काही दिवसांपूर्वी म्हणजेच, वादळ येऊन गेलं त्याच्या दुसऱ्या दिवशीची ही गोष्ट. संध्याकाळी बँक बंद होण्याची वेळ होती. मी माझा संगणक बंद करून निघण्याच्या तयारीत होतो. बँकेतल्या सगळ्या लाईट आणि एसी बंद करत करत सेक्युरिटी गार्ड माझ्या केबिन जवळ येऊन उभे राहिले आणि म्हणाले.._
“सर, वादळामुळे रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या आंब्याच्या झाडावरचे आंबे खाली रस्त्यावर पडले आहेत, गाडी जरा सावकाश चालवा.”
मला त्यांच्या ह्या वाक्याचा अर्थच कळला नाही. आंबे पडले तर मी का गाडी हळू चालवू? माझ्यामुळे आंब्याचं नुकसान होईल असं ह्यांना म्हणायचं असेल का? पण खाली पडल्यामुळे ते आधीच खराब झालेले असतात. काही फुटलेले तर काहींमध्ये अळ्या पडलेल्या असतात. मग ह्यांना नक्की काय सांगायचं असेल? चारचाकी चालवताना योग्य काळजी घेऊन गाडी हळू चालवली किंवा जलद चालवली तर काय फरक पडणार आहे? मला काही त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही, म्हणून मी त्यांना ह्याचे कारण विचारले. जेव्हा ते पोटतिडकीने मला सांगायला लागले तेव्हा मला त्यांच्या बोलण्याचा खरा अर्थ लक्षात आला. जो अर्थ मला कायम लक्षात ठेवायला पाहिजे.
“सर, जेव्हा तुम्ही फोर व्हीलर चालवता तेव्हा आंब्यांवरून तुमची गाडी एकदम जलद गतीने निघून जाते. तेव्हा चाकाखाली आलेल्या आंब्याचा बाठा सालीपासून वेगळा होऊन, बाजूच्या सायकलस्वार, दुचाकी स्वार किंवा पादचारी ह्यांच्या सपाटून लागतो. तो जर चुकून डोळ्यावर लागला तर कायमचा डोळा जाण्याची शक्यता असते. सकाळीच हे माझ्यासोबत घडलं. आंब्याचा बाठा जोरदार माझ्या गालावर लागला आणि जेमतेम माझा डोळा वाचला. त्यांनी तोंडावर लावलेला मास्क काढून मला सुजलेला गाल दाखवला._
ही गोष्ट जरी लहान असली तरी ह्यामुळे प्रसंग मोठा उद्भवू शकतो हे माझ्या लक्षात आलं. बरं, ह्यामध्ये जाणून बुजून कोणीच काही केलेलं नाही, कोणाला मार लागावा असा कोणाचाही उद्देश नव्हता._
खूप वेळा असं बघायला मिळत की, रस्त्यावर पाणी साचलेले असते, त्यातून एखादी भरधाव गाडी निघून जाते व बाजूने चालणाऱ्या लोकांच्या अंगावर घाणेरडे पाणी उडून कपडे खराब होतात. गाडी चालकाला ह्यातून काय आनंद मिळतो त्याचं त्यालाच ठाऊक. पण असे अनेक प्रसंग ग्रामीण भागात नेहमी पाहायला मिळतात._
म्हणूनच, पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत. चारचाकी चालवणाऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली तर अश्या प्रकारचे प्रसंग आपल्यामुळे कोणावर येणार नाहीत. आपण गाडीच्या काचा बंद करून, आतमध्ये एसी आणि गाणी लावून गाडी चालवत असतो. रस्त्यात कुठे पाणी साचलेले दिसले तर वेग थोडा कमी केला तर चालणारा माणूस नक्कीच आभार मानेल नाहीतर आपल्या गाडीकडे बघून शिव्याच मिळतील._
आधीच्या रस्त्यांना दोन्ही बाजूंना उतार असायचा म्हणून त्यावर पाणी न साचता ते बाजूला निघून जायचे. परंतु आताचे रस्ते सपाट असल्याने पाणी साचून राहते. गाडी चालवताना योग्य ती खबरदारी घेतली की पुढील अनर्थ टळण्यास मदत होते._
ही खबरदारी फक्त चारचाकी साठी नसून दुचाकी स्वारांसाठी सुद्धा आहे. गाड्या चालवताना आपली काळजी आपणचं घेतलेली बरी. आपल्या छोट्याश्या चुकीमुळे रस्त्यावर भांडत बसण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली नेहमीच उत्तम.._
काही ठिकाणी रस्त्यात एवढे खड्डे पडले असतात की कुठे रस्ताच शिल्लक राहिलेला दिसत नाही, त्यांना नाईलाजाने गाडी हळू चालवावीच लागते. त्यामुळे असे प्रसंग येत नाहीत. परंतु तिथे सुद्धा खड्डे वाचवण्याच्या नादात मागेपुढे न बघितल्याने बरेच अपघात होत असतात. खरं तर अशा अवस्थेसाठी त्या त्या लोकप्रतिनिधींचे आभारचं मानायला पाहिजेत._
पावसाळ्यात रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे अनर्थ घडू नयेत, त्यासाठी एक खबरदारी म्हणून हा छोटासा लेख प्रपंच.. आवडल्यास नक्की शेअर करा.._
लेखक श्री. अतिष म्हात्रे
आगरसुरे- अलिबाग
मोबाईल- ९७६९२०९९१९
(फक्त व्हाट्सएप साठी)
समाप्त
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधिन आहेत. लेखकाच्या नावासहित ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया द्यायला विसरू नये.