Home कथा दुसऱ्याच्या नावाची मेहंदी

दुसऱ्याच्या नावाची मेहंदी

by Patiljee
2332 views
मेहंदी

तुला सांगितले होते इथे येऊ नकोस तरी सुद्धा का आला आहेस? तुला पाहिलं कुणी इथे तर मारून टाकतील रे (संजनाने रडत्या आवाजात खिडकीतून घरात दाखल झालेल्या यशला म्हटले) आणि तुलाही मी सांगितले होते की लग्न करेल तर फक्त तुझ्याशीच मग का आज दुसऱ्याशी लग्न करतेस? माझ्या नावाची मेहंदी हातात काढणार होतीस मग आज ही मेहंदी दुसऱ्या कुणा व्यक्तीच्या नावाची का आहे?

दोघेही भूतकाळात रमले. संजना आणि यश एकाच गावातले. दोघांनीही आपले शालेय शिक्षण आणि कॉलेज सोबत एकत्रच पूर्ण झाले. नऊ वर्ष ते एकमेकांना ओळखत होते. एवढ्या वर्षाची त्यांची मैत्री आणि नंतर बहरत गेलेले त्यांचे प्रेम दोघांनीही एका वेगळ्या दुनियेत घेऊन गेलं होतं. आपण लग्न करणार, दोघेही जॉब करणार, सुंदरसे घर असणार आणि गुण्या गोविंदाने राहणार असे सर्व त्यांनी आधीच ठरवून ठेवल्या होत्या.

पण ह्या दोघांच्या मध्ये सर्वात मोठी अडचण होती संजनाचे बाबा. तिचे बाबा गाव कमिटीचे अध्यक्ष असल्याने त्यांचा एक वेगळा रुबाब पंचक्रोशी मध्ये होता. आपली मुलगी सुद्धा अशाच मोठ्या कुटुंबात लग्न करून जावी अशी त्यांची इच्छा होती. जशी प्रत्येक वडिलांची ईच्छा असते. त्या मानाने यश आणि त्याचे कुटुंबीय मध्यमवर्गीय होते. त्याचे बाबा बस कंडक्टर तर आई प्रायव्हेट क्षेत्रात काम करत होती.

ह्या दोघांचे प्रेम प्रकरण जेव्हा संजनाच्या बाबाच्या कानी पडले तेव्हा त्यांनी संजनाला काहीच न म्हणता यशला गाठले. त्याची बाजू ऐकून ही न घेता त्याला बेदम मारहाण केली. घरी आल्यानंतर संजणाला सुद्धा बंद खोलीत डांबून ठेवलं. तिला सक्त ताकीद दिली की आता परत कधी त्याला तू भेटलीस तर आज तर कमी मारले आहे आम्ही त्याला, पुढच्या वेळेस त्याचा जीवच घेऊ. हे ऐकताच स्वतः चा विचार न करता संजणाने यशचा विचार केला.

त्याचा नंबर ब्लॉक लिस्टला टाकून दिला. घरात लग्नाची बोलणी सुरू झाली. मुलगा गडगंज श्रीमंत असलेला व्यक्ती होता. पण तिच्या होकाराची किंवा नकाराची कुणाला घरात गरजच भासली नाही. घरात सर्व खूप आनंदात होते फक्त संजना सोडली तर कारण तिला माहित होत ह्या व्यक्ती बरोबर जरी मी लग्न केले तरी आनंदाने राहणार नाही. पण तिची मर्जी कुठे चालणार होती.

बाहेरच्या येणाऱ्या वाऱ्याने खिडकी उघडली. दोघेही भूतकाळातून बाहेर आले. यशला तिच्या बाबा आणि सहकाऱ्यांनी खूप मारलं होतं. पाच दिवस तो बेशुद्ध होता. जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्याने लगेच संजणाचे घर गाठले आणि आज तिचे लग्न होते. यश तू खरंच जा इथून, बाबांनी पाहिले तर ते शांत नाही बसणार. असे कसे बोलते संजू, आपण आयुष्यभर सोबत राहणार असे ठरवले होते. आणि हे असे संकट आले तर तू पळ काढतेस?

मला माझ्या जीवाची पर्वा नाहीये रे मला तुझ्या जीवाची काळजी आहे. बाबांनी सक्त ताकीद दिली आहे की जर मी तुला पुन्हा भेटले तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जगणे असह्य करून सोडतील. अग मग आपण पळून जाऊया ना, खूप दूर जिथे फक्त तू आणि मी असेल. नाही यश जर आपण पळून गेलो तर माझे बाबा तुझ्या कुटुंबातील व्यक्तींना खूप जास्त त्रास देतील, आणि आपण जिथेपण पळ काढू तिथे ते आपल्याला शोधून काढतील. माझ्यासाठी नाही राजा पण तुझ्या आणि तुझ्या घरच्यांसाठी हे पाऊल मला उचलायला लागणार आहे. माझी शपथ आहे तू आता इथून निघून जा प्लीज.

संजनाचे मेहंदीचे हात हातात धरून यश रडू लागला. आता पुढे काहीच होणार नाही ह्याची जाणीव दोघांनीही होती. म्हणून दोघांनीही सहमतीने वेगळे मार्ग निवडले. ह्या मार्गावर दोघेही खुश नसतील हे माहीत असताना सुद्धा त्यांनी हा खूप मोठा निर्णय घेतला होता.

यश आणि संजना सारखे अनेक तरुण तरुणी आपले मन मारून घरच्यांच्या आग्रहाखातर लग्न करतात. पण ह्या अशा लग्नात दोघे तर खुश राहत नाही पण ह्या दोघांच्या आयुष्यात आलेले जोडीदार सुद्धा खुश राहत नाही. नाहक त्या दोघांना सुद्धा ह्याचा त्रास होतो. आमचे म्हणणे असे नाही की आई वडील आपल्या मुलांचा वाईट विचार करतात, आपल्या मुलांचे चांगलेच व्हावे ते सुखात रहावे हाच त्यांचा हेतू असतो.

पण आपला मुलगा किंवा मुलगी कुणावर मनापासून प्रेम करत असेल तर त्या व्यक्तीला समजून घ्या. स्वतः ला घडवण्याची त्यांना एक संधी नक्कीच द्या. जर त्या संधीचे नाही सोनं नाही केलं तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. पुढे जाऊन तुमच्या मुला मुलींना असे वाटायला नको की आमच्या आईबाबांनी आमच्या प्रेमाला समजूनच घेतलं नाही.

निवडक ह्या काही कथा सुद्धा वाचा

समाप्त

फीचर इमेज क्रेडिट : अंकिता राऊत & गिरीश म्हात्रे

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल