घरात एवढं काम असताना देखील ह्याने ऑफिसमधील मित्रांना घरी जेवायला बोलावले, काही गरज होती का? हो असेल काहीतरी नक्कीच, घरात मोलकरीण ठेवली आहे ना, करेल ती कामे सर्व अशी बडबड करत जया स्वतःशीच बोलत होती. नवऱ्यावर कधी न निघणारा राग नेहमी अशीच ती एकटेपणात व्यक्त करत असे.
बाहेर महेंद्र कुणाशी तरी फोनवर बोलत हसत होता. त्याचे ते खिदी खीदी हसणे ऐकुन माझा पारा अजून जास्तच चढला होता. ऑफिस कलीग आले, मस्त जेऊन गेले. वहिनी काय छान चव आहे तुमच्या हाताला, वहिनी ह्या चिकन करीची रेसिपी पाठवा हा घरी जाऊन बायकोला सांगेन करायला, वहिनी तुम्ही स्वतःचे हॉटेल सुरू करा मग महेंद्रला जॉब करायची गरजच नाही. अशा वेगवेगळ्या कमेंट जेवण्याच्या टेबलवरून येत होत्या.
नवरा कधी चांगले बोलत नाही, त्याचे मित्र तरी कौतुक करतायेत ऐकुन छान वाटलं. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. दुसऱ्या सेकंदालाच महेंद्र म्हणाला शेवटी बायको कुणाची आहे म्हणजे ह्यात पण त्याने माझे श्रेय घेतले होते. लग्नाला चार वर्ष झाली होती. दोन वर्ष छान गेली नंतर मात्र महेंद्र ने स्वतःला कामात अडकवून घेतले.
तो एवढा बिझी झाला की माझ्यासाठी त्याला वेळच नव्हता. फक्त आणि फक्त पैसा आणि ऑफिसमधील प्रमोशन मागे तो पळत होता. एवढ्यात फोनची रिंग वाजली, मोबाईल पाहिला तर रोहनचा फोन होता. मी लगबगीने फोन उचलला. काय मेडम हा दुसरा फोन आहे माझा, कुठे बिझी होता, पाहुणे तर केव्हाचे गेले असतील ना?
अरे हा रॉन पाहुणे तर आताच थोड्या वेळापूर्वी गेले आणि महेंद्र त्यांना सोडायला बाहेर गेलाय. घरात सर्व पसारा पडला होता आणि तेच आवरत बसली होती. हा ते कळलेच आम्हाला पण जेवायचा विचार आहे का नाही? माहीत आहे मला तु त्यांची योग्य सोय करण्याच्या नादात जेवली सुद्धा नसशील. ठेव ती कामे बाजूला आणि गप्प जाऊन आधी जेऊन घे.
का आपला समाज नवरा नसलेल्या स्त्री बाबतीत नेहमी असा विचार करतो? वाचा अशीच सुन्न करणारी कथा
जया स्वतः सोबतच पुटपुटली किती ओळखतो मला हा रोहन, मी काहीच सांगितले नाही आणि तरीसुद्धा त्याला कळलं. किती मनकवडा आहे हा असा विचार करत मी फोन ठेऊन दिला आणि परत कामात स्वतःला गुंतवून घेतलं. खरतर महेंद्र आणि माझ्या संसारात महेंद्र कुठे हरवून गेला होता. आमचा कोलमडलेला संसार त्याची साक्ष होती.

रोहन माझा मित्र जेमतेम आठ महिन्यांची आमची मैत्री, इथेच नाक्यावर त्याचा फोटो स्टुडिओ आहे. असेच एकदा फोटो काढण्यासाठी गेले आणि त्याच्या त्या बोलक्या स्वभावामुळे कधी त्याची आणि माझी मैत्री झाले मला कळलं सुद्धा नाही.
खूप बोलका, नेहमी मला हसवणारा, माझ्या मनात काय चाललं आहे हे लगेच ओळखणारा असा होता माझा रोहन, आता तो माझा मित्र नव्हता तर मैत्री पलीकडे मला त्याबद्दल काही वाटत होतं. कदाचित महेंद्रचे माझ्या पासून लांब जाणे आणि रोहनचे आयुष्यात येणे हा नियतीचा खेळ असावा.
महेंद्र ऑफिसला गेला मी कधीतरी रोहन येऊन माझ्यासोबत खूप वेळ स्पेंड करू लागला होता. त्याचे माझ्या जवळ असणे नेहमीच मला स्वर्गाहून सुंदर वाटत असायचे. आज माझा वाढदिवस होता खरतर आजच्या दिवशी महेंद्रने मला वेळ द्यायला हवा होता. पण तो त्याच दिवशी शहराच्या बाहेर गेला होता. ऑफिसची एक महत्त्वाची मीटिंग होती म्हणे.
तेव्हा माझा पारा जरा जास्तच चढला. खूप भांडण केले मी त्यादिवशी त्याच्याशी पण तरीही तो निघून गेला. तो दिवस माझा असून सुद्धा मी खुश नव्हते पण रोहनने त्या दिवशी माझा मुड पूर्णतः बदलून टाकला. तो मला हॉटेलमध्ये घेऊन गेला, छान गिफ्ट दिलं अगदी एका जोडीदाराला काय हवं नको ते त्याला लगेच कळतं आणि कोणतीच गोष्ट त्याला सांगायला लागत नाही.
आज मी खूप खूष होते. हॉटेल मधून निघताना रोहनला घट्ट मिठी मारली. तो काय म्हणेल ह्या अगोदरच मी त्याच्या ओठांवर माझ्या हाताची बोटं ठेवली आणि त्याला गप्प केलं. मला तो क्षण फक्त शांतपणे अनुभवायचा होता. लोक म्हणतात लग्नानंतर असे कुणा पुरुषाबद्दल काही वाटणे म्हणजे पाप असते पण जर नवराच घरात प्रेम देत नाही समजून घेत नाही तर मी काय करणे अपेक्षित होते.
खरतर रोहन आता मला महेंद्रपेक्षा जास्त आवडू लागला होता. मी घरात कमी आणि रोहनकडे जास्त लक्ष देऊ लागले. मोबाईलची थोडी तरी रिंग वाजली किंवा नोटिफिकेशनचा आवाज आला तरी मला असेच वाटायचे की समोर रोहन असेल. होत ना असे नेहमीच जेव्हा तुम्ही प्रेमात असता.
दुसऱ्या दिवशी मी डी मार्टमध्ये गेले होते. तिथे माझी जुनी मैत्रीण आणि महेंद्रची कलिग सुलोचना भेटली. काय ग जया कशी आहेस? किती महिन्यांनी दिसतेस? चल ये आपण हॉटेलमध्ये बसू, खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी. आणि काय ग महेंद्र सारखा प्रेमळ नवरा मिळाला आणि आमच्या सारख्या मैत्रिणीला विसरलीस?
अग नाही ग वेडाबाई असे काही, घरातल्या गोष्टीतून वेळच मिळत नाही. माझे सोड तू कधी लग्न करतेस मग? अग कसे लग्न करणार एवढा सुंदर मुलगा तर तू आमच्या पासून चोरून नेलास नाहीतर महेंद्र सोबतच लग्न केले असते. ऑफिसमध्ये आल्यापासून त्याचे नुसते एकच चालू असते जया जया आणि फक्त जया. जया हे करते जया ते करते, घरातले एवढे करून पण कधी बोलून दाखवत नाही.
जयासाठी चांगले मोठं घर घ्यायचे आहे. तिला छान सुखात ठेवायचं आहे, म्हणून तर एवढा काम करून प्रमोशनच्या मागे लागलोय. जेणेकरून मोठं घर घेता येईल. जगातील सर्वात सुंदर स्वयंपाक माझी बायको करते तिच्या हाताची चव कुणालाच येणार नाही असे नेहमीच तुझ्याबद्दल ऑफिसमध्ये बोलत असतो. त्याचे हे सर्व बोलणे ऐकुन आम्हाला तुझाच राग येतो एवढी कशी लकी ग तू? की एवढं तुझ्याबद्दल भरभरून बोलणारा नवरा तुला मिळाला.
एवढेच काय तर तो असेही म्हणाला की तुला थायरॉईड आहे म्हणून प्रेग्नेंसीची रिस्क तो घेत नाही. कारण तुला त्याचा त्रास होईल. खरंच यार किती गोड आहे तो, किती काळजी करतो तुझी. खूप लकी आहेस तू जया. सुलोचना भरधाव चाललेल्या ट्रेन सारखे एक एक डब्बे सोडत होती आणि माझे डोळे फक्त ते सर्व पाहात होते. किती चुकीचे समजत होतो मी त्याला? का वागली मी त्यासोबत अशी? सर्वच बाबतीत मी स्वतःला दोष देत होतो.
कधी माझी पावले घराकडे वळली मलाही कळले नाही. एव्हाना रोहनचे अनेक कॉल मेसेज मोबाईलवर येऊन गेले होते. पण आज खूप महिन्यांनी मी महेंद्रचा विचार करत होते. घरी पोहोचताच एक कुरीयर बॉय घराच्या समोर उभा होता. मॅडम तुमची एक वस्तू पार्सल आली आहे. खरतर सॉरी कालच डिलिव्हरी होणार होती पण लॉक डाऊन मुळे ते शक्य झाले नाही.
मी तो पार्सल घेऊन घरात आले. काय असेल ह्यात? रोहनने काही पाठवले नसेल ना? म्हणून बॉक्स उघडून पाहिला आणि चकित झाले. महेंद्रने हे गिफ्ट मला माझ्या वाढदिवसाला पाठवले होते. डायमंड रिंग होती. ही तीच रिंग होती जिच्यासाठी मी मागच्या वर्षी महेंद्र कडे हट्ट केला होता. पण खूप महाग असल्याने तो मला हे देऊ शकला नव्हता. सोबत एक पत्र होते त्यात असे लिहिले होते.
जया माझी जया.. खरतर मी खूप नशीबवान आहे की माझ्या आयुष्यात तू आहेस. तू आपला संसार असा काही स्वतच्या खांद्यावर पेळलास की मला त्यात डोकावण्याची कधी गरजच भासली नाही. म्हणूनच मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकलो. मागील दोन वर्षात माझी जी काही प्रगती झाली आहे त्यात तुझा सिंहाचा वाटा आहे.ह्या ऑनलाईन जगात खरतर पत्र लिहतोय म्हणून मलाच हसू येतेय पण काय करणार आमच्या मॅडम रुसल्यात आहेत ना म्हणून हे असे बोलावे लागत आहे.
आणि हो ही रिंग आठवतेय ना? तुला खूप आवडली होती पण मी घेऊ शकलो नव्हतो. खरतर खूप म्हणजे खूप वाईट वाटलं होत मला त्या दिवशी. तुझ्यासाठी एवढेही करू शकत नव्हतो मी. पण गेली वर्षभर मी ह्या रिंगसाठी पैसे साठवत आलोय. आणि हे गिफ्ट तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी देणे ह्याहून सोन्याहून सुंदर काय असावे? खरतर मला सॉरी सुद्धा म्हणायचं आहे तुला? खूप कमी वेळ देतोय ना मी हल्ली तुला? पण जयू फक्त काही महिने एकदा का हे प्रमोशन मिळाले आणि माझ्या कडून तुझ्यासाठी असलेले ते स्पेशल Surprised तुला दिलं की मी फक्त आणि फक्त तुझा. मग माझ्याकडुन तुला कोणतीच तक्रार नसेल. तुझा वेडा माही.

मी पत्र वाचून झाल्यावर स्तब्ध पडून राहिले डोळ्यातून फक्त आश्रु बाहेर पडत होते.
ह्या पण कथा वाचा
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)