सुमी आज संध्याकाळी बॉस घरी येणार आहे जेवायला, काहीतरी छान बेत बनव, एक काम कर बिर्याणी आणि चिकन शोरमा कर. बॉस एकदम खुश झाला पाहिजे. (सुशांतने मोठ्या उत्साहात फोनवर पत्नी सिमाला म्हटलं) अहो आज अचानक कसा बेत केलात? किती घाई होईल माझी? सामान पण नाहीये घरात जास्त काही? तुम्ही पण ना कधी कधी मंद सारखे वागता. करते मी काही चला ठेवा फोन लागू दे मला कामाला आता.
सीमा आणि सुशांत दोघांचेही अरेंज मॅरेज होतं. काही वर्ष एकमेकांना समजण्यात गेली खरी पण नंतर मात्र त्यांचं एवढं बोंडींग जमलं की त्यांच्या कुटुंबात सर्वात जास्त हॅपी कपल म्हणून ते ओळखू लागले. सुशांत तिथल्याच एका फार्मा कंपनीमध्ये काम करत होता. आपल्या कामात तत्पर, हुशार आणि नेहमीच सर्वांची काळजी घेणारा. आपल्या कुटुंबाला त्याने एकत्र बांधून ठेवलं होतं. त्याच्या ह्याच स्वभावामुळे अरेंज मॅरेज असून सुद्धा सीमा त्याच्या प्रेमात नव्याने पडली होती.
लग्नाला ८ वर्ष झाली होती आणि त्यांचं प्रेम दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. जेवणाची सर्व तयारी झाली होती. काही वेळातच सुशांत आणि बॉस घरी येणारच होते. एवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला. दोघेही बाहेर आल्याची जाणीव सीमाला झाली. तिने बेल वाजण्या अगोदरच दरवाजा उघडला. समोर सुशांतला पाहून ती गाळात हसली पण हे हसू फार काळ टिकलं नाही. तिच्या बाजूला त्याचा बॉस होता आणि हा बॉस दुसरा तिसरा कुणी नसून जयवर्धन होता. तिचा भूतकाळ.
दोघेही एकमेकांकडे फक्त पाहू लागले. अग नुसते पाहणार आहेस की आम्हाला आतमध्ये घेणार आहेस? हो हो सॉरी या या आतमध्ये म्हणत तिने त्यांना बसण्याचा आग्रह केला. फ्रेश होण्यासाठी सुशांत आतमध्ये गेला आणि ती जयवर्धन वर बसरसली. का आला आहेस तू इथे? माझ्या आयुष्याची वाट लावून झाल्यावर तुला चैन नाही पडलं का? इतका कसा रे तू निर्लज्ज, एवढ्या वर्षांनी पुन्हा माझ्याच दाराची पायरी चढलास?
जयवर्धन हे फक्त ऐकत होता कारण त्याला थोडीही कल्पना नव्हती की हे घर सीमाचे असेल. त्याचे मन त्याला भूतकाळात घेऊन गेले. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला त्याने SC कॉलेज पनवेल इथे प्रवेश घेतला होता. इथेच त्याची ओळख सीमा सोबत झाली. कॉलेजमध्ये टॉम बॉय म्हणून तिची ओळख होती. राडा करणे, दंगा करणे, बुलेट घेऊन कॉलेज मध्ये येणे हा तिचा नित्यनियम होता. तिच्या ह्याच स्वभावामुळे तिच्याशी कुणी मैत्री करत नव्हते.
पण जयवर्धनला हा स्वभावच खूप आवडला होता. त्याने तिच्यापुढे मैत्रीचा प्रस्ताव मांडला. वो हिरो नवीन आहेस ना कॉलेज मध्ये मग तसाच रहा, आधी माझी बॅक स्टोरी जाणून घे मग मैत्री तर सोड माझ्या आसपास पण फिरकणार नाहीस तू. अग सर्व माहिती काढून तर आलोय. अशी खतरनाक मैत्रीण मिळाली तर आमचेच भाग्य उजलून येईल असे म्हणत तो गालाताच हसला.
सीमासाठी सुद्धा हे नवीन होतं. कुणी मॅटर केला तर हात पुढे करून बोलणारे खूप होते पण मैत्रीसाठी हात पुढे करणारा जयवर्धन पहिलाच. म्हणूनच कदाचित तिला तो इतरांपेक्षा वेगळा वाटला. हळूहळू त्यांच्यात घट्ट मैत्री झाली आणि मग प्रेम सुद्धा, संपूर्ण कॉलेज समोर सीमा ने त्याला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं. जयवर्धन सुद्धा खूप खुश होता कारण त्याची बेस्ट फ्रेंड आता प्रेयसी होणार होती.
कॉलेजचे ते वर्ष कसं गेलं दोघांनाही कळलं नाही. काही दिवस तर असे सुद्धा गेले ज्यात दोघांनी नको असलेली बंधने पण तोडून टाकली. पण इथे मात्र चुकी झाली. काहीच दिवसात कळलं की सीमा गरोदर आहे. एवढे प्रिकोशन घेऊन सुद्धा हे कसे झाले? हा दोघांनाही प्रश्न पडला होता. पण आता हे विचार करून काहीच फायदा नव्हता. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं.
गरोदरपणाची लक्षणे सीमाला घरात जाणवत होती. त्यामुळे तिच्या आईने तिला ह्याचा जाब विचारला? ही गोष्ट जेव्हा तिच्या बाबांच्या कानावर गेली तेव्हा तिने बेधडक पणे तिच्या बाबांना तिच्या आणि जयवर्धनच्या प्रेमाबद्दल सांगितले होते. आम्ही एकमेकावर प्रेम करतो त्यामुळे आम्ही कोणतीच चूक केली नाही आहे असे तिचे ठाम मत होते.
हे ऐकुन तिच्या वडिलांनी तिला खूप मारलं होतं पण ती आपल्या मतावर ठाम होती. त्याच रात्रीत तिने जयला फोन केला काही करून आज आपण पळून जाऊया, माझे कुटुंब ह्या गोष्टीला परवानगी देणार नाही. तू पनवेल रेल्वे स्टेशनवर ये मी पण तिथेच भेटते तुला. असे म्हणत तिने हाताला लागेल ते सामान घेऊन स्टेशन गाठले. कुठे जायचं होतं काहीच माहीत नव्हते. जय आला की ठरवू असे म्हणत ती त्याची वाट पाहू लागली.
नऊ वाजले होते तरी तो आला नव्हता. फोन लावला तर स्विच ऑफ येत होता. आता मात्र सीमा अस्वस्थ होऊ लागली. दहा, अकरा आणि आता बारा देखील वाजून गेले होते. पण त्याचा कुठेच पत्ता नव्हता. ती संपूर्ण रात्र सीमाने त्या स्टेशनवर बसून काढली पण तो आलाच नाही. आता मात्र तिने ठरवले होते बस झालं हा पोरकटपणा, ती घरी निघून आली.
त्या दिवसापासून ना जय ने तिला कॉल केला ना तिने त्याला कॉल केला. त्या लहानग्या चिमुरड्याचा काहीच चुकी नसताना देखील त्याला ह्या जगात येण्या अगोदरच मारून टाकलं होतं. तिच्या मनाविरुद्ध ही गोष्ट झाली होती पण दुसरा पर्याय नव्हताच तिच्याकडे म्हणून ती घरच्यांच्या हो ला हो करत गेली आणि मग लग्न सुद्धा केलं.
बॉस तुम्ही चहा घेणार मी कॉफी? चहाचा घ्या माझी बायको छान चहा करते, सुशांतच्या ह्या वाक्याने जयवर्धन भूतकाळातून बाहेर आला. सीमा त्याकडे रागात बघत होती. खूप काही बोलायचे होतं तिच्याशी पण कोणत्या तोंडाने बोलणार म्हणून गप्प होता. फक्त चहा घेऊन त्याने घरातून एक्झिट घेतली. बॉस असे अचानक का गेले म्हणून सुशांत सुद्धा संभ्रमात होता.
एक दोन दिवस सीमाचे मन सुद्धा थारावर नव्हते. भूतकाळ डोळ्यासमोर फिरत होता. अशात फोनची रिंग वाजली. अनोळखी नंबर होता. हॅलो प्लीज फोन ठेऊ नकोस माझे ऐकुन घे आधी असे म्हणत जय दबक्या आवाजात तिला बोलू लागला, त्या रात्री तुझा फोन आला आणि मी तयार देखील झालो तुझ्यासोबत यायला. मग काही वेळ विचार केला की मी असा अचानक गायब झालो तर माझ्या कुटुंबाकडे कोण बघणार?
माझ्याच कडून त्यांना अपेक्षा होत्या. आणि एवढ्या लवकर लग्न करणे म्हणजे मला जॉब शोधून कुठेतरी सेटल व्हावं लागलं असतं. आणि तेच मला नको हवं होतं. काही करून मला चांगलं शिक्षण घेऊन स्वतः काही करून दाखवायचं होतं. आणि एवढ्या लवकर लग्न करून मला ह्या गोष्टी करता आल्या नसत्या. माहीत आहे मला ह्यात तुझी काहीच चुकी नाही आहे, ह्या प्रकरणात मीच तुझा दोषी आहे. म्हणून त्याची शिक्षा म्हणून मी आजवर लग्न केलं नाहीये. पैसा तर खूप आला जवळ पण सुख समाधान ह्या गोष्टी कधी जवळपास फिरकल्या सुद्धा नाहीत.
शक्य असल्यास माफ कर मला आणि आपण आपल्या नात्याची सुरुवात नव्याने करू शकतो. तू माझ्याकडे ये मी तुला हवं ते देऊ शकतो. एवढे सर्व ऐकुन सीमाचा पारा आता जास्तच चढला. जेव्हा तुझी मला गरज होती तेव्हा पलकुट्या सारखा पल काढलास आणि आता म्हणतोय माझ्या जवळ ये, अरे माझ्या नवऱ्याकडे पैसा कमी असला ना तरी माणुसकी खूप आहे.
त्याने मला पैशाने नाही तर प्रेमाने एवढ्या वर्ष आनंदात ठेवलं आहे. आणि बरंच झालं तू मला सोडून गेलास नाहीतर एवढे प्रेम करणारा, जीवाला जीव लावणारा नवरा मला मिळाला सुद्धा नसता. त्यामुळे तुझे खूप.खूप.धन्यवाद आणि आता यापुढे मला मेसेज कॉल करू नकोस.
ह्या कथा पण वाचा
समाप्त
लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)