कथेच्या पहिल्या भागात तुम्ही वाचलेत की गरिबीपाई घरातले आपलं लग्न वयाच्या तिप्पट माणसासोबत करत आहेत म्हणून पौर्णिमाने घर सोडून पनवेल शहर गाठले. इथे रेल्वे स्टेशनवर तिला तिच्याच वयाचा मुलगा भेटला आणि एवढ्या रात्री तुम्ही एकट्या कुठे राहाल म्हणून तिला पत्ता देऊन एका घरी राहण्यासाठी पाठवले. नंतर पौर्णिमा ला कळलं की हे घर त्याच मुलाचे आहे. आता पाहूया पुढे काय घडतंय.
कथेचा पाहिला भाग इथे क्लिक करून वाचा
मला तसेही सकाळी लवकर उठण्याची सवय नव्हती पण बाजूलाच होणाऱ्या मंदिरातील आरती मुळे मला जाग आली. उठले तर खूप प्रसन्न वाटतं होतं. घरात स्वामी नामाचा जप चालू होता. मी रुमच्या बाहेर येताच त्या काकू म्हणल्या “उठली ग माझी बाय, चा पिशिल की नाश्ता करशील?” त्यांची भाषा मला थोडी वेगळी वाटली. त्यांना मी ह्याबद्दल विचारले सुद्धा तर त्या म्हणल्या आमच्या आगरी समाजात तुला अशीच भाषा ऐकायला मिळेल.
खरंच मला ते घर एवढं आवडलं होतं की असे वाटतं होतं, इथेच रहावे अगदी कायमचे. त्यात त्यांनी मला कोरा चहा आणि घावन आणून दिलं, आयुष्यात पहिल्यांदा घावन खात होते. ती चव एवढी सुंदर होती की सारखे गरम गरम घावन खावेसे वाटत होते. एवढ्यात बाहेरून बाईकचा आवाज कानी पडला. समोर पाहतेय तर तोच मुलगा जो रात्री मला स्टेशनवर भेटला होता तो आता समोर उभा होता.
आधी वाटले सॉरी म्हणुन टाकावं त्याला पण ते महाशय तर लगबगीने त्यांच्या रूम मध्ये शिरले. मला तर त्याच नाव सुद्धा अजून माहीत नव्हतं. मी सुद्धा त्याच्या मागे त्याच्या रूममध्ये गेले. हॅलो मिस्टर अनोळखी, तुम्ही तर ग्रेट निघालात. कशाची ही पूर्व कल्पना न देता स्वतःच्या घरी मला पाठवले. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तो फक्त गालाताच हसला आणि पुन्हा आपल्या बॅगमध्ये काही शोधू लागला.
मी अंदाज बांधला की नक्कीच हा मुलीनं पासून चार हात लांब असेल म्हणून माझ्याशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही आहे. मी सुद्धा जास्त विचार न करता बाहेर येऊन काकूंना स्वयंपाक घरात मदत करू लागले. काकू नको नको म्हणत होत्या पण मला खरंच त्या स्वयंपाक घरात अजून वेळ घालवायचा होता. अतिशय सुंदर आणि आकर्षक होती तिथली सर्व मांडणी. मला खूप जास्त भावली होती.
न राहून मी काकूंना विचारलं “काकी तुमचा मुलगा मुलींशी जास्त बोलत नाही की कुणाशीच जास्त बोलत नाही? मी काळपासून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतेय, पण तो काहीएक बोलत नाहीये” त्या म्हणाल्या “अग बाये काय सांगू तुला आता, त्याचा एका पोरीवर जाम जीव व्हता, पण ती गेली ह्याला सोरून, तवा पासून हे असेच चाललेय, ना कोंच्याशी बोलतेय ना कुठं जातेय, काम आणि घरा बस, आवराच त्याचा आयुष्य चालू आहे”.
एवढं सर्व बोलताना मला त्यांच्या डोळ्यात अश्रू जाणवले पण त्यांनी अलगद ते आपल्या पदराने पुसून मला त्याची जाणीव सुद्धा करून दिली नाही. वाईट तर खूप वाटले पण मी सुद्धा स्वतःला सावरले. थोड्या वेळाने तो खिकडी मध्ये बसून चहा घेत बसला होता. एक खुर्ची त्याच्याकडे सरकवत मी त्याच्या बाजूला जाऊन बसले. आणि म्हणाले
“मला माहित आहे तुला मुलींशी बोलायला जास्त आवडतं नाही, पण तरीही एक गोष्ट तुला नक्कीच सांगावीशी वाटतेय म्हणून सांगतेय”.
माझे ही एका मुलावर खूप मनापासून प्रेम होतं, दोन वर्ष आम्ही एकमेकांच्या प्रेमात एवढं तुडुंब बुडालो होतो की आम्हालाही जगाचा विसर पडला होता. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला तो मला भेटला आणि पाहिल्या भेटीतच आपलासा वाटला. प्रेम करताना त्याने हे नाही पाहिले की मी कोणत्या जातीची आहे? श्रीमंत आहे का गरीब आहे? त्याने फक्त माझे मन पाहिले आणि माझ्या प्रेमात पडला. पण जेव्हा मी त्याच्यासमोर लग्नाचा विषय काढला तेव्हा मात्र त्याने पाठ फिरवली.
त्याचे म्हणणे होते की आम्ही श्रीमंत आहोत आणि तुम्ही गरीब आणि मागासवर्गीय घरातून, त्यामुळे माझे बाबा ह्या लग्नाला कधीच मान्यता देणार नाही. एका क्षणात तो असे काही बोलून गेला की मला माझाच राग आला. तेव्हा मला काय वाटले माहीत आहे का? मिस्टर अनोळखी माझ्याकडे डोळ्याची पापणीही न हलवता पाहत होते आणि म्हणाले काय वाटले तुला? मला वाटले बस संपलं आयुष्य, आता काहीच नाही राहिले. ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं तिचं व्यक्ती आता मला मी गरीब आणि मागासवर्गीय आहे म्हणून सोडून गेली.
पण एक दोन दिवस मी शांत विचार केला. वाटले जर मी जबरदस्ती त्याच्याशी लग्न केले असते तर कधीच आनंदी नसते राहिले. मग आनंदी न राहता अशा संसाराचा आणि माझ्या आयुष्याचा काहीएक उपयोग नव्हता. म्हणून मी स्वमर्जीने त्याचा विषय बाजूला करून स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतले. मला माहीत आहे तू सुद्धा ह्याच परिस्थितीतून जात आहेस. पण आपण कुणावर प्रेम करतो ह्या पेक्षा आपल्यावर कुणी प्रेम करतेय अशी व्यक्ती शोधावी, आयुष्य खूप सुंदर होऊन जातं.
माझ्या बोलण्याचा त्याच्यावर काहीएक परिणाम तर मला दिसत नव्हता. तो त्याच्यात विचारात मग्न होता. पुढील पाच मिनिटे तो काहीच बोलला नाही म्हणून मी तिथून उठले आणि घरात यायला निघाले. तेवढ्यात त्याचा मागून आवाज आला. हाय अनोळखी मॅडम, माझे नाव महेंद्र पण हा मिस्टर अनोळखी सुद्धा ऐकायला छान वाटते आणि त्याचा हात पुढे केला. त्याच्या रूपाने ह्या अनोळखी शहरात मला एक चांगला मित्र आणि घर दोन्ही मिळालं होतं.
पुढील काही मिनिटे त्याने माझा हात काही सोडला नाही आणि म्हणाला “माझ्याच ऑफिस मध्ये बिलिंग मध्ये एक जॉब आहे, करशील का? म्हणजे आपण सोबत जाऊ येऊ शकतो”. मी ही कोणताही विचार न करता होकारार्थी मान हलवली.
मी लिहिलेल्या अजून काही कथा वाचा
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)