पावसाच्या त्या सरी पाहून मन पुन्हा एकदा भूतकाळात डोकाऊ पाहत होत. मागच्या वर्षी ह्याच पावसाळ्यात तर तिची आणि माझी गाठभेट झाली होती. तिच ऑफिस माझ्या दुकानाच्या जवळपासच होत. त्यामुळे ती नेहमी दुकानासमोरुन चालत जायची. मी ज्या दुकानात काम करत होतो त्या दुकानाच्या खिडकीतून रोज तिला जाताना पाहायचो. बऱ्याचदा तिने सुद्धा माझ्याकडे पाहिले होते.
पण चेहऱ्याच्या हावभावा वरून तिने ते कधीच जाणवू दिले नव्हते. पावसाळ्याचे दिवस होते. आज बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. तिची ह्या रस्त्याने जाण्याची वेळ कधीच निघून गेली होती पण तरीही ती अजून आली नव्हती. माझे लक्ष कामात कमी आणि तिच्या येण्याकडे जास्त लागले होते. अखेर ती समोर येताना दिसली. आज गुलाबी रंगाचा कुर्ता तिने परिधान केला होता.

अत्यंत साध्या कपड्यात सुद्धा तिचे सौंदर्य सर्वात वेगळे भासत होते. त्यात मुसळधार पासून आणि ती भिजत घरी चालली होती. मला कळून चुकले होते की तिने छत्री आणली नव्हती. बाहेर संध्याकाळ झाली होती पण पावसामुळे अंधार काळेकुट्ट ढगांनी चोहीकडे घेरला होता. मी कोणताच विचार न करता दुकानातील छत्री घेऊन तिच्या मागे गेलो आणि छत्री तिच्या समोर पकडली.

अचानक अंगावर पडणारे पाणी बंद झाल्याने तिने मागे वळून पाहिले तर तिच्या समोर मी उभा होतो. ती काही बोलणार ह्या अगोदर मी तिच्या हातात छत्री देऊन तिथून पळ काढला होता. ती माझ्या ह्या वेडसर पणावर हसली होती हे मी चोरून पाहिले होते. त्या दिवसापासून ती रोज माझ्या दुकानातून रस्ता ओलांडताना मला पाहून हसायची.
तिची ती माझ्यासाठी असणारी स्माईल पाहून मला संपूर्ण जग काबिज केल्याची फिलिंग निर्माण व्हायची. आमचे हे एकमेकांना पाहणे एक महिनाभर चालू राहिले. पण ना मी जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो ना ती येऊन माझ्याशी बोलत होती. अखेर एका संध्याकाळी एका लहान मुलाने पत्र आणून माझ्या हातात दिलं. मी पत्र वाचले तर तिनेच माझ्यासाठी ते लिहिले होते.
हाय… खरतर मला तुझं नाव माहित नाहीत म्हणून काय लिहू सुचत नाहीये. पण तुला मी खूप आधीपासून ओळखत आहे. तू मला कधी पासून ओळखतोस माहित नाही. ऑफिसच्या पहिल्याच दिवशी जेव्हा तुला ह्या दुकानाच्या बाहेर त्या डार्क पिवळ्या शर्ट मध्ये पाहिले आणि हसूच आवरले नाही. एवढा भडक कलर कोण घालतो आता म्हणून घरी जात पर्यंत हसत होते. नंतर रोज काही ना काही कारणांनी तुला पहायची सवय होऊन गेली.
माहित नाही हे प्रेम आहे की मैत्री पण तुझा हा निरागस चेहरा खूप काही बोलून जातो. मी तुझ्या दुकानातून समोर आले की तुझे ते खाली जाणारे डोळे आणि मग मी दरवाजा आड गेले की माझ्याकडे एकटक पाहणे. खरंच खूप छान वाटते रे. त्या दिवशी पावसात भिजत होते. कुणी जास्त विचार नाही केला पण तू कुणाचीही पर्वा न करता मला छत्री आणून दिलीस. खरंच किती छान वाटलं होतं तेव्हा मला हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही. ह्या रविवारी गणपती मंदिरात भेटशील मला? मी येऊन थांबेन तिथे बघ वेळ मिळाला तर नक्की ये.

तिचे हे पत्र वाचून माझ्या आनंदाचा पारा तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचला होता. काय करू आणि काय नको करू हेच चालू होत. ठरलेल्या दिवशी मी बाप्पाच्या मंदिरात जाऊन बसलो. तिच्या येण्याची वाट पाहिली, मागून येऊन डोळे बंद करेल की समोर येऊन फक्त हाय हॅलो करेल की घट्ट मिठी मारेल? असे अनेक प्रश्न माझ्या मनाची चलबिचल करत होते. एक तास होऊन गेला तरी ती अजून आली नव्हती. एकमन करत होते आत्ता येईल तर दुसरे मन असंख्य प्रश्न निर्माण करत होते.
एक तास, दोन तास, चार तास निघून गेले तरी सुद्धा ती आली नव्हती. मला राग नाही आला पण वाईट खूप वाटलं. जर तिला माझी अशीच थट्टा करायची होती तर का असे भेटायला बोलावले, दुकानात येऊनच काही चांगले वाईट बोलायचे ना. दुसऱ्या दिवसापासून मी असेच ठरवले होते की तिच्याकडे पाहायचे नाही. पण तिची येण्याची वेळ झाल्यावर नजर आपोआप दरवाजा कडे वळली. एक तास होऊन गेला तरी ती दुकानासमोरून गेली नव्हती.
असे एक दिवस नाही तर एक पूर्ण आठवडा झाला ती मला दिसलीच नाही. आता माझ्या रागाचे रूपांतर चिंतेत झाले होते. एक दिवस मी तिच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन पोहोचलो. कुणाला काही विचारणार तेव्हाच समोर एक बॅनर पाहिला, त्या बॅनरवर तिचा फोटो होता आणि खाली लिहिले होते भावपूर्ण श्रद्धांजली.
ही पण भयकथा वाचा माझा भूत प्रेम ह्या गोष्टीवर विश्वास नाही पण हा असा प्रकार घडला आणि
तिथेच मी खाली बसलो, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आमचे नाते काय होते, आमच्या नात्याला अजून कोणतेच नाव नव्हते पण तरीसुद्धा माझे आश्रु थांबत नव्हते. तिच्याच ऑफिस मधल्या एका व्यक्तीकडून कळले की शॉपिंगला गेली असताना घरी परतत असताना एका भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने तिला उडवले. आणि जागीच तिचा मृत्यू झाला. आता जेव्हा कधी हा पाऊस सुरू होतो तेव्हा पावसाळा आणि तिची आठवण माझे मन पुन्हा एकदा मला त्या सोनेरी सुखद क्षणात घेऊन जातं.
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)