Home कथा अल्झायमर

अल्झायमर

by Patiljee
11414 views
alzheimers

मिनी हा तुझा टिफीन घे ग? आणि शिरीष हा तुझा डब्बा दोघांचे डब्बे बॅग जवळच ठेवले आहेत, सगळं कसं तुम्हाला हातात द्यायला लागतं, मला मागे पुढे काय झाले तर तुमच्या दोघांचं कसं होणार हेच मला कळत नाही? इतक्यात शिरीष कमरेचा बेल्ट बांधतच येतो आणि प्रांजळला मिठीत घेऊन बोलतो, तुला मी काहीच होऊन देणार नाही समजले का? वेडी कुठली चल आटप पटापट उशीर होतोय आपल्याला. अग प्रांजळ पण माझा शर्ट आज इस्त्री नाही केला तू, रोज करतेस ना मग आज कशी विसरलीस ग!

काय खरंच अहो माझ्या कसं लक्षात राहिले नाही काय माहीत पण मी काल सकाळपासून लक्षात ठेवले होते तुमचे कपडे इस्त्री करायचे आहेत पण पुन्हा कशी काय विसरून गेली. जाऊदे चल पटकन इस्त्री फिरव काही तरी आपल्या दोघांना ऑफिकला जायला उशीर होतोय आणि मिनीचा स्कूल ही मिस होईल नाहीतर. मिनी आता दुसऱ्या इयत्तेत शिकत होती आणि तिला सध्या तरी आईची गरज जास्त होती. पण प्रांजळ आता पहिल्यापेक्षा थोडी वेगळी वाटायला लागली होती. तिला कधी कधी कोणत्या गोष्टीची आठवण राहत नसायची, पण होत अस कधी कधी हे शिरीष म्हणायचा आणि पुढे पुढे सरकत गेले.

आज मी मिनीला शाळेतून घरी आणायला विसरले त्यावर शिरीष माझ्यावरच पिसाळला पण त्याला हे कळत नाही का की, ती माझीही मुलगी आहे मी सगळं जबाबदारीने करते तिचे पण माझ्या नाही लक्षात राहिले. कधी कधी डब्यामध्ये पोळी भाजी भरायची विसरायचे तर कधी कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे तेच विसरून जायचे. पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा शिरीष ने ऑफिस चे महत्वाचे कागदपत्र बॅगेत भरायला सांगितले होते पण मी ते कागदपत्र भरायला सुद्धा विसरणे आणि शिरीष ला ऑफिस मध्ये खूप बोलणे खावे लागले.

शेवटी शिरीष ने मला आमच्या फॅमिली डॉक्टर कडे दाखवले त्या डॉक्टर ने सर्व टेस्ट केल्यानंतर समजले मला अल्झायमर आहे. मला पहिली गोष्ट म्हणजे अल्झायमर म्हणजे काय हेच माहित नव्हते. तेव्हा डॉक्टरांनी समजाऊन सांगितले. हा आजार म्हणजे हळू हळू तुमच्या सर्व आठवणी संपून जातील, काहीच स्मरणात राहणार नाही. सध्या काही गोष्टी लक्षात राहतील पण हळू हळू त्या ही लक्षात नाही राहणार. तुमची मुलं नवरा तुमच्या जवळ असतील पण त्यांना तुम्ही ओळखू शकणार नाही. 

इतकं ऐकल्यावर प्रांजळचे हृदय जोरजोरात धडकू लागले तीला घाम फुटला पण डॉक्टरांनी आणि शिरीषने तिला धीर दिला. शिरीष डॉक्टरांना म्हणाला की, डॉक्टर मी कितीही खर्च करायला तयार आहे तुम्ही बाहेरचे डॉक्टर बोलवा पण माझ्या प्रांजळला या आजारातून मोकळं करा. मी हात जोडतो तुमच्या पुढे प्लीज डॉक्टर? डॉक्टर जाग्या वरून उठले आणि त्यांनी शिरीषच्या खांद्यावर हात ठेवले म्हणाले, शिरीष या आजारावर अजुन औषध निघाले नाही तू किती जरी प्रयत्न केलास तरी हा आजार कमी होणे नाही. 

आणि म्हणून यापुढे तू प्रांजळची काळजी घे, तिला आता जॉब नको करून देऊ. या जगात तिचे जितके दिवस आठवत आहेत तितके आनंदाने घालवा. भविष्याचा विचार करू नका. शिरीष आणि प्रांजळ जड पावलांनी हॉस्पिटल बाहेर पडले गाडीतून घरी जाताना ही एकमेकांसोबत एक शब्दही बोलले नाहीत, शिरीषला अथांग जगात ही एकटे असल्या सारखे वाटत होते. तर प्रांजळ ला हे जगच संपल्यासारखे वाटत होते. दोघे घरी आले मिनी शेजारी काकूंकडे होती. तिला जाऊन आणले तशी आल्या आल्या मिनी ने मम्मीला मिठी मारली म्हणाली”अग मम्मी तुला खूप मिस केलं मी मला एकटीला सोडून गेलात ना तुम्ही” पण तिच्या या बोलण्याकडे ही प्रांजळचे लक्ष नव्हते.

सर्व फ्रेश झाले शिरीष म्हणाला प्रांजळ जेवायला बनवू नकोस मी बाहेरून पार्सल आणतो. रात्री ही थोड थोड खाल्ल आणि अंथरुणावर पडून राहिले पण दोघांनाही झोप येत नव्हती. शिरीषचे लक्ष प्रांजळ कडे गेले तर प्रांजळच्या डोळ्यात अश्रू होते. शिरीष ने तिला जवळ घेतले समजावले म्हणाला तू कशाला टेन्शन घेतेस आम्ही आहोत ना तुला आठवण नाही राहिली तर काय झाले आम्हाला तर तू आठवतेस ना! आम्ही आठवण करून देऊ देऊ सगळ्या गोष्टी काळजी करू नकोस. 

काही दिवस असेच गेले त्यानंतर प्रांजळ अधिक गोष्टी विसरायला लागली. कधी तिच्या मुलीला तर कधी तिच्या नवऱ्याला कधी जेवायला विसरायची. म्हणून शिरीषने दिवसभरासाठी एक बाई ठेवली जेणेकरून ती घरात सगळं करून प्रांजळला वेळच्या वेळी जेवण आणि औषध देईल. पण तरीही बाहेर फिरत असताना कधी कधी रस्त्यावरून भिकारी आणि गरीब लोकांकडे पाहून ती म्हणायची यांच्यापेक्षा आपले आयुष्य कितीतरी बरे आहे पण तरीही त्यांना त्यांची आठवण आहे पण मला काहीच कसे आठवत नाही.

हे सुद्धा वाचा लग्नानंतरचे आयुष्य (Life after marriage)

समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल