Home कथा नराधम

नराधम

by Patiljee
28991 views
नराधम

पप्पा मला ऑफिसमधून येताना पावभाजी आणा, पप्पा ह्या वीकेंड आपण समुद्रावर जाऊ, पप्पा ह्या महिन्यात मला तो नवीन ड्रेस हवाच आहे असे नेहमी म्हणणारी माझी परी काही दिवसापासून शांत शांत वाटतं होती. बऱ्याचदा मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण सर्व निष्फळ कारण ती मला टाळत होती. सारखी चिडचिड करत होती.

परी तीन वर्षाची असतानाच तिच्या आईचे निधन झाले. त्यानंतर सिंगल फादर म्हणून नेहमीच तिच्या सोबत राहिलो. नातेवाईक, मित्र मैत्रीण सर्वांनी सल्ला दिला की दुसरं लग्न कर पण येणारी स्त्री माझ्या परीला आईची माया देईल की सावत्र आई राहून छळ करेल. ह्या विचाराने मी कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. काही वर्ष मी आणि परी एकमेकांना पुरेसा वेळ देत होतो, दिवसभर घडणाऱ्या गोष्टी एकमेकांना सांगत होतो.

मागच्याच महिन्यात तिला १८ वर्ष पूर्ण झाली. माझी मुलगी वयात आली होती. पण बापासाठी ती नेहमीच माझी एक लहानगी परी होती. आता तिच्या आवडीनिवडी बदलल्या होत्या. वागण्यात एक वेगळा बदल जाणवत होता. काही खरेदी करायचे असेल तर बाबा तुम्ही सोबत चला म्हणणारी परी आता आपल्या मैत्रिणी सोबत शॉपिंग करू लागली होती.

मुलगी वयात आल्यावर काही गोष्टी असतात अशा ज्या मुलगी वडिलांसोबत शेअर करू शकत नाही. त्यासाठी तिला आईची गरज भासते. परी सुद्धा ह्याच वयोगटातून जात होती. मला ती दाखवून देत नव्हती पण मला सर्व कळतं होतं. पण काही दिवसापासून तिच्या वागण्या बोलण्यात मला फरक जाणवत होता.

नराधम

स्वतच्या रूम मधून बाहेर पडत नव्हती, घरात कुणी पाहुणा आला तर समोर येत नव्हती, मित्र मैत्रिणी घरी येणे बंद झाले होते. मी तिच्या रूममध्ये जाऊन नक्की काय झालंय बाळा विचारले पण आयुष्यात पहिल्यांदा ती माझ्या अंगावर रागावून बोलली. माझी प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळलीच पाहिजे का? एवढं म्हणून ती बाहेर निघून गेली.

ऑफिसमध्ये पोहोचल्यावर सुद्धा माझ्या मनात त्याच गोष्टी फिरत होत्या. मी तिला संस्कार देण्यात कुठे कमी पडलोय का? की तिच्या अंतरमनात काही अशा गोष्टी चालल्या आहेत ज्या मी समजू शकत नाही. आज संध्याकाळी घरी जाताना मी तिच्या आवडीची पाव भाजी घेतली. बाप लेक मस्त सोबत बसून खाऊ ह्या उत्साहात मी घरी पोहोचलो.

दरवाजा उघडाच होता. मी परीला आवाज दिला पण तिने आवाज दिला नाही. बाहेर कुठे गेली असेल असा अंदाज बांधत मी फ्रेश झालो. मुलगी येईल आणि मी तिच्याशी मनोसोक्त बोलेल ह्या भावनेने मी तिच्या रूममध्ये शिरलो आणि समोरचे दृश्य पाहून सुन्न झालो. माझ्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली होती.

काय झालं कसं झालं? एवढं मोठ पाऊल तिने उचलले तरी कसे? ह्या लाचार बापाचा विचार तरी नाही आला का? मी थरथरत्या हाताने तिला खाली काढले. तिचे ते डोळे माझ्याकडे रोखून पाहत होते. बाबा माफ करा मला असे काही म्हणण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या टेबलवर एक चिठ्ठी होतं. त्यात असे लिहिले होते.

बाबा तुमच्या परीला माफ करा, हे सर्व आता मी नाही सहन करू शकत. बऱ्याचदा तुमच्याशी बोलेल, मनातल्या भावना व्यक्त करेल असे वाटले होते. पण कधी हिम्मतच झाली नाही. कशी होणार हिम्मत? ही गोष्ट तुम्हाला सांगितली असती तर तुम्ही माझे बाबा आहात ह्याचा सुद्धा तुम्हाला तिरस्कार वाटला असता. पण आता माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय उपलब्ध नाही आहे म्हणून मी हे जग सोडून निघून जातेय.

मी दीड महिन्याची गरोदर आहे. माझ्या सुनील सरांनी शिकवणीच्या बहाण्याने मला घरी बोलावले आणि घरात कुणीच नाही ह्या संधीचा लाभ घेऊन माझ्यावर अत्याचार केला. त्याच दिवशी वाटत होतं की तुम्हाला सांगावे सर्व पण कोणत्या तोंडाने हे सांगणार होते? त्यानंतर त्यांचे चाळे माझ्यासोबत चालूच राहिले. नजरेने बलात्कार करणारी त्यांची ती वर्गातली नजर मला नेहमीच मानसिक त्रास देत होती. वर्गाच्या बाहेर जाताना होणारा त्यांचा स्पर्श, घरी आल्यावर सरांचे येणारे मेसेज कॉल मला आतून खूप त्रास देत होते.

आता हे मला खूप नकोसे वाटतं आहे. माझ्या ह्या जाण्याला सर्वस्वी तोच नराधम जबाबदार आहे. बाबा त्याला सोडू नका, त्याला त्याच्या कर्माची शिक्षा झालीच पाहिजे आणि जेव्हा पासून मला कळालं आहे की मी गरोदर आहे मी आता हे नाही सहन करू शकत. खरंच माफ करा मला बाबा आणि तुमची काळजी घ्या. तुमची परी.

समाप्त

ह्या पण कथा वाचा डोळ्यात पाणी येईल

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल