोष्टी घडतात पण कुणी सांगत नाहीत, वाचा असाच एक मजेदार किस्सा
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)