मागील पंधरा मिनिटात माझा फोन चार वेळा तरी रिंग झाला असेल पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. कारण आता येणारे कॉल एवढे माझ्यासाठी महत्त्वाचे नव्हते. वसुंधराला माझ्याशी शेवटचे बोलून एक महिना तरी झाला असेल. सर्व सुरळीत चालू असताना अचानक तिचे मेसेज कॉल बंद झाले.
काय झालं? का बोलत नाही? कळायला काहीच मार्ग नव्हता. ती जिथे राहत होती तिथे पण जाऊन पाहिलं पण आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की त्यांनी हे घर सोडलं आहे. ना आमच्यात भांडण झालं होतं ना दुसरं काही. पण तिचे हे असे आकस्मात जाणे मला धक्का देऊन गेलं होतं.
पंधरा मिनिटापासून वाजणारा माझा फोन पुन्हा एकदा रिंग झाला. मी जाऊन पाहिले तर वसुंधराचास फोन होता. एक क्षण ही न दडवता मी फोन उचलला. कसा आहेस? बस एवढेच कानी पडलं. ना अचानक सोडून जाण्याचे स्पष्टीकरण ना कोणतेच सॉरी. माझ्याही मनात असंख्य प्रश्न होते.
वाटतं होत राग व्यक्त करू, मला हे असे अर्ध्यावर सोडून जाण्याचे कारण विचारू? पण तिच्या बोलण्यावरून तर असेच वाटत होत की ती जी वागली ते योग्यच आहे. तिने भेटायला बोलावलं होतं. त्याच आमच्या नेहमीच्या जागी संध्याकाळी सहा वाजता.
अरे संसार संसार
३२ दिवस आणि ८ तासांनी मी तिला पुन्हा एकदा समोर पाहणार होतो. मनात असंख्य प्रश्न आणि राग तर होताच पण आनंद ह्या गोष्टीचं होतं की तिला भेटणार आणि बोलणार. प्रेम पण किती वेड असतं ना? आपल्याला माहीत आहे समोरचा आपल्याला इग्नोर करतोय किंवा त्रास देतोय पण आपण मात्र त्यात सुद्धा चांगल्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतो.
ठरलेल्या वेळेप्रमाणे आमच्या नेहमीच्या ठिकाणी पोहोचलो. वातावरण ढगाळ झालं होतं. दिवस जरी मोठा असला तरी काळे ढग जमा झाले होते. हळुवार सरी बरसत होत्या. अचानक पावसाचा वेग वाढला. इतका मुसळधार पाऊस पडू लागला होता की जणू ढग ही रडत होते.

त्या मुसळधार पावसात सुद्धा वसू समोर येताना दिसली. मी काही म्हणणार एवढ्यात अलगद मिठीत शिरली. मनात असंख्य प्रश्न असताना तिची ती एक मिठी सर्व काही विसरून जाण्यास पुरेशी ठरली. मी काही म्हणण्या अगोदर तिनेच म्हटलं.
लग्न ठरलय माझं, एक महिन्यापूर्वी बाबा वारले, त्यांनी माझे लग्न त्यांच्या मित्राच्या मुलाशी ठरवलं होतं. हीच त्यांची शेवटची इच्छा होती की मी त्यांच्या मित्राच्या घरची सून व्हावी. हे सांगताना तिने तिचे मेहंदीचे हात आणि हातातील अंगठी समोर केली.
कसा आणि काय बोलणार होतो मी तिला कारण हे सर्व सांगताना त्या भर पावसात मला बिलगली होती. ना आजूबाजूच्या लोकांचा विचार तिने केला होता ना इतर कुणाचा. बस त्या क्षणी ती माझ्यात हरवून गेली होती. मी फक्त तिच्या डोळ्यांकडे पाहत राहिलो.

माझी भोळी भाबडी वसू किती समंजस जाणवत होती. मी अलगद तिच्या डोळ्यावरून हात फिरवला. डोळ्यांची उघडझाप केली. माझ्या ह्या वागण्यावरून तिला कळालं होतं मला काय म्हणायचे आहे. पण माझं अपूर्ण प्रेम आणि आठवणी घेऊन निघून आलो.
ही पण कथा वाचा प्रेम लग्न आणि कोरोना
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)