Home कथा अनोळखी नातं हे

अनोळखी नातं हे

by Patiljee
3566 views
नातं

सुनंदा जरा पाहा दरवाजावर कोण आलेय? सुमन ताईने आपली मोलकरीण सुनंदाला म्हणाल्या. ताई माझे हात जरा माखले आहेत तुम्हीच पाहा. ही सुनंदा पण ना असे मी स्वतः सोबत पुटपुटले आणि दरवाजा उघडला. दरवाजा समोर ऐन विसितला रुबाबदार तरुण उभा होता. लांब केस आणि घारे डोळे, गालावर पडणारी खळी आणि कुरळे ते केस पाहून मला नितीन ची आठवण झाली.

नितीन म्हणजे माझे पहिलं प्रेम, २५ वर्षापूर्वी घरच्यांच्या विरोधामुळे आम्ही वेगळे झाले होतो. तो मराठी कुटुंबातला आणि मी सिंधी कुटुंबातली असल्याने आमच्या घरी हे प्रेम मान्य नव्हते. त्याकाळी परिस्थितीही अशी होती की इंटर कास्ट लग्न सोडा प्रेम सुद्धा मान्य नव्हते. पण म्हणतात ना प्रेम काही जात, धर्म पाहून होत नाही. तसेच काही आमचे दोघांचे झाले.

आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो. पण नियतीच्या मनात काही वेगळे होते आणि आमची ताटातूट झाली. सुमन जी आहेत का? असा भारदस्त आवाज माझ्या कानी आला. विखुरलेल्या स्वप्नातून मी बाहेर आले. तो मुलगा मला काहीतरी विचारत होता. मी म्हटलं काय हवं आहे बाळा? मीच सुमन आहे. ओ ह.. सॉरी सॉरी मी नाही ओळखले तुम्हाला. मला बाहेर बोर्ड दिसला की तुमच्याकडे राहण्यासाठी खोली आहे.

मी ह्या शहरात नवीन आहे म्हणून राहण्यासाठी जागा शोधत आहे. आधीच तो मुलगा माझ्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देत होता त्यामुळे मी स्मित हास्य करत त्याला म्हटलं ये माझ्या सोबत, वर दोन रूम आहेत पण एका रूम मध्ये जोशी काका आणि त्यांचे कुटुंब राहते तर दुसऱ्या खोलीत जमशेद जी राहत होते पण आता ते त्यांच्या गावी गेले म्हणून ती खोली रिकामी झाली आहे.

ही पाहा ही रूम आहे, जास्त मोठी नाहीये पण तुझ्या एकट्यासाठी खूप आहे. असे म्हणत मी रुमच्या खिडक्या उघडल्या. तो मुलगा एक एक करून आपला सामान बॅगेतून काढत होता. बाळा तू सर्व आवरून घे मी सुनंदा कडून तुला चहा पाठवते.

खरंच ह्या मुलामध्ये नक्कीच काहीतरी होतं. सारखं माझं मन मला भूतकाळात नेत होतं. नितीन आणि मी जरी एकत्र आलो नाही पण त्याने दिलेल्या आठवणी आजही माझ्या स्मरणात आहेत. नकळत एखादी गोष्ट आठवली तरीही अलगद ओठावर स्मित हास्य येतं.

सुनंदा जरा त्या नवीन मुलाला चहा दे, अहो  ताईसाहेब मी अजून हे काम करतेय पहा ना अजून अर्धा तास जाईल. तुम्हीच द्या ना जरा. तिच्या ह्या बोलण्याने मला तिचा राग येईल असे तिला वाटलं खरं पण मलाही त्या मुलाला परत पहायचं होतं म्हणून मी चहा घेऊन त्याच्या खोलीत आली.

झाले का सर्व? काही लागले तर निसंकोच सांग हा बाळा. हो काकू नक्कीच. त्याच्या हातात चहा देताना माझी नजर त्याने भिंतीवर लावलेल्या फोटो कडे वळली. हा फोटो दुसरा तिसरा कुणाचा नसून नितीनचा होता आणि त्याच्या सोबत त्याची बायको आणि हा मुलगा होता. माझ्या हातातला चहाचा कप झटक्यात खाली पडला..

ह्या निवडक कथा सुद्धा वाचा.

कुणा कुणाला आवडेल ह्या कथेचा दुसरा भाग वाचायला. कमेंट करा.

लेखक : पाटीलजी, आवरे उरण रायगड

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल