लग्न झाल्यावर आई होणे हे स्त्रीचे दुसरे जन्म आहे असे आजवर ऐकत आले होते. पण माझ्या नशिबात माझा जन्म तीन वेळा झाला. तुम्हीही विचारात पडाल की ही काय नक्की भानगड आहे? पण माझ्या आयुष्यात जे काही घडले आहे ते वाचल्यावर तुम्हालाही वाईट वाटेल.
मी म्हणजे मंदा, पाटलांच्या घरातली एकुलती एक सुनबाई. माझे लग्न प्रतापराव पाटलांसोबत झालं अरेंज मॅरेजच होतं. पण लग्न एवढं दिमाखदार होतं की पंचक्रोशीत ह्या लग्नाची चर्चा झाली होती. नवरोबा हेलिकॉप्टर मध्ये बसून मंडपात आले होते.
नव्या आयुष्याची सुरुवात मी मोठ्या उत्साहात सुरू केली होती. सर्व कसे अगदी माझ्या मनासारखे झाले होते. चांगले सासर मिळालं, जीव लावणारी सासू सासरे, भावाप्रमाणे वागणारा माझा लहान दीर आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा नवरा. सर्व आनंदाचे चालू असताना आमच्या आयुष्यात अजून एका लहानग्या पाहुण्याच्या आगमनाच्या बातमीने पाटलांचा वाडा पुन्हा एकदा आनंदाने दुमदुमला.

१९ वर्षानंतर पुन्हा एकदा ह्या वाड्यात लहान बाळाचा आवाज घुमणार होता. सर्व काही अगदी छान चालू होत. पण नियतीच्या मनात काही वेगळेच असावे. मी सात महिन्याची गरोदर असताना अचानक माझ्या पोटात दुखु लागले. लगबगीने मला रुग्णालयात दाखल केले. मला रक्त दाबाचा त्रास होता म्हणून बाळाला श्वास मिळत नव्हता.
कोलमडलेला संसार
हे ऐकुन सर्वांना चिंता वाटू लागली आणि शेवटी होत्याच नव्हतं झालं. त्या लहानग्या चिमुरड्यांने ह्या जगात पाऊल ठेवताच जगाचा निरोप घेतला. ते निर्जीव बाळ हातात घेऊन मी कितीतरी वेळ रडत होते. का केलं देवाने असे? ह्यात ह्या बाळाचा काय दोष जो ह्या जगात आपले नीट डोळेही उघडू शकला नाही.
हे सर्व पाहून मी असह्य झाले होते. खाणे पिणे सोडून दिले होते. कशात मनच लागत नव्हता. डिप्रेशन मध्ये जाण्याच्या टोकावर मी उभी होते. पण ह्या सर्वात माझ्या घरच्या मंडळींची मला खूप साथ लाभली. त्यांनी मला खूप सांभाळून घेतले. जसं काही झालेच नाही असे त्यांनी दाखवून घर कसे आनंदी आहे हे माझ्यासमोर नेहमीच सादर केले.
पुन्हा काही वर्षांनी घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मी पुन्हा एकदा गरोदर होती. आता मात्र माझ्या घरातल्यांनी माझी खूप काळजी घेतली. मला दिवस गेल्यापासून कोणतेच काम करूच दिले नाही. सर्व माझी सासू करायची. सर्व कसे सुरळीत चालू होतं. पण मनात भीती तर होतीच. आणि म्हणतात ना जी आपल्या मनात भीती चालू असते नेहमी तेच घडते.
पुन्हा एकदा आठवा महिना चालू असताना माझ्या पोटात कळा येऊ लागल्या. मला रुग्णालयात दाखल केले. सर्वांना भूतकाळ आठवत होता म्हणून घरातले सर्वच खूप काळजीत होते. ऑपरेशन थेटर बाहेर सर्व उभे होते, आता कोणते संकट नको येऊदे देवा अशी प्राथर्ना करत होते. सासूबाई हातातली माळ पुढे मागे करत होत्या. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले
बाळाला श्वास पोहोचत नाहीये आपल्याला काही करून लवकरात लवकर सिझरिंग करावी लागेल. अन्यथा बाळ आणि आईच्या जीवाला धोका आहे.
माझे कुटुंबीय सिझर करावी लागणार हे ऐकुनच घाबरून गेले. कारण अजून पुरेसे ९ महिने सुद्धा झाले नव्हते. पण तरीही त्यांनी डॉक्टरांना सिझर करण्याची सहमती दिली. जोपर्यत बाळाचा आवाज कानी पडत नाही तोपर्यंत सर्व ठीक नाही होणार असे सर्वांना वाटतं होते.
दोन तास झाले, कधी डॉक्टर तर कधी नर्स आत बाहेर करत होते. पण अजून काहीच कुणी व्यवस्थित सांगत नव्हते. घड्याळाची सुई ९ वर येऊन थांबली आणि आतून जोरात लहान बाळाचे रडणं कानी पडलं. सर्व कुटुंबीय एकमेकांकडे पाहून थोडेफार चिंतेत असलेले चेहरे हसत होते. काही वेळातच एक नर्स बाहेर आली आणि तिने सर्वांना आनंदाची बातमी दिली.
पाटलांच्या वाड्यात लक्ष्मी आली होती. सर्व खूप जास्त खुश होते. ह्या आनंदाच्या सुखात प्रताप राव खूप खुश तर होते पण ते आधी येऊन मला बिलगले आज एवढ्या वर्षांनी मी त्यांना रडताना पाहत होती.
काहीच दिवसात मला डिस्चार्ज देण्यात आला. मोठ्या थाटामाटात नवीन पाहुनीला आम्ही घरात आणले होते. पण डॉक्टरांनी सांगितले होते की हीची तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. पण आज तिला तीन वर्ष झाली आहेत आणि तिची काळजी सोडा आता आम्हाला आमची काळजी करावी लागते. कधी येऊन डोक्यात काय मारून जाईल हे तिला सुद्धा माहित नसते. पण लहान मुलांचा हा खोडकर स्वभावच आई बाबांना जास्त आवडतो. कारण ते आतून खूप सुखी असतात.
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? ह्या गाण्यात व्यक्त केलेल्या भावना खरंच कशा असतात हे मी जवळून अनुभवले आहे.
ह्या कथा पण वाचा
- का आपला समाज नवरा नसलेल्या स्त्री बाबतीत नेहमी असा विचार करतो? वाचा अशीच सुन्न करणारी कथा
- लॉक डाऊन आणि तिच्या आठवणी
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)