Home कथा कॉलगर्ल

कॉलगर्ल

by Patiljee
174110 views
कॉलगर्ल

सारखं तेच तेच ऐकुन मलाही कंटाळा आला आहे. कितीवेळा सांगू तुला माझे बाहेर कुणाशी अफेयर नाहीये. सारखं संशयाने का पाहत असतेस? नेहमी मोबाईल चेक, दिवसातून अनेक फोन आणि एकदा का फोन बिझी लागला की दिवसभर भांडण सुरू. आजतर हद्द केलीस ऑफिस मध्ये येऊन माझ्या कळीगना विचारत होतीस की मी बाहेर कधी आणि केव्हा केव्हा जातो. बस आज खूप झाले, खूप समजून घेतले तुला पण आता मला माझा वेळ हवा आहे. वाट पाहू नकोस माझी मला योग्य वाटेल तेव्हा मी घरी येईल.

असा मेसेज मी सुहासिनीला केला. खरंतर माझं तिच्यावर जिवापाड प्रेम होतं. आधी मैत्री मग प्रेम आणि आता तीन वर्षाचा आमचा संसार, आम्ही हसत खेळत पार केला होता. पण तिच्या मनात संशयाने अशी काही जागा निर्माण केली की ती माझ्या प्रत्येक वागण्यात संशयाने पाहायची. कुणाशी बोललो तरी संशय घेते. काहीच दिवसांपूर्वी तिने माझ्यावर आरोप लावला होता की तुम्ही बाहेर पैसे देऊन भूक भागवता.

आयुष्यात कधीच कोणत्या मुलीकडे वाईट नजरेने पाहिले नव्हते आणि तरीही असे आरोप माझ्यावर होणे म्हणजे मी आरोपी सिद्ध ठरत होतो. पण आज मी ठरवलं होतं ती म्हणतेच आहे ना बाहेर पैसे देऊन भूक भागवतो मग आज तेच करेल. एका मित्राकडून कॉलगर्लचा नंबर घेतला. हॉटेल मधील रूम बुक करून तिला तिथेच येण्यास सांगितले. दिलेल्या वेळेत ती सुद्धा आली.

तिला समोर पाहताच असे वाटले की एवढी सुंदर ही महिला हे काम का करत असेल? लाल रंगाची साडी, थोडे ओलसर लांबसडक केस आणि तिच्या ओठांवरील डार्क लिपस्टिक तिला इतर स्त्रियांपेक्षा वेगळे भासवत होते.

काय साहेब पहिलीच वेळ आहे वाटतं तुमची? तिच्या ह्या प्रश्नाने मी भांबावून गेलो. नाही नाही असे काही नाही. जात असतो मी. कशाला खोटं बोलता साहेब, ज्याला फक्त शरीर सुख हवं असतं ते अशा अलिशान हॉटेल मध्ये बोलवून पैसे वाया नाही घालवत. त्यांना फक्त भूक भागवायची असते म्हणून ते स्वस्तातल्या हॉटेल मध्ये घेऊन जातात. पण तुम्ही इकडे बोलावले म्हणजे नक्कीच तुमची पहिली वेळ आहे.

तिच्या ह्या उत्तराने मी सुन्न झालो. घरी कोण कोण असतं तुमच्या? मी खाल मानेने तिला प्रश्न केला. काय साहेब कशाला वेळ घालवता, ज्या कामासाठी बोलावले आहे ते करूया आणि मी निघते. कशाला उगाच गाडलेली भुतं उकडताय?

तुम्हाला खरं सांगू मी रागाच्या भरात तुम्हाला बोलावले खरं पण माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. त्यामुळे असे काही मी करू शकत नाही. प्लीज माफ करा मला, तुमचे ठरलेले पैसे मी तुम्हाला देईल, तुम्ही काय घेणार चहा की कॉफी, सांगा तसे मी खाली काउंटरवर फोन करतो. माझ्या ह्या बोलण्याने तिच्या डोळ्यात अलगद तरंगणारा अश्रू मी हेरला.

खरं सांगू साहेब आजवर अनेक ठिकाणी मी गेले असेल, पण चहा कॉफी आणि खुशाली विचारणारे तुम्ही एकटेच. नाहीतर प्रत्येकाला आपल्या कामाची गरज, काम झालं पैसे तोंडावर मारले की निघून जातात. काही तर एवढे विचित्र असतात जोर जबरदस्ती करतात. पण आम्ही सुद्धा तेव्हा काहीच करू शकत नाही. पैसे दिलेले असतात आणि आमचे हे कामच आहे म्हणा. ती तिचे दुःख एक एक करत माझ्या समोर व्यक्त करत होती.

एवढे सर्व आहे तर मग कशाला करता हे काम? सोडून द्या आणि कुठे काम करून स्वतःच आयुष्य नव्याने निर्माण करा. काय साहेब एवढं जमत असतं तर ह्यात अडकलो असतो का? वयाच्या ११ व्या वर्षी दारोड्या बापाने पैस्यासाठी मला शांती काकूला विकून दिलं. नंतर तिथेच अर्ध आयुष्य निघून गेलं. आता तीन वर्षाची मुलगी आहे. तिचा बाप कोण आहे माहित नाही. पण तिला चांगलं शिकवायचे आहे, ह्या दलदलीतून बाहेर काढायचे आहे. म्हणून सध्या काही वर्ष हे काम करावेच लागेल.

तिचे हे बोलणे खरंच मला खूप जास्त लागले होते. समोर नेहमीच आनंदित दिसणाऱ्या ह्या स्त्रिया आतून किती खचलेल्या असतात, ह्याचे प्रत्यय मला आज आले होते. मी तिला माझा कार्ड दिला. कधीही मदत लागली कोणत्याही प्रकारची तर बेधडक कॉल कर, असे सांगून तिथून निघून आलो.

घरी येताच बायकोने दरवाजा उघडला. मी असा अचानक गायब झाल्याने रागावली तर होतीच. मी काहीच न म्हणता तिला घट्ट मिठी मारली. डोळ्यात पाणी आलं होतं. एक क्षण तिला सुद्धा कळलं नाही की नक्की झालेय काय. पण माझी घट्ट मिठी सर्व रागावर रामबाण होतं हे नक्की.

मी लिहलेल्या ह्या कथा पण वाचा

समाप्त

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल