Home कथा प्रेमात ट्विस्ट

प्रेमात ट्विस्ट

by Patiljee
6160 views
प्रेमात ट्विस्ट

कॉलेजचे लाईफ किती छान असतं ना? मित्र मैत्रिणी, क्लास बंक, सिनेमा, पिकनिक आणि आपल्या पार्ट्या आणि ह्या सर्वात सुद्धा एक गोष्ट खास असते ती म्हणजे आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती. पण कधी कधी सर्वच तर आपल्या मनासारखे होत नाही ना?

भूतकाळात हरवलेली मी माझ्या मुलीच्या आवाजाने बाहेर आले. कॉलेज सोडून आज आठ वर्ष झाली असतील पण त्यानंतर पुन्हा कधी त्याची भेट झालीच नाही. आधी जॉब मग लग्न आणि आता गोंडस मुलगी. स्वतःपेक्षा जास्त माझ्यावर प्रेम करणारा नवरा सुद्धा मला मिळाला होता. पण शेवटी प्रत्येकाचा एक भूतकाळ असतोच जो आपण कधीच विसरू शकत नाही.

आजही आठवतो मला तो दिवस जेव्हा दहावी पास करून कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला होता. इतके सोपे नव्हते हे कारण अभ्यासात मी खूप जास्त मंद होते. कसे बसे पास होऊन अखेर कॉलेजमध्ये येणे माझ्यासाठी सर्वात मोठी चढाई होती. मी हुशार नसले तरी माझे डोळे खूप बोलके होते. ह्याच डोळ्याने अनेकजण घायाळ व्हायचे पण तो कधी झालाच नाही.

तो म्हणजे रीहांश, माझ्याच वर्गातला हुशार मुलगा अगदी नेहमीच टॉपर. म्हणून तर त्याच्या मागे नेहमीच मुलींचा घोळका असायचा. त्याच्या नोट्स नेहमीच पूर्ण असायच्या म्हणून सर्वच त्याच्या मागे पुढे करायचे. शिक्षकांचा लाडका आणि आमच्या वर्गात सुद्धा सर्वांचा लाडकाच होता. नेहमीच चेहऱ्यावरील स्माईलने इतरांना सुद्धा आनंदी ठेवण्याची कळा जणू त्याला अवगतच होती.

इतर मुली प्रमाणे मी सुद्धा त्याकडे कधी ओढली गेली हे माझे मला सुद्धा कळले नाही. पण माझी त्याच्याशी बोलण्याची हिम्मत मात्र कधी झालीच नाही. थॅन्क्स आमच्या पाटील सराना की त्यांनी मला आणि त्याला एकाच प्रोजेक्टवर काम दिलं. म्हणून मला त्याच्या जवळ तरी येता आलं. आधीच मी ढ आणि त्यात तो हुशार. मग काय सर्व प्रोजेक्ट तर त्यांनीच पूर्ण केले मी तर फक्त त्याला न्याहाळत बसायचे.

कॉलेजचे एक वर्ष असेच निघून गेले. पण आता आम्ही क्लोज फ्रेंड झालो होतो. त्याकडून कुणालाही काम करवून घ्यायचे असल्यास सर्व मला पकडून विनवणी करायचे. पण आता तो फक्त माझा मित्र नव्हता तर मला त्याबद्दल खूप काही वाटत होतं. एव्हाना मी त्याच्या आवडी निवडी आत्मसात केल्या होत्या.

कधी तो आनंदी होतो, कधी दुखावतो, कुठे वेळ घालवायला जास्त आवडते, कोणता अभिनेता जास्त आवडतो, कोणत्या दिवशी कोणते कपडे घालतो, असे सर्वच मला कळून चुकले होते. पण त्याचे काय? त्याला माहित असतील का माझ्या आवडी निवडी? त्याला ब्लॅक कलर आवडतो म्हणून मी माझ्या नेहमीच्या पेहरावात ब्लॅक कलर असलेली काही ना काही वस्तू सोबत आणतेच. पण हे त्याला कळलं असेल का?

पाहता पाहता पुढील दोन वर्ष कधी गेली आम्हाला सुद्धा कळले नाही. शेवटच्या वर्षाला आम्ही होतो. काही करून मी त्याला मनातील भावना सांगेन आणि तो मला होकार नक्कीच देईल हे माहीत होत. कारण कॉलेज मध्ये सर्वात जास्त वेळ तो माझ्याच सोबत असायचा. आज आई बाबा गावी गेले होते म्हणून मी त्याला घरी बोलावले. ही एक प्रकारची मिनी डेटच होती. मी मनाशी पक्क ठरवलं होतं की आज काही करून त्याला माझ्या मनातील भावना सांगणार.

किती छान बाग आहे ग तुझ्या घराबाहेर असे घरात आगमन करतानाच त्याने म्हटले. पाहायला गेले तर ती बाग माझ्या आईने तयार केली आहे, ती सुद्धा माझी आवडती जागा बळकावून. पण इथे मात्र मी आईचे क्रेडिट घेतलं. अरे हा मला खूप आवडते असे बाग नजेरेसमोर असलेली. ये बस तू काय घेणार सांग? चहा की कॉफी तसेही तुला चहाच आवडतो तो ही आले आणि मसाला टाकून. माहीत आहे मला.

तो फक्त हसला आणि सोफ्यावर बसला. लहानपणापासून चे माझे सर्व फोटो भिंतीवर लटकत होते. ते सर्व न्याहाळत तो बसला होता. मी सुद्धा चहाचा एक कप त्याच्या हातात देऊन दुसरा माझ्या हातात घेऊन त्यासमोर बसली. अशाच आमच्या गप्पा चालूच राहिल्या. पण आज मला काही करून त्याच्या मनातील माझ्याबद्दलच्या भावना जाणून घ्यायच्या होत्या.

समोर बसलेली मी उठून त्याच्याजवळ येऊन बसले. त्याचा हात हातात घेतला आणि अलगद माझं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं आणि म्हणाली.

खरतर रिहांश मला हे बोलावे लागतेय ह्यात मी वेडी आहे की तू वेडा आहेस मला माहित नाही. कारण एवढी तीन वर्ष आपण सोबत आहोत. एव्हाना तुला कळायला हवं होतं. पण असो आज मीच व्यक्त होते. आवडतोस तू मला, आणि हे आतापासून नाही तर कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून. मला वाटलं होतं हे तू कधीतरी म्हणशील पण मी अजून थांबले असते तर मी अशीच म्हातारी झाली असती.

माझ्या ह्या बोलण्यावर तो फक्त पाहत राहिला. मला बाजूला करत समोर असलेल्या खिडकी समोर जाऊन उभा राहिला. मी मागून जाऊन त्याच्या पाठमोऱ्या बाजूला घट्ट मिठीत घेतलं पण त्याने मला बाजूला केलं आणि म्हणाला.

मला कधीच वाटलं नव्हत की तुझ्या मनात असे काही येईल. तो पुढे काही म्हणायच्या आत मी पुन्हा एकदा त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले आता गप्प बस ना रीहू मला माहित आहे तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतोस. पण आता मात्र तो माझ्या चिडला. नाही यार हे कधीच नाही होऊ शकत. नाही आवडत तू मला. त्याच्या ह्या बोलण्याने मला काय बोलू काहीच कळलं नाही.

नाही म्हणजे माझ्यात काय कमी आहे रिहांश? सुंदर आहे, चांगल्या घरातील आहे, तुला तुझ्यापेक्षा चांगली ओळखते, अजून काय करावं म्हणजे तुला माझे प्रेम कळेल? नाही ग आता कसे सांगू तुला? नाही आवडू शकत तू मला? का नाही आवडू शकत मी तुला, मी नाही आवडत मग मुलं आवडतात का तुला?

हो हो हो मला मुळेच आवडतात, नाही आवडत मुली मला.

त्याच्या ह्या उत्तराने मी निशब्द झाले. काय करणार होते मी? असेही नाही की त्याने मला नकार दिला होता की माझ्यात काही चुका काढल्या होत्या. त्या दिवशी तो माझ्या घरातून आणि माझ्या आयुष्यातून असा काही निघून गेला की परत कधी समोर आलाच नाही. आज ह्या गोष्टीला आठ वर्ष झाली आहेत. कुठे आहे तो? काय करतो? काहीच नाही. पण मी आजही त्याच्यावर प्रेम करते. तो सुखात असुदे बाप्पा असे रोज गणेशाला सांगत असते.

एखाद्या व्यक्तीला मनापासून जीव लावणे, खूप प्रेम करणे, प्रत्येकवेळी त्याच्या आनंदात आपला आनंद पाहणे, ह्यालाच तर प्रेम म्हणतात ना? आणि लग्न झाले असून सुद्धा मला त्याबद्दल अजून हे सर्व वाटत होतं. हा गुन्हा नक्कीच नाहिये तर एखाद्या व्यक्तीसाठी हे सर्व करत असताना आपले अस्तित्व विसरून जाणे हा नक्कीच गुन्हा आहे.

आयुष्याच्या ह्या वळणावर कधीतरी त्याची आणि माझी गाठ होईल ह्या आशेवर गेली आठ वर्ष मी झुरत आहे. तो सुखरूप असावा हेच मागणं आहे. कधीतरी नक्कीच त्याची आणि माझी भेट होईल.

ह्या पण कथा वाचा

समाप्त

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल